मी आणि माझा आत्माराम, जन्मलो एकाच वेळी
मी छान गोरापान आणि तो माझी सावली काळी
जाणवलच नव्हत कधी त्याच माझ्यामधे असणं
माझ्या अंतरंगात अलगद त्याच मिसळणं
नेहेमी उशिराच ऐकु यायचं मला त्याचं बोलणं
मला समजत नाही का सलायचं त्याचं जाब विचारणं
कळायला लागल्यापासुन हे असच चाललय
माझ्या वागण्यावर त्याचं लक्ष वाढलय
मी चुका करतो लोकांना त्याचा त्रास होतो
मला समजत नाही त्यासाठी हा मला का छळतो
हा माझा असुनही माझ्याशी लढतो
कायम पाप पुण्याच्या गोष्टी करतो
येता जाता आमचा संघर्ष चालतो
मला समजत नाही लढण्याचं बळ कुठुन आणतो
सतत काही तरी मागत राहतो,
दिल्यावर थोडा वेळ सुखावतो
माझं दुःख बघुन हाही रडतो
मला समजत नाही हा असा का वागतो
मला नेहेमीच मरणाची भिती वाटते
त्याला मात्र ती एक नवी सुरुवात वाटते
त्याला माझ्या मधे राहाणं ही शिक्षा वाटते
मला समजत नाही मरणात त्याला सुटका का वाटते
मलाही गुढ वाटतं त्याच्या असल्या वागण्याचं
मी जाइन तिथे त्याचं माझ्याबरोबर असण्याच
हल्ली असह्य झालय त्याच्या तालावर नाचायचं
खुप ओझं वाटतय त्याच्याबरोबर जगायाचं
कधी वाटत संपवुया सारं, मरुयात एकदाचे
भोगु देत त्यालाही आता क्षण स्वातंत्र्याचे
सोसु देत त्यालाही चटके डोक्यावरच्या उन्हाचे
झेलु देत चेहेरयावर थेंब वादळी पावसाचे
पण त्याला मात्र माझ मरण मान्य नाही
माझ्याशिवाय त्याचं अस्तित्व त्याला पटत नाही
उलट मलाच कळु लागलय त्याचं दुःख
मला तरी कुठे शक्य आहे त्याच्याशिवाय जगणं
1 टिप्पणी:
खूप, खूप आवडली !
टिप्पणी पोस्ट करा