माझ्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझ्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

मालक


आपण सगळे कळपातली
मेंढरं झालो आहोत
युगानुयुगे चाबकाच्या इशा-यावर
चालत आलो आहोत

चाबुक तोच असतो
पण बदल होतो हातांचा
चाबुक खरं झेंडा असतो
बेगडी, पोकळ ध्येयवादाचा

चाबकाच्या एका इशा-यावर
कधी हिंस्त्र पशु होतो
कधी एकमेकांना डसणारे
काळे विषारी साप होतो

झडतात आपली बोटं
अजिंठा, खजुराहो घडविणारी
मग फ़ुटते हातालाच एक मशाल
निरपराध घरं जाळणारी

सगळ्या कळपांच्या सगळ्या मालकांना
हेच तर हवं असतं
मानवतेच्या प्रेतांचा जाळ करुन
त्यांना शेकत बसायचं असतं

सगळ्या कळपांचे सगळे मालक
कधीकधी एकत्र जमतात
वेळ घालवायला मालक
मस्त रमीचा डाव मांडतात

सत्तेचा आणि संपत्तीचा
ट्रायो बनवताना
छोटया मालकांचे
लाचार जोकर होतात

नको असलेले,तत्त्वांचे पत्ते
मालक खुशाल फ़ेकुन देतात
नवी गणितं नवे सिक्वेन्स
पुन्हा नव्याने जुळवत राहतात

आपण असतो कोंडलेले,
कळपाभोवतीच्या कुंपणात
झुंजतो आपण दुस-या कळपाशी
किंवा लढतो आपापसात

बंड वगैरे कर्मदरिद्री विचार
दाबून टाकतो मुर्खपणा मानून
रोज थोडं थोडं मरत राहतो
आतल्या आत सडून

जाणवतंय तुम्हाला ह्यातलं काही ?
पटतंय माझं म्हणणं की पटायचंय ?
आता "वा" किंवा "छान" म्हणुन
पटकन आपल्या कळपात परतायचंय ?...... आता "वा" किंवा "छान" म्हणुन पटकन आपल्या कळपात परतायचंय ?

शनिवार, १ मार्च, २०१४

नाही म्हटलेलं, मला हल्ली चालतं

कशालाही नाही म्हटलेलं, मला हल्ली चालतं
नकारांची सवय लागलीये पण मौन सालं टोचतं
पाठ असतात “सगळेच” पाढे, गणित नेमकं चुकतं
भविष्याचं भूत माझ्या “आज” चा गळा घोटतं
झेपत नाहीत माणसं फारशी, जंगलात मन रमतं
शांत निवांत तळ्यात एकटंच, पाय सोडून बसतं
तिऱ्हाईतासारखं आरशात बघायला, हल्ली खूप आवडतं
रोज मरून हसत जगायला, मला छान जमतं

शनिवार, २० एप्रिल, २०१३

कॉलेज कटटा


प्रत्येक कॉलेजबाहेर
असतो एक कटटा
सुटी लागताच कॉलेजला
पडतो बिचारा एकटा
        वावरत असते तरुणाइ
        हौउन तिथे दंग
        अनेक रंग मिसळुन मिळतो
        कट्ट्याला त्याचा रंग
चहा दोघात मारायचा असतो,
सिगरेट चौघात फ़ुंकायची असते
अभ्यासाच्या विषयाला मात्र
इथे नेहेमीच बंदी असते
        सिगरेटचा ब्रॅन्ड असतो,
        प्रत्येकाचा आपला आपला
        हिरवळीचा विषय मात्र
        सगळ्यांच्या जीव्हाळ्याचा
प्रोफ़ेसर चा उल्लेख "तो" ने करायचा
इथे असतो नियम
कित्येक पिढ्या आल्या गेल्या
कट्टा मात्र कायम
         वेगळी भाषा असते इथली
         वेगळे असतात कायदे
         सिनीअर्स बरोबर चकाट्या पिटायचे
         असतात इथे फ़ायदे
नापास हौउन यायला इथे
नसते कधी बंदी
दर वर्षी येतात इथे
नवे नवे पंछी
          निवांत बसावे इथे मित्रांशी बोलत
          बिन्धास्त बसावे इथे फ़ुलपाखरे मोजत
नसतो कटटा साधासुधा,
असते एक कॉलेज
कट्ट्याशिवाय कॉलेज आम्ही
मानत नाही कॉलेज



बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

उत्तरे सांगुन गेलो


मी मुक्याने मुक प्रश्न हाती तुझ्या ठेवुन गेलो
मी तुझ्या मौनात माझी उत्तरे सांगुन गेलो

श्वास माझे कोरडे अन कोरडे डोळे तरीही
मी स्वतःला नयनी तुझ्या का पुन्हा बुडवुन गेलो?

