
AM-PM 24 Hrs Hospital (बैल बाजार ) …………इस्पितळ ? हॉटेल ? की दुकान ? काहीच नाही निव्वळ अनास्था –
निष्काळजीपणा – आणि पेशंटच्या जीवाशी खेळ
सासऱ्यांना पायाला छोटीशी जखम झाली, सासरे मधुमेही, शंका नको म्हणून नेहेमीच्या
डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टरांनी जोखीम नको म्हणून सर्जनला दाखवून सल्ला घ्यायला
सांगितलं. जवळच्याच ( बैल बाजार कल्याण पश्चिम ) “AM-PM 24 Hrs” Hospital मध्ये आवश्यक सोय असून तिथे उपचार करून घ्यायला सुचवलं.
ज्यां डॉक्टरांनी सुचवलं त्यांच्याशी गेली २० वर्षं कौटुंबिक संबंध आहेत. आम्ही शनिवारी
संध्याकाळी “AM-PM 24 Hrs Hospital” हॉस्पिटल गाठलं तिथल्या डॉक्टरांनी तपासलं आणि लगेच
हॉस्पिटल मध्ये दाखल करून घ्यायला सांगितलं. आम्ही लगेच तयारी चालू केली आणि त्या
क्षणापासून प्रत्येक क्षणी डोकं आपटून घ्यावसं वाटायला लागलं.
हॉस्पिटल मध्ये दाखल करून घ्यायचा निर्णय झाल्या क्षणी तिथल्या ऑफिस मधला एक
कोटवाला हातात “टेरिफ कार्ड “ फडकावत आला, फटाफट उपलब्ध असलेले डिलक्स , स्पेशल
आणि जनरल “wards” दाखवले. स्पेशल रुमचं महत्त्व तीन तीनदा सांगूनही आम्ही बधलो
नाही मग अनिच्छेने आमच्या सासऱ्यांसाठी पुरुषांच्या जनरल एसी ward मध्ये बेड तयार
झाला. मग ८ ते ११ म्हणजे साधाराण ३ तास ताटकळत ठेवल्यावर आम्हाला बेड चा ताबा
मिळाला( एवढ्या वेळात सरकारी हॉस्पिटल मध्ये पण ६ वेळा Admit झाले असते सासरे). त्या
दरम्यान X Ray काढायचा होता पण Technician उपलब्ध नव्हता, त्यात अर्धा पाउण तास
गेला. एकूणच ह्या ह्या तीन तासात धड कोणाकडे कसली उत्तरंच नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सलाईन बदलायला एक भगिनी ( sister ) आली काही तरी गडबड झाली
आणि सासऱ्यांचं बरंच रक्त फरशीवर सांडलं. “भगिनी” ची चूक झाली, दुर्लक्ष झालं की
सासऱ्यांच्या रक्ताची चूक झाली ते काही कळालं नाही. सासूबाईनी जाऊन सांगितल्यावर
रक्त पुसून घेतलं गेलं
१२ वाजता होणार असलेल्या सर्जरीसाठी १ वाजता त्यांना नेलं पण ज्या ऑपरेशन थिएटर
मध्ये सर्जरी होणार होती तिथे टेबल पूर्ण उघडलं की डॉक्टरना जागा उरत नव्हती आणि
नाही उघडलं तर सासरे मावत नव्हते. शेवटी छिन्नी हातोडी घेऊन माणूस बोलावला गेला. काही
तोडफोड ( अर्थातच भिंतीची ) करून पाउण तासाने एकदाची सर्जरी चालू झाली.
सासरे सुखरूप बाहेर आले. डॉक्टरांनी थोड्या वेळाने येऊन रक्तदाब आणि “शुगर” तपासली
आणि “All is well” सांगून लगेच काहीही खायला न देण्यासंबंधी बजावून डॉक्टर गेले. ५
मिनिटात एक “Lab” मधली भगिनी ( sister ) आली आणि सासूबाईना सांगितलं त्यांना
जेवायला द्या आता आणि काही त्रास झाला तर मला सांगा. मी उडालोच तिला विचारलं “तुम्ही
डॉक्टर आहात का ?” म्हणे “नाही” मी सांगितलं “माझे सासरे “कट्टर मधुमेही” आहेत आणि
डॉक्टरांनी अजून किमान ३/४ तास खायला देऊ नका असं सांगितलंय “ओह असं का .....एवढं
बोलून भगिनी चालू पडल्या. मग मात्र माझं डोकंच सणकलं. माझा आवाज चढल्यावर पळापळ
झाली थोड्या वेळाने डॉक्टर आले त्यांना
आदल्या दिवशी पासूनची कर्मकथा सांगितली त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिला आणि
काहीही त्रास असेल तर ताबडतोब फोन करायला सांगितलं.
