मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

अण्णांचे संस्कारवर्ग


अण्णा हजारेंचं आंदोलन यशस्वी झालं. मी घरात आणि ऑफ़िसमधे बसुन अण्णांना जी "भरघोस" मदत केली, त्याबद्दल ऐकुन अण्णा खुप खुष झाले. उपोषण सोडल्याबरोबर अण्णांनी मला फ़ोन केला आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मला भेटायला येत असल्याचं सांगितलं पण अण्णांच्या तब्बेतीचा विचार करुन मीच राळेगणसिद्धिला जायचं ठरवलं..

मी अण्णांना भेटायला जाणार आहे असं कळल्याबरोबर पंतप्रधान कार्यालयातुन मला फ़ोन आला आणि कोणीतरी माझ्याशी बोललं ( बहुदा समोर असलेलं वाचुन दाखवलं ) मला सांगण्यात आलेलं मला पटलं ( एक अक्षरही कळलं नव्हतं तरीही ) शेवटी सुशिलकुमार शिंदेंनी मराठीत सांगितलं तेव्हा कळलं. आता सगळ्या जगासाठी मी अण्णांचं अभिनंदन करण्यासाठी राळेगणसिद्धिला जात होतो पण खरं तर केंद्र सरकारने आखलेल्या एका योजनेसंबंधी चर्चा करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात काही भागात रस्ते असतात पण गुप्त असतात, लोकांना दिसत नाहीत म्हणुन वापरुन खराबही होत नाहीत तशीच ही योजना गुप्त स्वरुपाची होती.

शाहीद बलवाला तिहार मधे फोन करुन माझ्यासाठी एक हेलीकॉप्टर पाठवायला सांगितलं. त्याने लेगेच ऐकलं, शरद पवारांचं बुकींग रद्द करुन त्याने माझ्यासाठी व्यवस्था केली. माझं राळेगणसिद्धिला जंगी स्वागत करण्यात आलं. किरण बेदींनी ट्विटर वर लगेच मी आल्याचं जाहिर केलं..


केंद्र सरकारची योजना मी अण्णांना थोडक्यात समजावुन सांगितली. केंद्र सरकारला मदत करायचं अण्णांनी लगेच मान्य केलं. य़ोजना अशी होती की, ए. राजा, कलमाडी कणीमोळी, मधु कोडा अशा राजकीय नेत्यांपसुन ते अगदी कल्याण महापालिकेच्या सुनिल जोशी आणि परवा रंगेहाथ पकडल्या गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तापर्यंत सगळ्यां भ्रष्टाचाऱ्यांना ( फ़क्त सापडलेल्या ) केंद्र सरकारने एका नविन तुरुंगात हलवायचे ठरवले होतं.

जयप्रकाश नारायणांनी जसं चंबळच्या खोऱ्यात डाकुंना मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलं होतं त्याच स्टाइल मधे कॉंग्रेसचे युवराज ह्या भ्रष्टाचाऱ्यांना भ्रष्टाचार सोडण्याचं आवाहन करणार होते. केंद्र सरकारला हेही माहित होतं की ह्या आवाहनाचा काडीइतकाही उपयोग होणार नाही कारण दारुडयाला दारु सोडायला दारुडयाने सांगुन उपयोग नसतो.

अण्णांनी ह्या सगळ्या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या महाभागांचे "संस्कारवर्ग" घ्यावेत म्हणजे कदाचित त्यांचं ह्र्दयपरिवर्तन वगैरे  होइल अशी केंद्र सरकारला आशा होती. नंतर त्या सर्वांना सरकारी नोकऱ्या देउन त्यांचं पुनर्वसन करण्याचाही सरकार विचार करत होतं.

इतर वेळी अण्णांनी सरकारवर विश्वास ठेवला नसता पण मला नकार देणं त्यांना अवघड गेलं. अण्णा तयार झाले. आम्ही लगेच केंद्र सरकारला तसं कळवलं. ताबडतोब खास विमानाने मी आणि अण्णा तिहारला रवाना झालो. तिहारला जय्यत तयारी होतीच. कलमाडींच्याच ए.सी. दालनात सर्व भक्त गण जमा झाला होते. अण्णांसाठी जयललितांचां खास सोन्याचं सिंहासन मागविण्यात आलं होत. मला मात्र बाहेरच थांबायला सांगण्यात आल.

