गुरुवार, २३ जुलै, २०१५

पर्व - डॉ. एस. भैरप्पा


मुळ कन्नड लेखक डॉ. एस. भैरप्पा

अनुवाद उमा कुलकर्णी

माझ्या अंदाजाने महाभारत हा एक असा विषय आहे ज्यावर आजवर सगळ्यात जास्त लिहीलं आणि वाचलं गेलंय. मी आजवर वाचलेल्या आणि मला कळलेल्या महाभरतापेक्षा सर्वस्वी वेगळं "महाभारत" डॉ. भैरप्पानी "पर्व" मधे मांडलंय.

आजवर महाभारत म्हणजे चमत्कार आणि अमानवीय शक्ती प्राप्त असलेल्या चांगल्या / वाईट व्यक्तींमधला संघर्ष इतकंच कळलं होतं. पर्व मधे डॉ. भैरप्पानी चमत्कार किंवा अमानवीय गोष्टींना फ़ाटा दिलाय. चमत्कार गाळल्यामुळे कोणतीही व्यक्तीरेखा छोटी होत नाही उलट त्यामुळे प्रत्येक घटनेची कारणमिमांसा करणं सोपं झालं.

पर्वमधे चमत्कार नाहीत, प्रत्येक व्यक्तीरेखेला मानवी चेहेरा मिळालाय तसंच त्यांचं वागणं बोलणं त्यांच्या भावना ह्या प्रत्येक गोष्टीला human touch मिळाल्यामुळे पुस्तक वाचताना नकळत आपण स्वतः देखील महाभरताचा एक भाग बनुन जातो. चुक की बरोबर हे जरी ठरवता नाही आलं तरी प्रत्येक घटनेची माझ्या परीने मला कारणं शोधता आली.

डॉ. भैरप्पानी मांडलेले दोन मुद्दे पटले आणि मनात कायमचं घर करुन बसले.

१. युधिष्ठीराच्या जुगारातल्या पराभवाबद्दल लिहीताना डॉ. भैरप्पा म्हणतात ध्युत खेळायला संपत्ती लागते पण जिंकण्यासाठी अजुनही बरंच काही लागतं.
२. द्रौपदी बद्दलच्या इतरांच्या लालसेबद्दल लिहीताना डॉ. भैरप्पा म्हणतात पाच पतींबरोबर संसार आणि पर्यायाने शय्या सोबत करणाऱ्या स्त्री बद्दल समाजात जरा जास्तच लालसा निर्माण होते.

महाभारत एका वेगळ्या अर्थाने समजुन घ्यायचं असेल तर अवश्य वाचावं असं पुस्तक.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: