गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०१५

झाडाझडती - विश्वास पाटिल



लेखक - विश्वास पाटिल

एकूणच ग्रामिण जीवनाचा, गावकीतल्या गुंतागुंतीच्या राजकारणाचा विश्वास पाटलांचा अभ्यास अचाट आहे. वरवर पाहता शांत एकसुरी आयुष्य जगणा-या ह्या एका गावावर धरणाचा नांगर फ़िरतो आणि गावच्या गाव देशोधडीला कसं लागतं त्याचं वर्णन ह्या कादंबरीत वाचायला मिळतं.

आपल्यासारख्या शहरी जीवनाला चटावलेल्या लोकांना धरण = वीज एवढंच गणित कळतं, अधिकाधीक वीज उत्पादनासाठी अधिकाधीक धरणं बांधायला हवीत अशी किमान माझी तरी अपेक्षा असायची. पण अशा धरणांखाली गाडल्या गेलेल्या गावांची, गावक-यांच्या स्वप्नांची मोजदाद करायला आपल्याला वेळ तरी कुठे असतो.

गावातलं वातावरण, तिथलं राजकारण तिथली शासनव्यवस्था आपल्याला आधी अनाकलनीय वाटल्या तरी कादंबरी अर्धी वाचुन होईपर्यंत आपल्या अंगवळणी पडतात. सर्वस्व पणाला लागलेल्या धरण विरोधी लढ्यातही आपलं, आपल्या जातीचं वेगळेपण शाबुत ठेवण्यासाठीची धडपड बघुन कीव करावीशी वाटली तरी त्या गोष्टी टाळता येण्यासारख्या नसतात.


पाटलांनी उभ्या केलेल्या प्रत्येक व्यक्तीरेखेला वेगळं अस्तित्व आहे, प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्यासमोर वेगवेगळे प्रश्न उभे करते. देशाच्या, राज्याच्या भल्यासाठी शेतक-यांनी घरादाराची होळी करायची आणि राजकारण्यांनी तोंडाला पानं पुसायची हा प्रकार आता नवा राहीलेला नाही. 

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

मंद्र - डॉ भैरप्पा



मुळ कन्नड लेखक - डॉ भैरप्पा
मराठी अनुवाद - उमा कुलकर्णी

भारतात आजही शास्त्रीय संगिताकडे आदराने पाहिलं जातं. एक अफ़ाट सामर्थ्य लाभलेला कलाकार लाखो रसिकांच्या, जाणकारांच्या मनांवर आपल्या प्रतिभेच्या जोरावर सहज ताबा मिळवु शकतो पण स्वतःच्या वासने समोर मात्र हतबल होतो भरकटत जातो. शास्त्रीय गायनात आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा कायमच श्रेष्ठ आणि पवित्र मानली गेलेली आहे पण त्यातही काळी बाजु आहेच. कदाचित अभावानेच दिसणारी ही काळी बाजु दाखवायचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

आपल्या कडे असलेलं सर्वोत्तम ज्ञान आपल्या शिष्येला देण्याच्या बदल्यात तिच्याकडुन तिचं पावित्र्य मागितलं जातं, गाण्याबद्दल असलेल्या पराकोटीच्या आकर्षणातुन तीही तयार होते, गाणंही शिकते पण त्याच्यातला "सामान्य माणुस" इथेच थांबत नाही, वासनेच्या वादळात भरकटत राहतो एक वेळ अशी येते की त्याचं अस्तित्वच पणाला लागतं आणि त्याच्यातला कलाकार पुन्हा जागा होतो,पुन्हा त्याची अस्मिता जागी होते, स्वतःच्या नाकर्तेपणाला लाथ मारुन कष्टाने पुन्हा अजुन उंच शिखर गाठतो.

एका क्षणी अःतर्मुख होतो, पश्चातापाची कबुली न देता, स्वतःचा अहंकार जपुनच उपभोगलेल्या, वापरलेल्या सर्व स्त्रीयांची समजुत काढायचा प्रयत्न करतो, अगदी पैशांचीही लालुच दाखवतो पण वेळ निघुन गेल्याचं जाणवल्यावर मात्र निराश, हतबल होतो.

काही वेळा तडजोड म्हणुन काही वेळा खरोखरच्या प्रेमातुन तर काही वेळा निव्वळ त्याची सेवा म्हणुन स्त्रीयांनी केलेलं समर्पण दाखवताना कुठेही हिडीसपणा न येता खुप साधारण शब्दात त्या त्या प्रसंगाचं वर्णन येतं आणि त्या मागचा उद्देश किंवा नायकाचं "जस्टीफ़िकेशन" आपल्याला आतुन पटलं नाही तरी आपण स्वीकारतो.

कादंबरीतील व्यक्तीरेखा काल्पनिक असल्या तरी त्या त्या क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात.


कितीही मोठा असला तरी प्रत्येक कलाकार आतुन एक माणुसच असतो हे मात्र संपूर्ण कादंबरी वाचताना पुन्हा पुन्हा जाणवत राहतं 

मंगळवार, ६ जानेवारी, २०१५

गाडी चालवताना तुम्ही ह्या अशा मोकाट कुत्र्यांची काळजी नाही घेतलीत तरी चालेल












रस्त्यावर गाडी चालवताना तुम्ही ह्या अशा मोकाट कुत्र्यांची काळजी नाही घेतलीत तरी चालेल ...........
कारण बिचारे अजून Whatsapp आणि Facebook च्या आहारी गेले नाहीयेत
......त्यांचं डोकं ठिकाणावर असतं आणि लक्ष रस्त्यावर असतं