मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

चष्म्याची गोष्ट



माझा एक मित्र आहे, त्याला राजाकारणातलं फार कळतं ( असं तोच सांगत हिंडतो ). परवा तो तणतणत घरी आला, म्हणाला .......

“ह्या देशाचं काही तरी केलं पाहीजे”
मी म्हटलं “छान तर चाललंय तुझ्या का पोटात दुखतंय ?”
तो तेवढ्याच तावातावाने म्हणाला “तू मुर्ख आहेस” ( बायकोला त्याचं म्हणणं पटलं तिने लगेच चहा ठेवला ) पुढे म्हणाला “तुला जर सगळं छान चाललंय असं वाटत असेल तर त्याचा अर्थ तुझा चष्मा बदलायची

वेळ आलीये, नीट दिसत नाहीये तुला ..........तू मुर्ख आहेस”

पुन्हा पुन्हा मला माझ्या समोरच मुर्खात काढलेलं आवडत नाही
मी म्हटलं “चष्मा बदलून काही होत नाही संपूर्ण व्यवस्थाच बदलायला पाहिजे”
लगेच आव्हान देत तो म्हणाला “चल सिद्ध कर तुझं म्हणणं”

म्हटलं “चल बाहेर जाउया मी आत्ताच सिद्ध करतो” ........ फुकटच्या चहावर पाणी सोडणं त्याच्या जीवावर आलं होतं पण प्रश्न तत्त्वाचा होता नाईलाजाने तो तयार झाला. आम्ही रस्त्यावरून एक लाल, एक निळ्या काचांचा, एक हिरव्या काचांचा आणि एक भगव्या काचांचा चष्मा असे एकूण चार चष्मे विकत घेतले. पैसे अर्थात मीच दिले.

मी त्याला घेऊन राजकारण्यांच्या एका “अड्ड्यावर” ( अड्ड्याला काय म्हणतात ते सांगत नाही कारण मग लगेच “देशद्रोहाचा” गुन्हा दाखल होतो ) गेलो आणि त्याला म्हटलं हिरवा चष्मा घाल आणि डोळे नीट उघडून बघ ह्या लोकांकडे.

त्याने हिरवा चष्मा घातला आणि राजकारण्यांकडे बघितलं आणि म्हणाला “ सगळे चोर तर हिरवे दिसताहेत एकजात, सगळे साले मुस्लीम धार्जिणे आहेत. एकेकाला गोळ्या घातल्या पाहिजेत”

मी त्याला हिरवा चष्मा काढून लाल चष्मा घालायला दिला, त्याने लाल चष्मा घातला आणि म्हणाला “ आयला हे पण चोरच तर दिसताहेत, लाल रंगात माखलेत, कम्युनिस्ट आहेत सगळेच. कशी होणार प्रगती ?”

मी मग त्याला भगवा चष्मा दिला एव्हाना तो हैराण होत चालला होता त्याने चष्मा घातला “ आईच्चा घो हे पण चोर दिसताहेत, आणि कट्टर हिंदूत्ववादी धर्मांध पण आहेत. धर्माभिमानाच्या नावाखाली दंगली माजवणारे हेच आहेत”

मी तोही चष्मा काढून घेतला आणि आता शेवटचा निळा चष्मा त्याला दिला तो सात्त्विक संतापाने धुमसत होता पण त्याच्या समोरही दुसरा पर्याय नव्हता .........प्रश्न तत्त्वाचा होता “ आई शप्पथ हे पण साले चोरच दिसताहेत यार, हे तर सगळे ब्राह्मण विरोधी आहेत”

चष्मे संपले होते त्याने सुटकेचा श्वास सोडला.

“बाबा रे तुला नक्की काय म्हणायचंय ते सांगशील का ? त्याने काकुळतीला येत विचारलं

मी म्हटलं थांब अजुन माझं “Demonstration” संपलं नाहीये त्याच्या पोटात गोळा आला. मी त्याला फरफटत प्राणीसंग्रहालयात घेऊन गेलो. माकडांच्या पिंजऱ्यासमोर त्याला उभं केलं. माकडांनी थोडा निषेध व्यक्त केला पण बहुदा त्यांना आमची फारशी दाखल घ्यावीशी वाटली नाही.

सगळं झाल्यावर मी जेवायला घालायचं वचन दिलं त्याला. मग जरा उत्साह वाढला त्याचा
मग पुन्हा आधीसारखेच एक एक करून सगळ्या रंगांचे चष्मे घालून त्याला माकडांकडे बघायला सांगितलं. तो गप्प होता. त्याने मी सांगितल्याप्रमाणे चष्मे बदलून बदलून माकडांकडे बघितलं.