दोन तासात अण्णा हसतमुखाने बाहेर आले. अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी सारखे फ़ोन करत असल्याचं मी अण्णांना सांगितलं. अण्णांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि सहज बोलत बोलत मला बाजुला घेउन गेले. अण्णांना काही तरी सांगायचं होतं पण शब्द सुचत नव्हते. शेवटी त्यांना सुचलं. अण्णा म्हणाले "राळेगणसिद्धिला फ़ोन लाव आणि केजरीवाल आणि बेदींना विचार पुढच्या उपोषणाचे किती पैसे देणार ?"

दोन तासांच्या "सत्संगाचा" परिणाम बघुन मी जाम दचकलो तेवढ्यात बायकोने तोंडावर ग्लासभर गार पाणि ओतलं आणि माझ्या झोपेचा पार सत्यानाश केला.........

...........................राजकारण्यांनी देशाचा केलाय अगदी तस्साच.

(फुकटचा ) सल्ला,



आमच्या कल्याणमध्ये तसं बघितलं तर पाउस अजुन नीटसा चालूही झालेला नाही पण आत्तापासूनच रस्त्यावरच्या डांबर आणि खडीने एकमेकांपासून फारकत घ्यायला सुरुवात केलीये. रस्त्यावर छोटी छोटी डबकी तयार व्हायला लागलीत.
.
“तुला रस्त्यावर आणेन” किंवा “तुझे रस्ते लावेन” ह्या दोन वाक्यांचा / धमक्यांचा अर्थ मला नीट कळायचा नाही, हल्ली हल्लीच कळला म्हणून अशा धमक्या देणाऱ्यांना (फुकटचा ) सल्ला देण्याचा

मोह अनावर झाला. कल्याणातले रस्ते बघितल्यावर शाळकरी मुलांनाही लगेच अर्थ कळू शकेल.
.
तुला रस्त्यावर आणेन म्हणजे जगातल्या सगळ्यात फालतू ठिकाणी तुला आणेन. खरं तर ह्यापुढे “रस्त्यावर आणेन” अशी साधीसुधी धमकी देणाऱ्यांनी “कल्याणातल्या रस्त्यावर आणेन “ अशी धमकी दिली तर समोरच्या वर त्याचा नक्की जास्त प्रभाव पडेल.
.
“तुझे रस्ते लावेन” म्हणजे तुझी जास्तीत जास्त वाट लावेन. असं म्हणायची पध्दतही बहुदा कल्याण मधल्या रस्त्यांची जी अवस्था असते त्यावरूनच रूढ झाली असणार. धमकी देणाऱ्याने नुसतं रस्ते लावेन म्हणण्यापेक्षा “कल्याणच्या रस्त्यांसारखे रस्ते लावेन” असं म्हणणं समोरच्यावर जास्त दहशत निर्माण करू शकेल.

आपला

(रस्त्यावरचा) कल्याणकर

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

उत्तरे सांगुन गेलो


मी मुक्याने मुक प्रश्न हाती तुझ्या ठेवुन गेलो
मी तुझ्या मौनात माझी उत्तरे सांगुन गेलो

श्वास माझे कोरडे अन कोरडे डोळे तरीही
मी स्वतःला नयनी तुझ्या का पुन्हा बुडवुन गेलो?

वाटले ती रात्र सरली, उगवेल आता पुन्हा नवे
मी धुक्यावर स्वप्न माझे तेव्हा पुन्हा खरडुन गेलो

विसरलो मी आठवांना, बुजवल्या मी साऱ्या खुणा
मी पुन्हा तो उकिरडा का उगा चिवडुन गेलो ?

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

एकदा आम्ही ठरवलं.....


एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं

मी रुसायचं गाल फ़ुगवुन
आणि तिने समजवायचं
ती गुदगुल्या करणार
मी खुदकन हसायचं

हसता हसता पाणि येइल डोळ्यात
तिने ओठांनी टिपायचं
मी मात्र तेव्हा लाजुन
तिलाच घट्ट बिलगायचं

मी हात फ़िरवायचा
तिच्या लांबसडक केसांतुन
गाणं सुद्धा गुणगुणायचं
तिने शांत पडुन रहायचं

कुशीत शिरेल तीच अचानक
मग तिनेच वादळ व्हायचं
मी मात्र तेव्हा
तिला अर्पण व्हायचं

बेभान होवुन मीही
देहात तिचं वादळ भिनवायचं
वादळ शमल्यावर दमलेल्या तिला
मी अलगद थोपटुन झोपवायचं

एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं