दोन तीन दिवसांपूर्वी कल्याणात मध्यरात्री कधी तरी एक रिक्षा जाळण्यात आली ...........झालं ....लगेच ब्रेकिंग न्यूजला चटावलेले पत्रकार कामाला लागले आणि राजसाहेबांवर खापर फोडून मोकळे झाले. त्यातल्या त्यात जनाची नाही तर मनाची लाज बाळगून काहींनी बातमी देताना एक प्रश्नचिन्ह मात्र आठवणीने टाकलं.
मध्यरात्री गाड्या जाळण्याचे प्रकार ह्या पूर्वी झालेले नाहीत का ? कोणी तरी विकृत व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट हे प्रकार गेली अनेक वर्ष करतो आहे हे सगळ्यांनाच माहित आहे..........नशीब त्यामागे पण मनसेच आहे असा "सनसनीखेज" वगैरे खुलासा नाही केला ह्या विद्वान पत्रकारांनी.
मनसे असेल किंवा कोणतेही इतर राजकीय पक्ष असतील जी काही आंदोलने करायची ती उघडपणे करतात .......लपून छपून तुमची ती “स्टिंग ऑपरेशन” केली जातात आंदोलने नाहीत हे तुम्हाला समजायला काहीच हरकत नव्हती.
कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षांनी काय आदेश दिलाय आणि तो कधी पाळायचा आहे हे जेवढं त्यांच्या कार्यकर्त्यांना कळतं तेवढंच जनतेलाही कळतं .........उगाच ब्रेकिंग न्यूजच्या पुड्या सोडून आणि जनतेची दिशाभुल करून तुम्ही तुमची TRP ची पोळी कशाला भाजून घेताय ?
चला असं धरून चालू की राजसाहेबांनी केलेलं भाषण प्रक्षोभक होतं TRP खेचण्यासाठी होतं, पण त्याचा आणि एका निरपराध मराठी माणसाची रिक्षा जाळण्याचा संबंध कसा काय लावू शकता तुम्ही? त्या भाषणाबद्दल तुम्ही लिहा ..........तो तुमचा अधिकार आहे ........टीका करा तोही तुमचा अधिकार आहे........पण न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नका .......ते तुमच्या मर्यादेचं उल्लंघन आहे.
“नागरीकांकडून अमुक भावना व्यक्त होत आहे” किंवा “नागरिक रोष व्यक्त” करत आहेत अशी विधानं जेव्हा तुम्ही तुमच्या बातमीत छापता तेव्हा किती नागरीकांना खरंच विचारता ? त्यातले ते “नागरिक” म्हणजे निव्वळ तुमचे आश्रयदाते असतात हे आता सगळ्यांनाच कळायला लागलंय.
राज साहेब काय बोलले आणि बोलले ते बरोबर की चूक हा माझ्या ह्या लेखाचा विषय नाही. जी बातमी तुम्ही देताय ती बातमी फक्त द्या, त्याचा अर्थ लावायचं काम तुमचे वाचक करतील. अर्थ लावायची अक्कल त्यांना आहे असं गृहीत धरायला काय हरकत आहे?. त्या बातमीचा तुम्हाला लागलेला अर्थ पण छापा पण तो अर्थ नागरिकांच्या नावावर खपवू नका.
गेल्या पंचवीस वर्षात मी जेवढे राजकारणी जवळून बघितलेत तेवढेच पत्रकार देखील बघितलेत. ज्यांच्या वृत्तपत्राचं नाव पण कधी ऐकलेलं नसतं, जे अख्खा दिवस महापालिकेत पडीक असतात त्यांचा चरितार्थ त्या २/४ हजार खप असलेल्या वृत्तपत्राच्या नोकरीतून कसा भागतो हा प्रश्न सामान्य नागरीकांना पडू शकतो ........मला नाही.
नगरसेवकांच्या १५ / २० फुट लांबीच्या गटाराच्या कामाच्या भूमीपूजनाच्या बातमीसाठी पण रांगेत उभं राहून पाच पाचशे रुपयांची पाकिटं घेणारे पत्रकार बघितलेत मी. ज्याला त्याला नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार दिला कोणी ह्या पत्रकारांना ? राजकारणी देतात म्हणून आम्ही घेतो असं तुमचं म्हणणं असू शकेल पण तृम्ही घेता म्हणून राजकारणी देतात ही वस्तुस्थिती आहे.
मुळात हल्ली पत्रकारांनी राजकारण्याना तत्त्वनिष्ठा वगैरे शिकवणं म्हणजे मल्लिका शेरावतने सनी लीओनी ला पावित्र्यावर प्रवचन देण्यासारखं वाटतं मला.
हे मी जे काही लिहीलंय त्यातून मला कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला योग्य ठरवायचं नाहीये...... पण हो .....ब्रेकिंग न्यूजला चटावलेल्या पत्रकारांच्या बुद्धीमत्तेबदल आणि नीतीमत्तेबद्दल निश्चित प्रश्नचिन्ह उभं करायचं आहे.