मंगळवार, ८ मार्च, २०१६

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधुन मी जाहिर करतो की ......माझ्या परिचयातल्या बहुतांश बायका / मूली ह्या.......अत्यंत .........शिष्ठ........ भांडकुदळ...…....पैशाला चिकट........मारकुट्या...... .मठ्ठ....... .आळशी.......दिवसभर सेल्फ़ी काढत T P करणाऱ्या........ किंवा WA आणि फेसबुकवर पडिक असणाऱ्या ......कुचकट ........ वगैरे नाहीत हे मला (आजच्यापुरतं तरी) मान्य आहे.

एक जात सगळ्यां सुस्वभावी ....... बुद्धिमान ......समजुतदार.......प्रेमळ..........मितभाषी.......समजुतदार आहेत अशी मला ...........शंका आहे

इथे जर "चुकून" कोणाच्या अवगुणांचा उल्लेख झाला असेल तर निव्वळ योगायोग समजावा ही विनंती

साधासुधा
महेंद्र कुलकर्णी

शनिवार, ५ मार्च, २०१६

मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी

आज संध्याकाळी कल्याण रेलवे स्टेशनच्या बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांचं सामानसुमान जप्त करून महानगरपालिकेच्या गाडीत भरुन नेते होते......

थोडंसं पुढे एस टी स्टॅंड च्या समोर चार चार रांगा करून ....80% रस्ता अडवून रिक्षा उभ्या केल्या जातात ...... ह्या रिक्षा आणि टोळकी करून बिड्या ओढ़त आजुबाजूला उभे असलेले रिक्षा चालक पण त्याच गाडीत भरून नेता नाहीत का येणार ? रहदारीची कोंडी तरी कमी होईल

जाता जाता रस्त्याच्या माधोमध चालताना मोबाइलवर बोलत किंवा कानात बुचं घालून गाणी ऐकत बागडणारे दहा पंधरा मोबाइलकुमार आणि मोबाइलकुमारी पण त्याच गाडीत भरून न्यायला हरकत नाही

गुरुवार, ३ मार्च, २०१६

व्यवहारज्ञान.........आणि समयसूचकता



गेली दहा वर्ष “पूर्णवेळ” व्यवसाय करूनही काही गोष्टी मला आत्मसात करता आलेल्या नाहीत. कदाचित “गाणं” जसं रक्तात असावं लागतं तशाच ह्या गोष्टी रक्तात असाव्या लागतात.
साधारण १० / १२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. मी नविनच मोटरसायकल घेतलेली. तेव्हा ऑफिस चर्नी रोडला  म्हणजे गिरगावात होतं. कल्याणपासून by road अंतर होतं ६० किलोमीटर. तरीही आठवड्यातून चार दिवस मी मोटरसायकल घेऊन ऑफिसला जायचो. कल्याणला राहणारे आणि माझ्यासारखेच किडे असणारे काही मित्र जाता येताना बरोबर असायचे.

इम्रान नावाचा माझा एक मित्र म्हणजे अस्सल नमुना.... बऱ्याचदा इम्रानच माझ्या बरोबर असायचा. त्याचं ऑफिस तेव्हा नरीमन पॉइंटला होतं. संध्याकाळी निघताना एकमेकांना फोन करायचा आणि मी त्याला सी.एस.टी. स्टेशनच्या समोरून pickup करायचं असं आमचं ठरलेलं असायचं.

त्या दिवशीही तसंच त्याला घेतलं आणि भायखळ्याला पोचलो तेव्हा आठवलं, एका मित्राच्या मुलाने क्रिकेट साठी जे सीझनचे बॉल  लागतात ते आणायला सांगितलेले. हे बॉल मिळतात अहमदाबाद स्पोर्ट्स नावाच्या दुकानात मेट्रोजवळ. म्हणजे पुन्हा ट्राफिक मधून रांगत भायखळा ते मेट्रो उलटं जावं लागणार होतं, साधारण ८ किलो मीटर. बॉल नेले नसते तर मित्राच्या लेकाने क्रिकेटची Bat डोक्यात घालायची खूप शक्यता होती.

परत फिरावं लागणार हे इम्रानला सांगितलं, त्याची काहीच हरकत नव्हती. तेवढ्यात समोर यु टर्न मारायला जागा दिसली पण........... तिथे यु टर्न चालणार नसल्याची पाटी होती. पुढे जायला लागणार होतं. मी विचार करत होतो, पुढे लवकर यु टर्न मारता येण्याची शक्यता कमी होती.

“भाई तू मार यु टर्न कूछ नहीं होगा” इम्रानने “ग्यारंटी” दिली. मी पटकन त्या पाटीकडे दुर्लक्ष करत यु टर्न मारला..........आणि .......रस्त्याकडेच्या झाडाआडून बरोबार .......पोलिसमामा दत्त म्हणून समोर अवतरले.

हो.... नाही .....पाटी दिसलीच नाही .......खूप अर्जंट काम आहे .......वगैरे वगैरे सांगून झालं ............शेवटी मामा शंभरवरून पन्नास रुपयात सोडायला तयार झाले. मी पैसे दिले मामा दुसरा बकरा शोधायला झाडामागे चाललेच होते.

