मुळ कन्नड लेखक - डॉ भैरप्पा
मराठी अनुवाद - उमा कुलकर्णी
भारतात आजही शास्त्रीय संगिताकडे आदराने पाहिलं जातं. एक अफ़ाट सामर्थ्य
लाभलेला कलाकार लाखो रसिकांच्या, जाणकारांच्या
मनांवर आपल्या प्रतिभेच्या जोरावर सहज ताबा मिळवु शकतो पण स्वतःच्या वासने समोर
मात्र हतबल होतो भरकटत जातो. शास्त्रीय गायनात आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा कायमच
श्रेष्ठ आणि पवित्र मानली गेलेली आहे पण त्यातही काळी बाजु आहेच. कदाचित अभावानेच
दिसणारी ही काळी बाजु दाखवायचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
आपल्या कडे असलेलं सर्वोत्तम ज्ञान आपल्या शिष्येला देण्याच्या बदल्यात
तिच्याकडुन तिचं पावित्र्य मागितलं जातं, गाण्याबद्दल
असलेल्या पराकोटीच्या आकर्षणातुन तीही तयार होते, गाणंही
शिकते पण त्याच्यातला "सामान्य माणुस" इथेच थांबत नाही, वासनेच्या वादळात भरकटत राहतो एक वेळ अशी येते की त्याचं अस्तित्वच पणाला
लागतं आणि त्याच्यातला कलाकार पुन्हा जागा होतो,पुन्हा
त्याची अस्मिता जागी होते, स्वतःच्या नाकर्तेपणाला लाथ मारुन
कष्टाने पुन्हा अजुन उंच शिखर गाठतो.
एका क्षणी अःतर्मुख होतो, पश्चातापाची
कबुली न देता, स्वतःचा अहंकार जपुनच उपभोगलेल्या, वापरलेल्या सर्व स्त्रीयांची समजुत काढायचा प्रयत्न करतो, अगदी पैशांचीही लालुच दाखवतो पण वेळ निघुन गेल्याचं जाणवल्यावर मात्र
निराश, हतबल होतो.
काही वेळा तडजोड म्हणुन काही वेळा खरोखरच्या प्रेमातुन तर काही वेळा निव्वळ
त्याची सेवा म्हणुन स्त्रीयांनी केलेलं समर्पण दाखवताना कुठेही हिडीसपणा न येता
खुप साधारण शब्दात त्या त्या प्रसंगाचं वर्णन येतं आणि त्या मागचा उद्देश किंवा
नायकाचं "जस्टीफ़िकेशन" आपल्याला आतुन पटलं नाही तरी आपण स्वीकारतो.
कादंबरीतील व्यक्तीरेखा काल्पनिक असल्या तरी त्या त्या क्षेत्राचं प्रतिनिधीत्व
करतात.
कितीही मोठा असला तरी प्रत्येक कलाकार आतुन एक माणुसच असतो हे मात्र संपूर्ण
कादंबरी वाचताना पुन्हा पुन्हा जाणवत राहतं