दाखल केल्याचा तिसरा दिवस म्हणजे सोमवार कसा बसा काचेतून येणाऱ्या उन्हाच्या झळा
सोसत पार पडला ( एसी Ward चे पैसे लागतील पण एकाच पेशंट साठी एसी लावला जाणार नाही
ही आधीच स्पष्ट केलेलं होतं ) संध्याकाळी सौ. नी विचारल्यावर उद्या discharge देतो
असं डॉक्टरांनी सांगितलं. आम्ही खुश. मी ऑफिसला दांडी मारली आणि सकाळी हॉस्पिटल ला
गेलो. दुपार झाली तरी डॉक्टरांचा पत्ताच नाही. तिथे काम करणाऱ्या कोणालाही डॉक्टर
कुठे आहेत, कधी येणार याबद्दल काहीही कल्पना नव्हती . वाट बघून शेवटी फोन केला
तेव्हा discharge बद्दल डॉक्टरांनी कानावर हात ठेवले. संध्याकाळी एकदाचे डॉक्टर
आले. आम्ही विनंती केली आणि कसंबसं डॉक्टरांनी discharge द्यायचं मान्य केलं.
आता बिल............. बिल बघितलं आणि डोळे पांढरे व्हायची वेळ आली. करण्यासारखं
काहीच नव्हतं.... बिल भरलं ........आभारप्रदर्शन आटोपलं आणि निघालो. विचार करता
करता काही प्रश्न पडले.
१. जेमतेम १ महिना झाला हॉस्पिटल चालू होऊन तरी तिथे एवढे पेशंट कसे ? झाडून
सगळ्या क्लिनिक्सना हेच हॉस्पिटल “बेस्ट” वाटू लागलंय का ?
२. स्पेशल रूममध्ये पेशंटला बाथरूम साठी ३ मोठ्या पायऱ्या चढाव्या लागतात. हॉस्पिटल
साठी हे असलं डीझाईन कोणत्या शाळेत शिकवतात ?
३. लिहून दिलेली औषधं आम्ही हॉस्पिटलच्या स्टोअर मधून घ्यायचो नाही. पण एक
गोळी कुठेच मिळत नव्हती ती घ्यायला तिथे गेलो. तिथल्या मुलीने बाकीची औषधं कुठून
घेतली त्याची चौकशी केली. “बाहेरून” म्हटल्यावर शोधायची थोडीही तसदी न घेता “ही गोळी नाही मिळणार “ सांगून हात झटकले. ह्याला
काय म्हणायचं ?
४. ज्या मजल्यावर हॉस्पिटल आहे त्या मजल्यावर अजूनही कोणतेही ऑफिस, हॉटेल
किंवा कोणताही व्यवसाय चालू झालेला नाही. कामे चालू आहेत. धूळ आणि प्रचंड आवाज
चालू असतो. दुसऱ्या मजल्यावर स्ट्रेचर वरचा पेशंट लिफ्ट मधून येउच शकत नाही मग हे
हॉस्पिटल घाई गडबडीने इथे चालू करायला परवानगी कशी मिळाली ?
आज हा लेख लिहीण्याचं कारण आता सांगतो .........सकाळी आईला आमच्याकडे घरकामाला
येणाऱ्या बाईने तिला तिच्या आयुर्वेदिक डॉक्टर नी दिलेली चिठ्ठी दाखवली. बाईच्या
मुलीला चप्पल चावलीये ( पायालाच ) आणि त्या साठी तिला नेमक्या “AM-PM 24 Hrs
Hospital” मध्ये जायचा सल्ला दिला गेलाय ..........च्यायला काय नेटवर्क आहे. माझ्या
ऑफिसमधल्या सेल्स टीम ला मी आता ह्या AM-PM 24 Hrs Hospital च्या मालकांकडे शिकायला
पाठवणार आहे.
निघताना सासऱ्यांची जखम बघितली ........बिचारी लाजून स्वत:ची स्वतःच बरं
व्हायचं म्हणतेय.
मी केला गाढवपणा ......तुम्ही करू नका उपचार फुकट असतील तरी नको तिथले डॉक्टर
अविनाश सोडले तर मुर्खांचा बाजार आहे .........लुटमार आहे.