वाटले ती रात्र सरली, उगवेल आता पुन्हा नवे
मी धुक्यावर स्वप्न माझे तेव्हा पुन्हा खरडुन गेलो

विसरलो मी आठवांना, बुजवल्या मी साऱ्या खुणा
मी पुन्हा तो उकिरडा का उगा चिवडुन गेलो ?

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

एकदा आम्ही ठरवलं.....


एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं

मी रुसायचं गाल फ़ुगवुन
आणि तिने समजवायचं
ती गुदगुल्या करणार
मी खुदकन हसायचं

हसता हसता पाणि येइल डोळ्यात
तिने ओठांनी टिपायचं
मी मात्र तेव्हा लाजुन
तिलाच घट्ट बिलगायचं

मी हात फ़िरवायचा
तिच्या लांबसडक केसांतुन
गाणं सुद्धा गुणगुणायचं
तिने शांत पडुन रहायचं

कुशीत शिरेल तीच अचानक
मग तिनेच वादळ व्हायचं
मी मात्र तेव्हा
तिला अर्पण व्हायचं

बेभान होवुन मीही
देहात तिचं वादळ भिनवायचं
वादळ शमल्यावर दमलेल्या तिला
मी अलगद थोपटुन झोपवायचं

एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं


मंगळवार, ७ एप्रिल, २००९

पाखरु

एकदा अचानक एक पाखरू
माझ्या पुढ्यात पडलं
जखमी होतं बिचारं
जीवाच्या आकांताने तडफ़डलं

मी पटकन उचलुन घेतलं
थोडं गोंजारलं, थोडं पाणी पाजलं
क्षणापुर्वी घाबरुन थरथरणारं पाखरु
माझ्या हातात थोडं विसावलं

मी त्या जखमी पाखराला
माझ्याजवळ ठेवायचं ठरवलं
निदान त्याच्या जखमा भरेपर्यंत
सांभाळायचं ठरवलं

थोडयाच दिवसात पाखरु
माझ्या घरात रुळलं
काडी काडी जमवुन त्यानं
घरटं बांधायला घेतलं

मलाही नाद लागला
त्याचं घरटं बांधायचा
त्याच्या भोवती काडया टाकुन
त्याला मदत करायचा

आम्ही दोघांनी मिळुन
घरटं छान सजवलं
माझ्या घरातलं त्याचं घरटं
मलाही खुप आवडलं

पण एके दिवशी न सांगता
पाखरु उडुन गेलं
त्याचं घरटं, माझं घर
सगळं सोडुन गेलं

मला दुःख नाहीये कशाचंच
हे एके दिवशी होणारच होतं
त्याच्या पंखातलं बळ
कधी ना कधीत्याला
त्याचं आकाश देणारंच होतं

त्याचं घरटं मी अजुन जपुन ठेवलं
यत्याला पुन्हा गरज पडेल म्हणुन नाही
कधी तरी माझ्या जखमा विसरुन उडुन जायला
हे घरटं मला शिकवेल म्हणून

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २००९

ती पिचत चाललीय


नर आणि मादीच्या
वेगवेगळ्या अस्तित्वापासुन
चाचपडणारा मी
चाचपडणारी ती
तिचं जग निळं आभाळ
माझं जग जमिनीवरचं
ती लोभस, चंचल
मी निश्चल निर्विकार
तिच्या भावना तिचा व्यवहार
माझ्या भावना नुसता व्यवहार
तिच्या नशिबी निर्मीतीच्या वेदना
मी हेतुपुरस्सर मुका साक्षीदार
ती मला भावनेत बांधु पहाणारी
विश्वासाच्या रेशमी मिठीत धरु पहाणारी
मी कसलेला नट, अडकल्याचं दाखवणारा
तिच्या मुर्खपणावर स्वतःशीच हसणारा
स्वतःच्याच भावनांच्या ओझ्याखाली
ती पिचत चाललीय
तिच्यातलं स्त्रीपण शोषुन
मी मात्र फ़ुगत चाललोय