आता मला जरा चेव चढला मी विचारलं “काय फरक वाटला चष्मा बदलल्यावर ?”
तो म्हणाला “चष्मा बदलल्यावर माकडांचे रंग बदलले फक्त”

” E...X....A.....C...T.....L....Y....”..मी जोरात ओरडलो, पिंजऱ्यातली माकडं पण दचकून ऐकायला लागली आता नीट आठव.... राजकारण्यांकडे बघताना प्रत्येक वेळी चष्मा बदलल्यावर तुला त्यांचे रंग बदललेले दिसले पण ते प्रत्येक रंगात तुला चोरच दिसले right ?“

त्याने होकारार्थी मान हलवली.

“कोणत्याही रंगाच्या, सकारात्मक किंवा नकारात्मक चष्म्यातून, कोणत्याही कोनातून राजकारणी चोरच दिसतील कारण ते चोरच आहेत. आणि म्हणून जर काही चांगलं घडावं असं वाटत असेल तर वेळच्या वेळी “diaper” बदलणं जसं गरजेचं असतं तसेच “राजकारणी” बदलणं गरजेचं असतं” मी प्रवचन चालू केलं.

मला अजुन बरंच काही सुचत होतं पण फुकटच्या जेवणावर पाणी सोडून माझा मित्र निमूट मान खाली घालून चालू पडला.

जेवणाचे पैसे वाचले म्हणून खुष होऊन मी टाळीसाठी पिंजऱ्यातल्या माकडासमोर हात धरला. माझ्या प्रखर बुद्धीवादी, तेजस्वी आणि जाज्वल्य वगैरे विचारांनी भारावून जाऊन माकडाने एका हाताने त्याचं “शोषित” ढुंगण खाजवत दुसऱ्या हाताने मला जोरदार टाळी दिली.

घरी आलो आणि सकाळचा वाचलेला चहा पुन्हा गरम करायची ऑर्डर सोडून निवांत लोळत पडलो.

तुमच्यापैकी कोणाला हवेत का ते चष्मे ? बघा हवं तर तुम्ही पण चेक करा ...............


अण्णांचे संस्कारवर्ग


अण्णा हजारेंचं आंदोलन यशस्वी झालं. मी घरात आणि ऑफ़िसमधे बसुन अण्णांना जी "भरघोस" मदत केली, त्याबद्दल ऐकुन अण्णा खुप खुष झाले. उपोषण सोडल्याबरोबर अण्णांनी मला फ़ोन केला आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मला भेटायला येत असल्याचं सांगितलं पण अण्णांच्या तब्बेतीचा विचार करुन मीच राळेगणसिद्धिला जायचं ठरवलं..

मी अण्णांना भेटायला जाणार आहे असं कळल्याबरोबर पंतप्रधान कार्यालयातुन मला फ़ोन आला आणि कोणीतरी माझ्याशी बोललं ( बहुदा समोर असलेलं वाचुन दाखवलं ) मला सांगण्यात आलेलं मला पटलं ( एक अक्षरही कळलं नव्हतं तरीही ) शेवटी सुशिलकुमार शिंदेंनी मराठीत सांगितलं तेव्हा कळलं. आता सगळ्या जगासाठी मी अण्णांचं अभिनंदन करण्यासाठी राळेगणसिद्धिला जात होतो पण खरं तर केंद्र सरकारने आखलेल्या एका योजनेसंबंधी चर्चा करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात काही भागात रस्ते असतात पण गुप्त असतात, लोकांना दिसत नाहीत म्हणुन वापरुन खराबही होत नाहीत तशीच ही योजना गुप्त स्वरुपाची होती.

शाहीद बलवाला तिहार मधे फोन करुन माझ्यासाठी एक हेलीकॉप्टर पाठवायला सांगितलं. त्याने लेगेच ऐकलं, शरद पवारांचं बुकींग रद्द करुन त्याने माझ्यासाठी व्यवस्था केली. माझं राळेगणसिद्धिला जंगी स्वागत करण्यात आलं. किरण बेदींनी ट्विटर वर लगेच मी आल्याचं जाहिर केलं..


केंद्र सरकारची योजना मी अण्णांना थोडक्यात समजावुन सांगितली. केंद्र सरकारला मदत करायचं अण्णांनी लगेच मान्य केलं. य़ोजना अशी होती की, ए. राजा, कलमाडी कणीमोळी, मधु कोडा अशा राजकीय नेत्यांपसुन ते अगदी कल्याण महापालिकेच्या सुनिल जोशी आणि परवा रंगेहाथ पकडल्या गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तापर्यंत सगळ्यां भ्रष्टाचाऱ्यांना ( फ़क्त सापडलेल्या ) केंद्र सरकारने एका नविन तुरुंगात हलवायचे ठरवले होतं.

