मंगळवार, २१ जुलै, २०१५

गवत्या - मिलिंद बोकील



लेखक – मिलिंद बोकील

एका  भरकटत राहिलेल्या, अस्वस्थ पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत भटक्याची ही कहाणी. अफाट लेखनशैलीमुळे गवत्या, बाज्या, अनु, मेहेर , गुरुजी, जानकी अगदी एकूण एक पात्र उभी राहतात डोळ्यासमोर.

सगळ्या भरकटण्यात एक सुसूत्रता दिसते, आकांडतांडव न करता, तत्त्ववेत्त्याचा आव न आणता स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून जाणवत राहतो.

खूप संथ कहाणीचा शेवट मात्र मला नाही आवडला .....”Typical Happy Ending “

एकूण कादंबरी मात्र “शाळा” इतकी  नाही पण खिळवून ठेवते एवढं नक्की 

मंगळवार, १९ मे, २०१५

Programming Language


आमच्या ऑफिस मध्ये PHP Developers साठी Interviews चालू आहेत .....

.मी उगाच तिथे लुडबुड करायला गेलो .....
.
आमच्या टीम लीडरने समोरच्या मुलीला प्रश्न विचारला .........तू कोणत्या Programming Language मध्ये तुझं Final Year चं प्रोजेक्ट केलं आहेस ?
...........English..........तिने शांतपणे उत्तर दिलं ........

.बिचारा टीम लीडर अजून शुद्धीत यायचाय ...........मी निट कलटी मारून बाहेर आलोय .........

गुरुवार, १४ मे, २०१५

तुंबाडचे खोत ( भाग पहिला ) - श्री.ना. पेंडसे



लेखक  - श्री.ना. पेंडसे

पेशवाईच्या अस्तानंतर कोकणातील बऱ्यापैकी सधन "खोत" घराण्याची  साधारण चार पिढ्यांची कथा. कादंबरी काल्पनिक असली तरी त्या त्या काळात चपखल बसणाऱ्या व्यक्तीरेखांमुळे कादंबरी वाचताना आपल्याला त्यातील व्यक्ती, घटना खऱ्या वाटु लागतात.

ब्राह्मण समाजाचं त्या काळातील समाजावरील वर्चस्व, दादा खोताच्या करारी, कठोर मुखवटयामागे लपलेली लिंगपिसाट वृत्ती, त्याच्या अघोरी शिक्षा ह्या सगळ्यातुन त्या काळातल्या सरंजामशाही मानसिकतेचं किळसवाणं दर्शन होतं. शेवटी अघोरी विद्या प्राप्त करण्यासाठी नरबळी देउन ह्या सगळ्याचा कळस होतो आणि त्या हव्यासापोटी तुंबाडकरांची एक पिढीच गारद होते.

पुढची पिढी म्हणजे गणेशशास्त्रींची पिढी, सभ्य सात्विक स्वभाव आणि आयुर्वेदाचा प्रचंड अभ्यास ह्या जोरावर पुन्हा घराण्याला प्रतिष्ठा प्राप्त होते पण शास्त्रीबुवांनंतर पुन्हा घराणं रक्तातल्या सरंजामशाहीकडे वळतं.

कादंबरीत वेगवेगळ्या व्यक्तीरेखांमधुन तत्कालीन सामाजिक परिस्थीतीवरही प्रकाश टाकला गेला आहे, टिळक श्रेष्ठ की गांधी ह्या वादाची पाळंमुळं त्या काळातील समाजव्यवस्थेत होती असंही जाणवतं. स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणारा विश्राम, वाघावर झेप घेणारा बजापा, त्या काळच्या रुढींना आव्हान देत शाळेत शिकवणारी ताई, शाळेसाठी जीवाचं रान करणारा नरसु, प्रेमासाठी आयुष्याची होळी करणारी जुलाली अशा व्यक्तीरेखा नकळत आपल्या काळजात घर करुन जातात.

अन्नात केस आला म्हणुन रखेलीसारख्या ठेवलेल्या मोलकरणीचे केस भादरणारा दादा खोत
रोग्यांकडुन एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झटणारा गणेशशास्त्री
खुले आम रखेल्या ठेउनही सख्ख्या भावांच्या बायकांशी संबंध ठेवणारे, प्रसंगी बलात्कार करणारे जुळे,
निडर साहसी पण जुलालीच्या प्रेमात तिला शेवटपर्यंत साथ देणारा बजापा
गुरासारखा मार खाउनही अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहाणारा आणि नंतर स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणारा विश्राम, 
दिराकडून झालेल्या बलात्कारातून दिवस गेल्याचे कळल्यावर जीव देणारी गंगा
असा हा वळणावळणांचा, चढउतारांचा तुंबाडच्या खोतांचा इतिहास अस्वस्थ करणारा आहे.


मंगळवार, ५ मे, २०१५

शहेनशहा - ना.सं. इनामदार




लेखक  - ना.सं. इनामदार

साधारण ३०० वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या छाताडावर दैत्य होऊन नाचलेला एक क्रूर सेनानी - औरंगजेब

आजवर औरंगजेब म्हणजे खलनायक, एक क्रूर, पाशवी शक्ती लाभलेला इस्लामी शहेनशहा एवढंच ऐकलं होतं. इनामादारांनी कादंबरीच्या स्वरुपात मांडल्यामुळे असेल कदाचित पण मला मात्र हा खलनायक , खलनायक न वाटता एक जबरदस्त सेनानी, कुशल राजकारणी आणि कडवा मुसलमान वाटला. अफाट सत्तेची हाव असणं हे ३०० वर्षापूर्वी तरी निश्चितच "खलनायक" बनण्यासाठी पुरेसं नव्हतं. त्याने भावांना मारलं नसतं तर मुघल परंपरेप्रमाणे त्याला त्याच्या भावांनी मारलं असतं. तो जगला, त्याने राज्य केलं कारण तो त्यासाठी सक्षम होता, लायक होता.

त्याला शिकवल्या गेलेल्या, समजावल्या गेलेल्या इस्लामचं त्याने आयुष्यभर पालन केलं.

मला इतिहास माहीत नाही पण ना.सं. इनामदारांनी "मांडलेला" शहेनशहा मात्र मला खटकला नाही कारण त्याच्या वागण्याचं त्याच्याकडे Justification" होतं.