सोमवार, ४ जानेवारी, २०१६

एलपीजी सबसिडी


१० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार**
.
काल परवा कुठे तरी वाचलं की १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्याची एलपीजी सबसिडी बंद होणार ...........खरोखर चांगला निर्णय 
.
ह्याच १० लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न असलेल्यांच्या मुलांना मिळणारा आरक्षणाचा लाभ का नाही बंद होत ? आरक्षणाचे फायदे किती पिढ्यांना द्यायचे ह्यासाठी काही मर्यादा नाहीच घालता येणार का ?
.
माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्या आईवडलांनी सरकारी नोकरीत आरक्षणाचे फायदे घेतले आता चिरंजीव स्वतः फायदे घेत आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठीदेखील हेच फायदे उपटण्याच्या तयारीत आहेत.
.
ह्या स्पर्धेच्या युगात सर्वांचा “Starting Point” सारखाच असला पाहिजे वगैरे सगळं मान्य आहे पण न्याय द्यायचा म्हणून अजून किती वर्ष “Finish Point” च्या पुढे नेऊन सोडायचंय ?

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

मुकुंदराव देवभानकर


मुकुंदराव देवभानकर...

नात्याने माझ्या सासऱ्यांचे मामा........म्हणजे आमच्या सौ.चे आजोबा वय वर्ष ७४ पण आजतागायत एवढा तरुण माणूस मी बघितलेला नाही.

मागच्या आठवड्यात एका लग्नाच्या निमित्ताने अहमदाबादला गेलेलो. अनायसे जातोच आहोत तर दोन ठिकाणं आवर्जून बघायचीच असं ठरवलेलं. एक म्हणजे अक्षरधाम मंदिर आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गुजरातचं मुख्यालय असलेलं “हेडगेवार सदन”. काही कारणाने अक्षरधाम मंदिर बघायचं राहून गेलं पण मुकुंद आजोबांना भेटणं आणि तेही संघाच्या गुजरातच्या मुख्यालयात, नशिबात होतं.

गेली ४७ वर्ष मुकुंद आजोबांनी पूर्णवेळ संघकार्यासाठी वाहून घेतलंय. आता देशभर भ्रमंती चालू असते त्यांची. मला थोडाफार राजकारणात रस असल्याचं ( अक्कल असल्याचं असं नाही म्हणालेलो मी ) लक्षात आल्यावर छान गप्पा रंगल्या. आजोबांसारखेच संघकार्याला वाहून घेतलेले अजूनही काही सहकारी मग आमच्यात सहभागी झाले. सुरुवातीला मी अक्कल पाजळली पण मग जाणवलं की मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. गंमत म्हणजे त्या लोकांना त्याचं काहीच वाटत नव्हतं एखाद्या बरोबरीच्या माणसाशी चर्चा करावी तशीच चर्चा चालू होती. बोलता बोलता राजकारणाबद्दलचे माझ्या डोक्यातले बरेच किडे कधी निघून गेले ते कळलंही नाही.

आजोबांच्या खोलीतली असंख्य पण खूप नीटनेटक्या पद्धतीने रचून ठेवलेली पुस्तकं नक्की मला हसत असणार
.अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन वर्षानुवर्ष निव्वळ फ्लेक्सवर दिसणारे “कार्यसम्राट” वगैरे राजकारणी किंवा स्वतःच्या वाढदिवसाला कुठल्या तरी अनाथाश्रमात जाऊन काही तरी वाटून फोटो काढून घेणारे “ज्येष्ठ” वगैरे समाजसेवक आजवर खूप बघितले पण एकाच ध्येयासाठी ......समाजासाठी अख्ख आयुष्य वाहून घेऊनही त्याबद्दल चकार शब्द काढायला तयार नसणारी मुकंदआजोबांसारखी माणसं माझ्या माहितीत तर फारशी नाहीत

......May be he "IS NOT THE” greatest but yessss he is great

आता ह्या वयात पण आजोबांना सामान्य लोकांसाठी देशपातळीवर काही नविन काम उभं करण्याची स्वप्न पडताहेत.

एरवी बायकोने ढोसलल्याशिवाय निघताना मोठ्या माणसांना नमस्कार करायची मला आठवण होत नाही पण त्या दिवशी मात्र कोणी आठवण करून न देताही मनापासून मुकुंदआजोबांना नमस्कार केला

रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मी पुरस्कार परत करणार.....



निषेध - पुरस्कार परत करणार.....

काल एक किलो तुरडाळ आणायला बायकोने वाण्याकड़े पिटाळलं ...... रुबाबात शंभराची नोट काढून वाण्याला दिली आणि एक किलो तुरडाळ मागितली.

माझ्याकड़े दयाभावाने बघत वाण्याने सांगितलं "इतने में तो आधा किलो आयेगा"
मी म्हटलं "अरे बाबा राज्य सरकारने तसं जाहिर केलंय"
"तो जाके सरकारसे ले लो" असं म्हणून तो दुसऱ्या customer कड़े वळला
त्या वाण्याने आणि पर्यायाने सरकारने एका मराठी मध्यमवर्गीय माणसाला दाखवलेली "असहिष्णुता" बघुन माझ्यातला "सहिष्णु" माणूस जागा झालेला आहे.

साहित्यिक नसलो म्हणून काय झालं मलाही पुरस्कार मिळालेला आहे. त्या वाण्याचा आणि पर्यायाने सरकारचा निषेध म्हणून तो पुरस्कार मी परत करायचं ठरवलं आहे.

१९८३ साली ओक बाग़ गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या चमचा लिम्बु शर्यतीत भाग घेतल्याबद्दल मिळालेला हा पुरस्कार मी परत करतो आहे. राज्य सरकारने आपला प्रतिनिधी पाठवून तो घेऊन जावा.

टीप - पुरस्कार म्हणून मिळालेली ही ताटली आम्ही गेली 32 वर्ष वापरली असली तरी मी स्वतः ती घासुन ठेवलेली आहे.

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी"

























संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी" येतोय. काल त्यातलं एक गाणं whatsapp वर पाठवलं कोणी तरी ....... चक्क बाजीरावांच्या पत्नी काशीबाई, मस्तानी बरोबर नाचताना दाखवल्या आहेत.


सिनेमा म्हटल्यावर थोडाफार मसाला घालावा लागतो वगैरे ठीक आहे पण इतका ? पैसे कमवण्यासाठी इतिहासाची इतकी मोडतोड़ ?

आधीच थोर ब्राह्मणद्वेष्टया इतिहासकारांनी बाजीराव ही व्यक्तीरेखा कधी "मस्तानी" पासून वेगळी करुन एक अपराजित सेनानी म्हणून मांडलीच नाही त्यात आता ह्या गल्लाभरु सिनेमाची भर.