नुकतीच तुम्ही मा. राजसाहेबांची संपत्ती जप्त करायची वल्गना केलीत आणि तुमचा “कर्तव्यकठोर बाणा” बघून तुमचा खूप अभिमान वाटला. अशा प्रकारची “धडाडीची” कारवाई तुम्ही सातत्याने करत आलात पण “नजरचुकीने” काही प्रकरणे तुमच्या नजरेतून सुटून गेली. त्या प्रकरणांची आठवण करून देण्यासाठी हा पत्रप्रपंच.
साहेब .......
१ ) काही वर्षांपूर्वी तुम्ही डान्स बार “बंद म्हणजे बंद” ची घोषणा केलीत पण दुर्दैवाने आजही तेवढेच डान्स बार तेवढ्याच दिमाखात चालू आहेत. अधून मधून वृत्तपत्रांमध्ये धाडी पडल्याच्या, काहींना अटक झाल्याच्या बातम्या येतात पण एवढं मात्र खरं की परिस्थिती “जैसे थे” आहे. तुमच्या अधिकारात असलेल्या पोलिस दलावर तुमचा वचक राहिला नाही की लोक म्हणतात त्याप्रमाणे खरंच तुम्हालाही ह्या धंद्यातून काही “मिठाई” पोचतेय म्हणून दुर्लक्ष करताय ?
२ ) ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदानात आणि सी.एस.टी. परिसरात थैमान घातलं गेलं. ५८ पोलीस जखमी झाले, ६० / ७० गाड्या फोडल्या गेल्या, पत्रकारांना मारहाण झाली आणि महिला पोलिसांशी देखील गैरवर्तन करण्यात आले. कोट्यावधींच्या सरकारी आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान झालं. अमर जवान स्मारकाचं देखील नुकसान केलं गेलं. साहेब .........किती नुकसान भरपाई वसूल केलीत आजवर ?
३ ) मागच्या वर्षी सांगली महापालिकेची निवडणूक झाली. त्यापूर्वी सांगली आणि मिरजेत ज्यांच्यावर दंगल भडकविण्याचा आरोप होता त्या अज्जू पटेल, मैनुद्दीन बागवान सारख्या महाभागांना उमेदवारी देऊनच तुम्ही थांबला नाहीत तर चक्क त्यांच्यासाठी प्रचारसभा पण घेतलीत. त्यांच्याकडून किती नुकसान भरपाई वसूल केलीत ? नक्की काय संदेश देताय मतदारांना ?
४ ) तुमच्या जितेंद्र आव्हाडांकडून आजवर किती नुकसान भरपाई वसूल केलीत ? त्यांचं तर स्वतःच घर पण नाही महाराष्ट्रात कशी वसूल कराल नुकसान भरपाई ?
आदर्श घोटाळा असू दे किंवा हजारो कोटीचा सिंचन घोटाळा असू दे काही प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पण ठपका असलेल्या तुमच्या आणि तुमच्या मित्रपक्षातल्या नेत्यांचं काय वाकडं केलंत साहेब आजवर ?
कशाला उगाच सच्चेपणाचा आणि कर्तव्यकठोर वगैरे असल्याचा आव आणताय. ही असली “राज”कारणं तुम्हाला झेपणारी नाहीत.
परवा एकाशी बोलता बोलता सहज बोलून गेलो बघा पटतंय का ..........
“राजकारण करावं तर शरद पवारांनीच
बोलबच्चन तर काय आर. आर. पाटील पण आहेत”
आपला
एक बोलबच्चन
तुमच्याकडून “नजरचुकीने” काही घटना दुर्लक्षित झाल्या असाव्यात, कदाचित इथे दिलेल्या लिंक्स बघून तुम्हाला त्या कळतील