रविवार, १० जानेवारी, २०१६

मुख्यमंत्री साहेब ........






प्रति.
मा.श्री देवेंद्रजी फडणविस,
मुख्यमंत्री – महाराष्ट्र
महोदय,
विषय – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या रस्ता रुंदीकरणाबाबत
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या दरम्यान आपण ह्या महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी हजारो कोटींचे “Package” जाहीर केलेले आहे. दिलेल्या शब्दाला आपण जागाल ह्या बद्दल आम्हा नागरीकांच्या मनात कोणताही संशय नाही.

कल्याणकर नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो की आपल्याला व आम्हालाही अपेक्षित असलेल्या “स्मार्टसिटीच्या” दिशेने आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त श्री ई. रविंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केलेली आहे. ह्याच पद्धतीने जर वाटचाल चालू राहिली असती तर कदाचित राज्यातील पहिल्या स्मार्टसिटीचा मान आमच्या शहराला मिळाल्याशिवाय राहिला नसता.

ह्या शहराच्या दुर्दैवाने आपल्याच पक्षाचे आमदार, खासदार तसेच आपल्या मंत्री मंडळातील आपले सहकारी संपूर्ण ताकदीनिशी स्थानिक प्रशासनाच्या आणि पर्यायाने सार्वत्रिक जनहिताच्या विरोधात जाऊन मुठभर व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत. सदर प्रकारात संबधितांकडून आपलेही नाव घेण्यात येत आहे.
.
कारवाईच्या विरोधात दबाव निर्माण करण्यासाठी आयुक्तांच्या बदलीच्या बातम्या जाणून बुजून “गुजराती” वृत्तपत्रांच्या आणि आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून पसरविल्या जात आहेत.

गेल्या अनेक महिन्यात आयुक्त श्री ई. रविंद्रन यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. प्रशासनातील अनेक बेशिस्त अधिकारी व कर्मचारी आज घरी बसवलेले आहेत. आमच्या हितासाठी सकाळी ६ वाजल्यापासून कल्याण डोंबिवली शहरांच्या गल्लीबोळात स्वतः फिरणारे आयुक्त ह्या शहराने आजवर पाहिलेले नाहीत. पूर्वी ३६५ दिवस आणि २४ तास भरून वाहणाऱ्या कचरा कुंड्या आयुक्तांच्या भितीने वाहायच्या थांबलेल्या आहेत.

असं असताना जर खरोखरच मुठभर व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून आयुक्तांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला किंवा त्यांनी सुरु केलेल्या मोहिमेवर गदा आणली गेली तर ह्या शहरातील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत ह्याची आपण नोंद घ्यावी ही विनंती.

सदर प्रकरणात लक्ष घालून आपल्या पक्षातील स्थानिक आमदार खासदार व आपल्या मंत्र्यांना योग्य ती “समज” देऊन आपण स्थानिक प्रशासन व आम्हा कल्याणकरांच्या पाठीशी उभे रहावे ही विनंती.

आपला

जबाबदार कल्याणकर
कल्याण पश्चिम - ४२१३०१
.
वर लिहिलेलं पत्र मी मा. मुख्यमंत्री साहेबांना मेलवर माझ्या वैयक्तिक नाव व पत्त्यासह पाठवलेले आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही पाठवा
cm@maharashtra.gov.in आणि chiefminister@maharashtra.gov.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: