लेखक - गो.नी. दांडेकर
गो.नी.दां. च्या इतर कथांप्रमाणेच चुटपुट लावणारी एक ग्रामिण कथा. घराण्याची
परंपरा, अभिमान जीव तोडुन जपणा-या
शेतक-याची ही कथा.
कथा हळुहळु उलगडत जाताना दोन पिढ्यांमधला संघर्षदेखील जाणवत रहातो, अस्वस्थ करत राहतो.
धाकटया भावाविरुद्ध कुस्तीचं आव्हान स्वीकारणा-यालाही प्रोत्साहन देताना
कोंडीला असलेलं नैतिक जबाबदारीचं भान प्रकर्षाने जाणवतंच पण धाकटया वहिनीमधे आजी
शोधणारा कोंडी जमिनीवरचाच माणुस राहतो.
शेतात गुरासारखा राबणारा कोंडी धाकटया वहिनीजवळ मात्र हळुवार होतो, तिच्या शिक्षणाचं कौतुक जगाला ओरडुन सांगतो. एकंदरीत त्याचा
विरोध बदलत्या प्रवाहाला नाही, बदल स्वीकारायला त्याची तयारी
आहे पण जग बदललं म्हणुन स्वतः बदलायची मात्र त्याची तयारी नाही. वरवर बघितलं तर
कथा साध्या सोप्या नेहेमीच्या मार्गानेच जाते खुप काही वेगळं असं काही घडत नाही.
कथेच्या शेवटी कोणाचे उपकार घ्यायला लागु नयेत म्हणुन कोंडीचं गुरासारखं शेतात
राबणं तो शेवटच्या प्रवासाला निघाल्याची जाणिव करुन देतं पण जन्मभर सांभाळलेल्या
व्रतासाठी त्याने दीलेलं बलिदान मात्र वाचकांना असह्य चुटपुट लावुन जातं.