जयप्रकाश नारायणांनी जसं चंबळच्या खोऱ्यात डाकुंना मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलं होतं त्याच स्टाइल मधे कॉंग्रेसचे युवराज ह्या भ्रष्टाचाऱ्यांना भ्रष्टाचार सोडण्याचं आवाहन करणार होते. केंद्र सरकारला हेही माहित होतं की ह्या आवाहनाचा काडीइतकाही उपयोग होणार नाही कारण दारुडयाला दारु सोडायला दारुडयाने सांगुन उपयोग नसतो.

अण्णांनी ह्या सगळ्या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या महाभागांचे "संस्कारवर्ग" घ्यावेत म्हणजे कदाचित त्यांचं ह्र्दयपरिवर्तन वगैरे  होइल अशी केंद्र सरकारला आशा होती. नंतर त्या सर्वांना सरकारी नोकऱ्या देउन त्यांचं पुनर्वसन करण्याचाही सरकार विचार करत होतं.

इतर वेळी अण्णांनी सरकारवर विश्वास ठेवला नसता पण मला नकार देणं त्यांना अवघड गेलं. अण्णा तयार झाले. आम्ही लगेच केंद्र सरकारला तसं कळवलं. ताबडतोब खास विमानाने मी आणि अण्णा तिहारला रवाना झालो. तिहारला जय्यत तयारी होतीच. कलमाडींच्याच ए.सी. दालनात सर्व भक्त गण जमा झाला होते. अण्णांसाठी जयललितांचां खास सोन्याचं सिंहासन मागविण्यात आलं होत. मला मात्र बाहेरच थांबायला सांगण्यात आल.

दोन तासात अण्णा हसतमुखाने बाहेर आले. अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी सारखे फ़ोन करत असल्याचं मी अण्णांना सांगितलं. अण्णांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि सहज बोलत बोलत मला बाजुला घेउन गेले. अण्णांना काही तरी सांगायचं होतं पण शब्द सुचत नव्हते. शेवटी त्यांना सुचलं. अण्णा म्हणाले "राळेगणसिद्धिला फ़ोन लाव आणि केजरीवाल आणि बेदींना विचार पुढच्या उपोषणाचे किती पैसे देणार ?"

दोन तासांच्या "सत्संगाचा" परिणाम बघुन मी जाम दचकलो तेवढ्यात बायकोने तोंडावर ग्लासभर गार पाणि ओतलं आणि माझ्या झोपेचा पार सत्यानाश केला.........

...........................राजकारण्यांनी देशाचा केलाय अगदी तस्साच.

(फुकटचा ) सल्ला,



आमच्या कल्याणमध्ये तसं बघितलं तर पाउस अजुन नीटसा चालूही झालेला नाही पण आत्तापासूनच रस्त्यावरच्या डांबर आणि खडीने एकमेकांपासून फारकत घ्यायला सुरुवात केलीये. रस्त्यावर छोटी छोटी डबकी तयार व्हायला लागलीत.
.
“तुला रस्त्यावर आणेन” किंवा “तुझे रस्ते लावेन” ह्या दोन वाक्यांचा / धमक्यांचा अर्थ मला नीट कळायचा नाही, हल्ली हल्लीच कळला म्हणून अशा धमक्या देणाऱ्यांना (फुकटचा ) सल्ला देण्याचा

मोह अनावर झाला. कल्याणातले रस्ते बघितल्यावर शाळकरी मुलांनाही लगेच अर्थ कळू शकेल.
.
तुला रस्त्यावर आणेन म्हणजे जगातल्या सगळ्यात फालतू ठिकाणी तुला आणेन. खरं तर ह्यापुढे “रस्त्यावर आणेन” अशी साधीसुधी धमकी देणाऱ्यांनी “कल्याणातल्या रस्त्यावर आणेन “ अशी धमकी दिली तर समोरच्या वर त्याचा नक्की जास्त प्रभाव पडेल.
.
“तुझे रस्ते लावेन” म्हणजे तुझी जास्तीत जास्त वाट लावेन. असं म्हणायची पध्दतही बहुदा कल्याण मधल्या रस्त्यांची जी अवस्था असते त्यावरूनच रूढ झाली असणार. धमकी देणाऱ्याने नुसतं रस्ते लावेन म्हणण्यापेक्षा “कल्याणच्या रस्त्यांसारखे रस्ते लावेन” असं म्हणणं समोरच्यावर जास्त दहशत निर्माण करू शकेल.

आपला

(रस्त्यावरचा) कल्याणकर