लेखक - - विश्वास पाटील
विश्वास पाटलांची जवळपास सर्व पुस्तकं मी वाचलेली आहेत साधी सरळ भाषा, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची अफ़ाट ताकद.
ग्रामिण
जीवनाचं दर्शन घडवतानाच राजकारणातल्या खाचाखोचा सहज आपल्यासमोर उलगडत जातात.
कादंबरीतली कुठलीच व्यक्तीरेखा "माणुसपणाच्या" सीमा सोडत नाही. आपल्या
आजुबाजुलाच कादंबरी घडत जातेय असं वाटत रहातं
राजकारण, सत्ता अशा दगडी किना-यांवरुन
वाहतानाच कादंबरीचा प्रवाह स्त्रीमन उलगडुन दाखवताना मात्र वरुन कितीही आक्रस्ताळा
वाटला तरी आतुन खुप हळुवार होतो. विश्वास पाटलांची हीच खरी ताकद.
एका तरुण तडफ़दार राजकारण्याला पडलेलं रांगडं स्वप्न म्हणजे................... चंद्रमुखी,
प्रियकरासाठी अवघं आयुष्य एका क्षणात उधळायला तयार होणं काय असतं ते जी सांगते
ती................... चंद्रमुखी
पैशांसाठी कला, शरीर आत्मा सगळं विकुनही
माणुसपण टिकवते ती................ चंद्रमुखी
पोकळ समाजनियम लाथेने उडवुन लावते, प्रसंगी वाघिणीसारखी तुटुन पडते ती............... चंद्रमुखी.
संपुर्ण कादंबरी नायिकेभोवती फ़िरते, तिच्या
भावभावना उलगडुन दाखवते, तिच्यावरचा अन्याय मांडते तरीही
कुठेही रडकथा न होता उलट चंद्रमुखी अंगावरच येते.
एक तरुण राजकारणी एका कलावंतीणीच्या प्रेमात पडतो, तीही काही काळ वाहवत जाते, दोघांना जाग
येते तेव्हा त्याला जाणवतं त्याची संपुर्ण कारकीर्द पणाला लागलेली आहे.
जिच्यावरच्या प्रेमामुळे ही वेळ आली तीच शेवटी त्याला सगळ्यातुन बाहेर काढते.
एखादया स्वप्नातुन जागी व्हावी तशी आपल्या आयुष्यात परतते. जणु भीक म्हणुन त्याला
त्याचं आयुष्यच देउन टाकते.
एवढी साधी सोपी कथा पण वाचताना आपणही त्या कथेतीलच एक व्यक्तीरेखा आहोत असं
वाटू लागतं. कादंबारीचा शेवट मात्र आपल्या डोळ्यात थोडं तरी पाणी आणल्याशिवाय रहात
नाही.