माझे मीपण भिरभिरते


पुरातुनही आसवांच्या
धूसर मन हे हुळहुळते
ओठ मुके अन मुकी भावना
गीत मुक्याने दरवळते
स्वप्न फ़ुलांचे, स्वप्न गुलाबी
मम देहावर सळसळते
थरथर नवथर श्वास कोवळा
रात्र नव्याने मज कळते
हरवुन आता दिशादिशांतुन
माझे मीपण भिरभिरते
उसळुन लाटा रक्तातुनही
खोल तळाशी झुळझुळते

त्यांना मझ भूभू हवा हवा होता

परवा कसं कोण जाणे माझ्याही घरी पोस्टाने एक बंडल आलं
बंडल नाही मारत खरं सांगतोय त्यावर माझ्या भुभुचं नाव लिहीलेलं

सरकार चालवायला सर्वपक्षीय आघाडीलामाझा भुभु हवा होता
खाल्ल्या पैशांना जागणाराकिमान एक नेता हवा होता

डावे करताच तात्विक वळवळ कडाडुन चावणारा देशभक्त हवा होता
त्यांच्या भोंदुगीरीवर जाहीर मुतणारा ताठ कण्याचा मर्द हवा होता

उजवे ओकताच धार्मिक गरळ निस्तारायला त्यांना राम हवा होता
समाजवादी घालताच समाजात गोंधळ सुदर्शन उगारणारा शाम हवा होता

पत्रकार म्हणविणारी गिधाडे फ़ाडणारा निधडया छातीचा शेर हवा होता
न्यायासनाखाली दडलेले नाग ठेचणारा मर्दाच्या जातीचा जवान हवा होता

मी म्हटलं मी माझा भुभु देणार नाही
कुत्रा असला म्हणुन काय झालं त्याला "नेता" करणार नाही

गरिब बिच्चा-या भुभुचा असला अपमान करणार नाही
निदान त्याची तरी शेपुट मी तुमच्यासमोर हलु देणार नाही

गुरुवार, ७ फेब्रुवारी, २००८

कवींची व्यथा

कवींना हे आता नेहेमीचं आहे
कवीचं जगणं अवघड आहे

अहो मी तर हल्ली तोंड लपवुन फ़िरतो
लग्नाला गेलो की न जेवता सटकतो

कधी तरी सापडतो
नवरया मुलीच्या हातात

करतो ताजा उखाणा
सांगतो तिच्या कानात

फ़ार हाल होतात हो हल्ली
शोधतात मला गल्लोगल्ली

परवा एक जण अवचित उपटला
म्हणाला दादा तुला किती शोधला

देवासारखा भेटलास माझ एक काम कर
तिला द्यायचीय पटकन एक कविता कर

सुखाचं पाणी थोडं पुरेल
पण दुःखाच मीठ घाल
वाचुन तिला रडु फ़ुटेल
तेवढच प्रेमाचं तिखट घाल

बायकोनेही विचारल एकदा
कविता होतात कशा
एवढे शब्द एवढ्या कहाण्या
फ़ाटक्या खिशात मावतात कशा

मनातल्या मनात डोकं आपटलं
हात जोडुन बायकोला म्हटल

अपचन झाल की
लोकाना उलट्या होतात
काही वेगळ बघितल की
मला कविता होतात

एकदा दुपारी अवचित घरी टपकलो
बायकोच्या आवाजाने दारात थबकलो

मैत्रिणिला ती सांगत होती
माझीच कथा ऐकवत होती

आता पोट बरं आहे उलट्या वगैरे होत नाहीत
कधी तरी होतो त्रास पण रोज कविता होत नाहीत

शुक्रवार, १० ऑगस्ट, २००७

साप

काल मी एका माणसाला साप म्हटले,
सभ्यतेला लागलेला शाप म्हटले

लागलीच मोठी गडबड उडाली
सापांची अस्मिता पेटुन उठली

सापांच्या युनियनची बैठक झडली
शेपट्या उडवत त्यानी आंदोलनची हाक दीली

सापांचा मोर्चा माझ्या घरावर आला
वाजत गाजत त्यांनी माझा पुतळा जाळला

सर्वात पुढे बेडकांचा ढोल वाजत होता
असाच कधी मी त्यांचाही अपामान केला होता

सगळ्या प्रकाराने घाबरुन गेलो
उंदरासारखा घरात लपुन बसलो

मार्ग शोधायला डोकं खाजवलं
सापांच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलवलं

परत असं न करण्याचं लिहुन दिलं
लाच म्हणुन प्रत्येकाला दुधही पाजलं

आता मी ठरवले आहे माणसाला साप म्हणायचे नाही
बिचा-या मुक्या प्राण्याला परत असे हिणवायचे नाही

