सकाळी ८.२३ ला कल्याणहून दादरला जाणारी स्लो लोकल, ही गाडी कारशेड मधून येत असल्याने कल्याणला सहज जागा मिळते. ठाकुर्ली, डोंबिवलीला आणि मग मुंब्र्यापर्यंत बऱ्यापैकी गर्दी होते. ठाण्यात मात्र गर्दी बरीच कमी होऊन जाते.
आजही तसंच झालं मुंम्र्याला खूपच गर्दी झाली बराच आरडाओरडा चालू होता, प्रत्येक डब्यात आत शिरण्यासाठी जीव तोडून ढकला ढकली सुरु असतानाच गाडी सुटली. गाडीने वेग घेतला. सुसाट निघालेली गाडी कळव्याजवळ आली आणि मागच्या कोणत्यातरी दारातून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. किंकाळी बाईची की पुरुषाची हेही कळलं नाही. “क्या हुवा ?” जो तो एकमेकांना विचारू लागला “अरे यार कुछ नहीं... कोई तो गाडीसे गिर गया” कोणी तरी माहिती पुरवली. “अरेरे बेचारा” दोन चार जणांना वाईट वाटलं.
कळवा आलं मग ठाणा ...मग मुलुंड. गर्दी चढत राहिली उतरत राहिली. लोक पुन्हा आपल्या गप्पा आणि मोबाईल मधे बिझी झाले. ज्यांना उतरायचं होतं ते हळू हळू दरवाजाकडे सरकू लागले.
नाहूर आलं, पडलेल्या माणसाचा विचार करत मी उतरलो. डोक्यात चालू होतं फेसबुकवर सणकून काही तरी लिहायचं रेल्वे प्रशासनाला, सरकारला अगदी पंतप्रधानांना पण जाम हाणायचं. बाकीच्यांचं मरू दे पण निदान मी तरी फार संवेदनाशील आहे हे अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं, पटवून द्यायचं.
.
इतक्यात मी ज्या गाडीतून उतरलो त्याच गाडीच्या लेडीज डब्यातून एक तरुणी धाडदिशी Platform वर पडली. आजूबाजूचे लोक तिला उचलायला धावले. नशिबाने तिला फार लागलं नव्हतं .........मी लांबच होतो. नकळत घड्याळाकडे लक्ष गेलं. मी वळलो आणि ऑफिसकडे चालायला सुरुवात केली.
हे असंच चालत आलंय आणि असंच चालणार ..............निषेध नक्की कोणाचा करायचा ?
सरकारचा ? रेल्वे प्रशासनाचा ? त्याच गाडीत जीवाच्या आकांताने घुसू पाहणाऱ्या त्या माणसाच्या अपरिहार्यतेचा ? पोटापाण्यासाठी मुंबईत कुत्र्या मांजराचं जीणं जगणाऱ्या गर्दीचा ? खिडकीत बसून फक्त बघ्याची भूमिका वठवणाऱ्या माझ्यासारख्या लाखो “हतबल” माणसांचा ?
.
त्या पडलेल्या माणसाचं काय झालं माहित नाही .....जर वाचला नसेल तर मेणबत्त्या वगैरे घेऊन मूकमोर्चा निघेल. त्या मोर्चाला मात्र मी आवर्जून जाईन. त्याच्या कुटुंबाच्या दुःखात मी पण सहभागी आहे हे सांगायला आणि कोणाचा तरी निषेध पण तोही “मुक्याने” नोंदवायला. फेसबुकवर टाकायला एक सेल्फी पण काढेन.
.
कधी तरी मीही असाच .....लोकलच्या दारातून जीवाच्या आकांताने आत शिरायचा प्रयत्न करत असेन .......गाडी वेग पकडेल ......त्या माणसासारखा माझाही हात सुटेल ............
निदान तोवर तरी मी खूप संवेदनाशील आहे गर्दीपेक्षा वेगळा आहे हे ओरडून सांगत राहीन ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा