मंगळवार, १० मार्च, २०१५

एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर



लेखिका – वीणा गवाणकर

आजपासून साधारण दीडशे वर्षांपूर्वी कापसावर अवलंबून असणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी “देवदूत” ठरलेला एक कृष्णवर्णीय संशोधक म्हणजे  “कार्व्हर” आयुष्यभर फक्त कष्ट आणि कष्टच उपसत, सरळ संपन्न आयुष्य नाकारून समाजासाठी, सामान्य शेतकऱ्यांसाठी राबलेला एक “संत” असंच त्याच्या बाबतीत म्हणावं लागेल. वर्णभेदाच्या झळा सोसूनही कोणताही द्वेष मनात न ठेवता सर्वांसाठीच आयुष्यभर झटला हा प्राणी.
अफाट बुद्धिमत्ता, कमालीचा सोशिक स्वभाव स्वीकारलेल्या कामावरची निष्ठा अशा गुणांचं अनोखं रसायन असणारा कार्व्हर वीणा गवाणकरांनी खूप ताकतीने मांडलाय.

१००% संग्रही असावं असं पुस्तक 

गुरुवार, ५ मार्च, २०१५

चंद्रमुखी - विश्वास पाटील

लेखक - - विश्वास पाटील

विश्वास पाटलांची जवळपास सर्व पुस्तकं मी वाचलेली आहेत साधी सरळ भाषा, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची अफ़ाट ताकद.

ग्रामिण जीवनाचं दर्शन घडवतानाच राजकारणातल्या खाचाखोचा सहज आपल्यासमोर उलगडत जातात. कादंबरीतली कुठलीच व्यक्तीरेखा "माणुसपणाच्या" सीमा सोडत नाही. आपल्या आजुबाजुलाच कादंबरी घडत जातेय असं वाटत रहातं

राजकारण, सत्ता अशा दगडी किना-यांवरुन वाहतानाच कादंबरीचा प्रवाह स्त्रीमन उलगडुन दाखवताना मात्र वरुन कितीही आक्रस्ताळा वाटला तरी आतुन खुप हळुवार होतो. विश्वास पाटलांची हीच खरी ताकद.

एका तरुण तडफ़दार राजकारण्याला पडलेलं रांगडं स्वप्न म्हणजे................... चंद्रमुखी,

प्रियकरासाठी अवघं आयुष्य एका क्षणात उधळायला तयार होणं काय असतं ते जी सांगते ती................... चंद्रमुखी

पैशांसाठी कला, शरीर आत्मा सगळं विकुनही माणुसपण टिकवते ती................ चंद्रमुखी

पोकळ समाजनियम लाथेने  उडवुन लावते, प्रसंगी वाघिणीसारखी तुटुन पडते ती............... चंद्रमुखी.

संपुर्ण कादंबरी नायिकेभोवती फ़िरते, तिच्या भावभावना उलगडुन दाखवते, तिच्यावरचा अन्याय मांडते तरीही कुठेही रडकथा न होता उलट चंद्रमुखी अंगावरच येते.

एक तरुण राजकारणी एका कलावंतीणीच्या प्रेमात पडतो, तीही काही काळ वाहवत जाते, दोघांना जाग येते तेव्हा त्याला जाणवतं त्याची संपुर्ण कारकीर्द पणाला लागलेली आहे. जिच्यावरच्या प्रेमामुळे ही वेळ आली तीच शेवटी त्याला सगळ्यातुन बाहेर काढते. एखादया स्वप्नातुन जागी व्हावी तशी आपल्या आयुष्यात परतते. जणु भीक म्हणुन त्याला त्याचं आयुष्यच देउन टाकते.


एवढी साधी सोपी कथा पण वाचताना आपणही त्या कथेतीलच एक व्यक्तीरेखा आहोत असं वाटू लागतं. कादंबारीचा शेवट मात्र आपल्या डोळ्यात थोडं तरी पाणी आणल्याशिवाय रहात नाही.

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०१५

पवनाकाठचा धोंडी - गो.नी. दांडेकर



लेखक - गो.नी. दांडेकर

गो.नी.दां. च्या इतर कथांप्रमाणेच चुटपुट लावणारी एक ग्रामिण कथा. घराण्याची परंपरा, अभिमान जीव तोडुन जपणा-या शेतक-याची ही कथा.

कथा हळुहळु उलगडत जाताना दोन पिढ्यांमधला संघर्षदेखील जाणवत रहातो, अस्वस्थ करत राहतो.

धाकटया भावाविरुद्ध कुस्तीचं आव्हान स्वीकारणा-यालाही प्रोत्साहन देताना कोंडीला असलेलं नैतिक जबाबदारीचं भान प्रकर्षाने जाणवतंच पण धाकटया वहिनीमधे आजी शोधणारा कोंडी जमिनीवरचाच माणुस राहतो.

शेतात गुरासारखा राबणारा कोंडी धाकटया वहिनीजवळ मात्र हळुवार होतो, तिच्या शिक्षणाचं कौतुक जगाला ओरडुन सांगतो. एकंदरीत त्याचा विरोध बदलत्या प्रवाहाला नाही, बदल स्वीकारायला त्याची तयारी आहे पण जग बदललं म्हणुन स्वतः बदलायची मात्र त्याची तयारी नाही. वरवर बघितलं तर कथा साध्या सोप्या नेहेमीच्या मार्गानेच जाते खुप काही वेगळं असं काही घडत नाही. कथेच्या शेवटी कोणाचे उपकार घ्यायला लागु नयेत म्हणुन कोंडीचं गुरासारखं शेतात राबणं तो शेवटच्या प्रवासाला निघाल्याची जाणिव करुन देतं पण जन्मभर सांभाळलेल्या व्रतासाठी त्याने दीलेलं बलिदान मात्र वाचकांना असह्य चुटपुट लावुन जातं.


गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०१५

झाडाझडती - विश्वास पाटिल



लेखक - विश्वास पाटिल

एकूणच ग्रामिण जीवनाचा, गावकीतल्या गुंतागुंतीच्या राजकारणाचा विश्वास पाटलांचा अभ्यास अचाट आहे. वरवर पाहता शांत एकसुरी आयुष्य जगणा-या ह्या एका गावावर धरणाचा नांगर फ़िरतो आणि गावच्या गाव देशोधडीला कसं लागतं त्याचं वर्णन ह्या कादंबरीत वाचायला मिळतं.

आपल्यासारख्या शहरी जीवनाला चटावलेल्या लोकांना धरण = वीज एवढंच गणित कळतं, अधिकाधीक वीज उत्पादनासाठी अधिकाधीक धरणं बांधायला हवीत अशी किमान माझी तरी अपेक्षा असायची. पण अशा धरणांखाली गाडल्या गेलेल्या गावांची, गावक-यांच्या स्वप्नांची मोजदाद करायला आपल्याला वेळ तरी कुठे असतो.

गावातलं वातावरण, तिथलं राजकारण तिथली शासनव्यवस्था आपल्याला आधी अनाकलनीय वाटल्या तरी कादंबरी अर्धी वाचुन होईपर्यंत आपल्या अंगवळणी पडतात. सर्वस्व पणाला लागलेल्या धरण विरोधी लढ्यातही आपलं, आपल्या जातीचं वेगळेपण शाबुत ठेवण्यासाठीची धडपड बघुन कीव करावीशी वाटली तरी त्या गोष्टी टाळता येण्यासारख्या नसतात.


पाटलांनी उभ्या केलेल्या प्रत्येक व्यक्तीरेखेला वेगळं अस्तित्व आहे, प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्यासमोर वेगवेगळे प्रश्न उभे करते. देशाच्या, राज्याच्या भल्यासाठी शेतक-यांनी घरादाराची होळी करायची आणि राजकारण्यांनी तोंडाला पानं पुसायची हा प्रकार आता नवा राहीलेला नाही.