जमिनीवर वळवळले तरी त्यांनाही मन असते
डिवचल्यावरच चावायचे त्यानाच तर भान असते

महात्मा आणि कुत्रे

इमानी कुत्र्यानी त्यांच्या,
राजघाटाची झडती घेतली
मोठ्याने भुंकुन कुत्र्यानी
महात्मा नि:शस्त्र असल्याची खात्री दीली

आमचा महात्मा बिचारा आतल्या आत रडला
त्यांनी घातलेला पुष्पहार त्याच्या गळ्यात रुतला

ब्रिटिशांच्या राज्यात कुठे कुठे
"इन्डिअन्स" आणि "डॉग्सना" बंदी होती

परवा अध्यक्षांच्या दौरयात
माणसांपेक्षा कुत्र्यांची गर्दि होती

त्यांची वृत्ती तिच आहे, भाषा तेवढी बदललीये
आता त्यांच्या काळ्या यादीत कुत्र्याचे नाव नाहीये

अरे राजघाटावर जायची कुत्र्याची काय
त्यांची तरी लायकी होती का ?
आपल्या बापाचा अपमान होताना
आपली अस्मिता झोपली होती का ?

साला आपले नेत्रुत्व षंढच,
कसले करार करताहेत
देव जाणे कराराच्या गुप्त अटीत
देश केवढ्याला विकताहेत

विश्वास ठेवा त्याना शस्त्राची नाही
महात्म्याच्या विचारांची भीती होती
महात्म्याचा अपमान करतानाही
त्यांनी त्यांची संस्कृती जपली होती

गुरुवार, ९ ऑगस्ट, २००७

कशास भजता काळ्या हरीला

काय मिळाले त्या मीरेला
कशास भजता काळ्या हरीला

तुम्ही वेडे मीरा भोळी
तुम्हा फ़सविते मंजुळ मुरलि

कुणा समजली करणि त्याची
कुणा गवसली प्रीती त्याची

कशास असली स्वप्ने बघता
कशास हरिला माझा म्हणता

धराल कैसे हात तयाचे
पुजाल कैसे चरण तयाचे

नसे मानवी नसे देव तो
व्यापुन उरला अवघे विश्व तो

तो तर कर्ता ह्या विश्वाचा
जन्मदाता तो शतजन्मांचा

ही प्रीती कैसी तुमची म्हणता
उरात तुमच्या त्याची सत्ता

तो तर असतो सर्व करविता
तुम्हा मुखातुन भाव वदविता

तुमची प्रीतही त्याची करणी
तुम्हा लोचनी त्याचे पाणी

देहही तुमचा त्याचे देणे
देहात ओतीला आत्मा त्याने

असा कोरीला, असा घडविला
निव्वळ त्याचा भाव भरिला

नव्हता तुम्ही कधी स्वतःचे
तुम्ही खेळणे काळ्या हरिचे

स्वतःला आता मी बुद्धीवादी समजतो

हल्ली काही न करता मी नुसत्या बाता मारतो
कारण स्वतःला आता, मी बुद्धीवादी समजतो

प्रत्येक विषयावर न चुकता माझं ठाम मत मांडतो
वेदांपेक्षा वादात मी जास्त रमतो
कारण स्वतःला आता, मी बुद्धीवादी समजतो

शेजारच्या घरात शिवाजी जन्मायची मी वाट पाहतो
माझ्या दारातला कचरा हळुच मी शेजारी सरकवतो
कारण स्वतःला आता, मी बुद्धीवादी समजतो

चोराला बदडणा-या गर्दीत मीही हात धुवुन घेतो
चोराचे दोन चार साथिदार येताच मी हळुच सटकतो
कारण स्वतःला आता, मी बुद्धीवादी समजतो

मराठी वाचवा मराठी वाचवा गळा फ़ाडुन ओरडतो
स्वतःच्या मुलासाठी मात्र कॉन्वेंट शाळा शोधतो
कारण स्वतःला आता, मी बुद्धीवादी समजतो

जर वळुन तिने बघितले नसते

ओठ लालसर डसले नसते
जर मला पाहता लटपटलेला
डोळे अवखळ हसले नसते
हे जगणे सोपे झाले असते हे जगणे सोपे झाले असते

ह्रिदयामध्ये नाव तिचे
मी कायमचे लिहीले नसते
जर तप्त तिच्या श्वासामधले
रहस्य मजला कळले नसते
हे जगणे सोपे झाले असते हे जगणे सोपे झाले असते