“ओ साब एक मिनिट इधर आओ” इम्रानने हाक मारली ....माझ्या पोटात गोळा आला, आता हा बाबा वाद घालतो की काय म्हणून. तोवर मामा जवळ आले
“मेरेको बीस रुपये दो वो पचास मे से” इम्रानने मामांना सांगितलं. मामांच्या आणि माझ्याही चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं इम्रानच पुढे बोलला......
“मैने इसको बोला यु टर्न मारनेको इस के लिये इसने यु टर्न मारा............मेरी वजह से आप को पचास मिला तो उसमेसे मेरेको भी मिलना चाहिये ना साब” शक्य तेवढ्या निरागस आवाजात इम्रान बोलला............मी गाडी stand वर लावून हसत सुटलो ...........मामांना काय बोलावं तेच सुचलं नाही ...........हसत हसत त्यांनी माझी ५० ची नोट इम्रानच्या हातावर ठेवली आणि हसत हसतच जायची खूण केली (मनातल्या मनात साष्टांग नमस्कार पण घातला असणार)

आम्ही अहमदाबाद स्पोर्ट्स मधे गेलो मग कल्याण कडे निघालो. आता हा माझे माझे पन्नास परत करणार की स्वतःकडेच ठेवणार ह्याचा विचार करत आम्ही कल्याणला पोचलो. इम्रानच्या घराजवळ सोडल्यावर पठ्ठ्या सरळ चालू पडला. म्हटलं च्यायला गेले पन्नास.....जाऊ दे गेलेलेच होते. पण मग थोडा विचार करून इम्रानला आवाज दिला

“इम्रान यार इधर आ.........साले तेरेको शरम नहीं आती ? सी.एस.टी. से यहां तक मेरे गाडी पे आरामसे बैठ के आया ....पेट्रोल का आधा पैसा तो दे” त्याच्या कडून जे व्यवहारज्ञान शिकलो ते मी त्याच्यावरच वापरलं.

“भाई देने के लिये तो मै आधा क्युं पुरा पैसा दे दु .....लेकीन अगर किसी को येह समझा तो तेरी क्या इज्जत रहेगी ? लोग सोचेंगे तू मेरे लिये रिक्षा चला रहा है .......यार तू इतना बडा आदमी .....येह अच्छा दिखेगा क्या ?
मगासच्याच निरागस आवाजात ......चेहेऱ्यावर तेवढीच निरागसता ओतून इम्रानने उत्तर दिलं
च्यायला आला का “इज्जत का सवाल” त्यात आणि “बडा आदमी” वालं चोकलेट.............मी काही विचार करून उत्तर देईपर्यंत “इम्रान भाईनी” त्यांच्या बिल्डींगच्या पायऱ्या चढायला सुरुवात पण केली.

आजतागायत ना ते पन्नास रुपये आणि पेट्रोलचे अर्धे पैसे त्याने मला देऊ केले ना मी मागायच्या फंदात पडलो .........ज्या गुरुकडून जे शिकतो ते त्याच्यावर वापरायचं नाही एवढं मात्र शिकलो.

म्हणून मला मनापासून वाटतं व्यवहारज्ञान .........आणि समयसूचकता ह्या गोष्टी रक्तातच असाव्या लागतात कोणी तरी शिकवून त्या येत नाहीत.


शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

भाजपची देशभक्ती

भाजपने सोशल मिडीयावर देशभक्ती शिकवत फिरणारं त्यांचं श्वानपथक आवरायला तरी हवं किंवा त्यांना देशभक्तीची Certificates विकणारं वेगळ दूकान तरी काढून दयायला हवं.

काश्मीर मध्ये ते अब्दुल्ला बापलेक आणि पीड़ीपी हे दोन्ही पक्ष "कुंपणावरचेच" आहेत की मग तिथे तुम्ही काहीही "राजकीय तडजोडी" केल्या ते चाललंच ना ?

मी जे दुकान काढून Certificates विकायचं सुचवतोय त्यातही बरेच पर्याय आहेत. म्हणजे 

"अट्टल देशभक्त" ....
"कुंपणावरचा देशभक्त" ....
"प्रादेशिक देशभक्त....
"धर्मनिरपेक्ष देशभक्त"...
"हिंदुत्ववादी देशभक्त"
"मुस्लिम देशकभक्त".....
"जेमतेम देशभक्त"  ....
दुकानदारी काही भाजपसाठी नविन किंवा अशक्य गोष्ट नाही. त्यातून आता आमिर खान सारखा "अट्टल देशभक्त" पण आहेच हाताशी ..... सलमान पण सुटलाच आहे.
मस्त प्रमोशन करतील दुकानाचं ....... अजिबात पैसे न घेता.

बाबांनो देशाच्या नाशिबाने कधी नव्हे ते मोदींसारखं कणखर  नेतृत्व ह्या देशाला मिळालंय. ते जे काही करताहेत ते लोकांपर्यम्त पोचवण्यासाठी तुमची विद्वत्ता आणि वेळ खर्ची घाला.

तुमची अक्कल पाजळुन जो तरुण वर्ग मोदींच्या पाठीशी उभा राहतोय त्यांना संभ्रमित करू नका ....... ह्या तरुणाईला तुम्ही केलेल्या देशभक्तीच्या सगळ्याच व्याख्या कळतील आणि पटतील असं गृहीत धरु नका.
तुम्हाला काय तुमच्या व्याख्या नाही पटल्या तर तुम्ही ह्या तरुणाईला पटकन देशद्रोही ठरवून मोकळे व्हाल पण मग राजकारण्यासारखी हे शिक्के सहन करण्याएवढी निगरगट्टता ह्या तरुणाईत असेलच असं नाही.

ते दुकानाचं मात्र बघाच........ असंख्य बेरोजगार विद्वानांना ..... रोजगार तरी उपलब्ध होईल .......