जर वा-यावरती भुरभुरणारे
केस तिने आवरले असते
नशिबी माझ्या झुरणे नसते
आयुष्यही सुंदर झाले असते
हे जगणे सोपे झाले असते हे जगणे सोपे झाले असते

जर असणे तिचे सवयीचे नसते
आयुष्यही माझे माझे असते
मरणाचे भयही गेले नसते
अन मलाच मी सावरले असते
हे जगणे सोपे झाले असते हे जगणे सोपे झाले असते

मस्तानी

प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु ही गोष्ट फ़क्त स्वतःशी बोलयची असते

लग्नाची असली तरी ती फ़क्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते

लोक म्हणतात हा व्यभिचार आहे
जाणुन बुजुन केलेला अविचार आहे

बोलणारे लोक खोटारडे असतात
स्वतःपासुन सुद्धा काहीतरी लपवतात
करतील काय सगळेच बाजीराव नसतात

लोक नेहेमी असेच वागतात
बाजीरावाचे प्रेम ग्रेट म्हणतात
तुमच्या आमच्या चारित्र्यावर चिखल उडवतात
येता जाता नैतिकतेचे डोस पाजतात

बालपणी मस्तानी एक परी असते
तारुणाईच पहिल प्रेम असते
वय वाढल्यावर सखी असाते
काहीही म्हणा प्रत्येकाच्या मनात असते

प्रत्येकाला ठाउक असते मस्तानी आपली होणार नाही
सगळ्यांचे नशिब काही तेवढे थोर नाही

तरीही आपली मस्तानी जपायची असते
मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवायची असते

ईमान

मीबी गेलो येकदा ईमानातुन फ़िरायला
पाखरावनी पंख पसरुन आभाळातुन उडायला

वाघागत पळत ईमान, गापदीशी उडतं
जमिनीवर पळता पळता आभाळात शिरतं

समद्यास्नी तिथ राजावानी वागिवत्यात
बटान दाबायच, मागल त्ये देत्यात

ड्रायवरला तेंच्या पायलट म्हन्त्यात
चा पाण्याच बघायला फ़ाकडु पोरी असत्यात

ईमानात सार म्हालावानी असतया
खायाला समद फ़ुकाट मिळतया

रेल्वेवानी लेका
तिथ बी टीसी असतो
तिकीट इचारत न्हाई,
चॉकलेट वाटतो

यवडी लांबडी नदी गडया सापावानी दिसती
येक येक बिल्डींग लेका मुंगीवानी दिसती

मोठे मोठे डोंगुर, खडयावानी दिसत्यात
काळे पांधरे ढग गडया पायाखालन पळत्यात

ईमानातुन उतरताना पोरी ग्वाड हसत्यात
त्वांडभर हसुन "पुन्ना या" म्हन्त्यात

तवापासुन गडया डोस्कं आसं फ़िरलया
आभाळात जवा तवा ईमानच दिसतया

आपल्याला बी जमल कारं आसं उंच उडायला
ईमानागत आभाळात उंच उंच फ़िरायला

उडुन झाल की अलगद जमिनीवर टेकायला
अंधारात बी आपल गाव आसं नीट शोधायला

माझी गांधीगीरी

मुन्नाभाई पाहिला अन नशिब माझे फ़ुटले
बायको पासुन बॉसपर्यंत सारे गणित चुकले

दुस-याच दिवशी बायकोने पाकिट माझे मारले
बससाठी तिच्याकडुन दहा रुपए उसने मागितले

निषेध म्हणुन मी मग मौनव्रत पाळले
जेवतानाही फ़क्त खाल्ले भात आणि पिठले

लोकलमधे सुद्धा व्रत कष्टाने मी सांभाळले
हजार धक्के खाउन सुद्धा तोंड नाही उघडले

खात होतो शिव्या तरी बोलत नव्हतो उलटुन
सगळ्या मित्रांनी मजा घेतली आलटुन पालटुन

ऑफ़िसातली फ़टाकडी नेहेमी माझ्या जवळ येते
सगळ्यांना मी सांगितले ती आई सारखी दिसते

माझ्या वागण्यात बदल पाहुन बहुतेक देव जळु लागला
शाप म्हणुन माझ्या कपाळावर त्याने एक आरसा लावला

आरसा होता भारी, अंधारातही चमकायचा
मनामधलं नेमक समोरच्याला दाखवायचा

सगळ्यात आधी मार खाल्ला बायकोच्याच हातचा
जवळ ती होती पण आरशात फ़ोटो शेजारणीचा

बॉसला नेमका कसा आरशात गेंडा दिसला
हात धरुन प्रेमाने त्याने घरचा रस्ता दाखवला

मित्राला तर आरशात दिसला साप आणि कोल्हा
नेत्यासमोर आरशात दिसला भला मोठा कुत्रा

सरकारी ऑफ़िसात दिसले सगळ्याना काळे कावळे
भ्रष्टाचाराच्या चिखलात नाचणारे वरुन पांढरे बगळे

गांधीगीरीचा प्रयत्न मला चांगलाच भोवला
जाता येता सगळ्यांकडुन रग्गड मार खाल्ला

झक्कत गेलो देवाकडे म्हटलं बाबा सोडव
गांधीगीरीचं खुळ माझं तुच आता उतरव

देव तेव्हा खुष झाला गालात हसुन बोलला
एकच होता महात्मा मी कष्टाने जन्माला घातलेला

त्याचीच होती ताकद गांधी म्हणुन जगण्याची
त्याचीच होती लायकी गांधीगीरी करण्याची

ऑफ़िस आणि घर एवढच तुमच जग
चार भिंती एक छप्पर एवढच तुमचं घर

गांधीगीरी करायची तर मन तसं कर
देवाला म्हटलं बाबा चुक झाली मला माफ़ कर

सोडुन दीली गांधीगीरी गायब झाला आरसा
पुन्हा वागु लागलो मी सामान्य माणसासारखा

तेव्हापासुन आजपर्यंत मी सुखात जगतोय
पोटात असतं एक तरी तोंडाने दुसरच बोलतोय

कॉलेज कट्टा

प्रत्येक कॉलेजबाहेर
असतो एक कट्टा
सुट्टी लागताच कोलेजला
पडतो बिचारा एकटा
वावरत असते तरुणाइ
हौउन तिथे दंग
अनेक रंग मिसळुन मिळतो
कट्ट्याला त्याचा रंग
चहा दोघात मारायचा असतो,
सिगरेट चौघात फ़ुंकायची असते
अभ्यासाच्या विषयाला मात्र
इथे नेहेमीच बंदी असते
सिगरेटचा ब्रॅन्ड असतो,
प्रत्येकाचा आपला आपला
हिरवळीचा विषय मात्र
सगळ्यांच्या जीव्हाळ्याचा
प्रोफ़ेसर चा उल्लेख "तो" ने करायचा
इथे असतो नियम
कित्येक पिढ्या आल्या गेल्या
कट्टा मात्र कायम
वेगळी भाषा असते इथली
वेगळे असतात कायदे
सिनीअर्स बरोबर चकाट्या पिटायचे
असतात इथे फ़ायदे
नापास हौउन यायला इथे
नसते कधी बंदी
दर वर्षी येतात इथे
नवे नवे पंछी
निवांत बसावे इथे मित्रांशी बोलत
बिन्धास्त बसावे इथे फ़ुलपाखरे मोजत
नसतो कट्टा साधसुधा,
असते एक कॉलेज
कट्ट्याशिवाय कॉलेज आम्ही
मानत नाही कॉलेज

बुधवार, ८ ऑगस्ट, २००७

भिका-याची पोर

काल सकाळी भिका-याची एक पोर
वाटेत आडवी आली
एका रुपायासाठी हातातली कटोरी
तिने माझ्यापुढे वाजवली
नकळत माझ्या कपाळावर
एक आठी चढली
नकळत माझी नजर
तिच्या नजरेला भिडली
पुन्हा एकदा हातातली कटोरी
तिने मुद्दाम वाजवली
तिच्या नजरेत मला तेव्हा
मला आव्हानाची भाषा दिसली
नकळत मी तिच्याकडे
टक लावुन पाहु लागलो
फ़ाटक्या कपडयातुन तिच्या
स्त्रीत्वाच्या खुणा शोधु लागलो
तिलाही कळत होते
माझ्या नजरेतले पाप
तिच्या सवयीचा होता
गरिबीचा शाप
क्षणभरच झाल असं
मग मी भानावर आलो
कटोरीत चिल्लर भिरकावुन
मी पुढे चालु लागलो
सहज मागे वळुन पाहिले
ती तिथेच उभी होती
नजरेनेच तिने माझ्या पापाला
भिक म्हणुन माफ़ी दीली होती
तिची ती नजर आठवुन
आजही मी बेचैन होतो
माझ्या हातात मला तोच
भिकेचा कटोरा दिसतो