सोमवार, १८ एप्रिल, २०१६

“ट्रेन मे बाथरूम को कडी लगाने को भूलनेवाले............”


टिळक चौक, पारनाका हे भाग म्हणजे आमच्या कल्याणातले “सदाशिवपेठ” मानले जातात. ह्या भागाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. देव म्हणे अक्कल वाटायला निघाला तेव्हा त्याने पारनाक्यापासून सुरुवात केली. गांधी चौक कासारहाट उरकून टिळक चौकात अक्कल वाटल्यावर देवाकडची अक्कल संपली .........त्यामुळे बाकीचं कल्याण “तसंच” राहिलं.
.
ह्या अशा विद्वत्तापूर्ण वातावरणात आमचा एक मित्रही जन्माला आला...........आजच्यापुरतं तात्या म्हणू त्याला आपण. साधारण १९ / २० वर्षांपूर्वी आम्ही ८ /१० मित्र केरळला एका मित्राच्या लग्नाला निघालेलो. आम्ही सगळे तसे समवयस्क म्हणजे विशी बावीशीतले एकदम गब्रू जवान वगैरे. कल्याणला रेल्वेच्या डब्यात शिरल्या शिरल्या प्रत्येकाने नीट Scanning करून झालं.
.
संपूर्ण डब्यात............जरा गारवा वाटेल अशी ......... मोजून एकच “हिरवळ” ...........मग प्रत्येक वेळी जाता येताना ............”जरा हसली काय रे ?”............ “आयला बघत पण नाय जाम आखडू दिसतेय रे”............ “आईशप्पथ कौन सी चक्की का आटा खाती होगी याsssssर” ............”अशी पोरगी पटली तर आपण तर सिगरेट, गुटखा दारू बिरू असल्या गोष्टींना हात पण नाय लावणार” अशा “विधायक” गप्पा चालू झाल्या.
.
आमच्या मित्राला म्हणजे तात्याला मात्र हे सगळं अजिबात मान्य नव्हतं ........म्हणजे त्या हिरवळीचं “असाध्य” असणं पटतच नव्हतं त्याला. “अरे अशा पोरी उलट पटवायला एकदम सोप्प्या असतात” ह्या त्याच्या म्हणण्यावर आमचा तात्या ठाम होता. दरम्यान जेवायची वेळ झाली. बाहेरचं खायला नको म्हणून प्रत्येकाने काही तरी करून आणायचं ठरलेलं. तात्या त्याच्या घरून तिखट मिठाच्या पुऱ्या आणणार होता. सगळ्यांनी डबे उघडले ........... तात्याने पण डबा उघडला ...........पुऱ्याच होत्या पण शेवपुरीसाठी वापरतात तसल्या पुऱ्या...............बोंबला च्यायला आता ट्रेन कुठे थांबणार ? तिथे काय मिळणार ? कारण रात्रीचे ११ वाजलेले. जाम वैतागले सगळे ............पण तात्या ठाम होता ........मी ह्याच पुऱ्या आणतो सांगितलेलं............कसं बसं काही तरी पोटात ढकललं आणि आडवे झालो. पुन्हा हिरवळीचाच विषय चालू............तात्याचं .......”मनात आणलं तर दोन तासात पटवू शकतो ............ती कधीची मला स्माईल देतेय” वगैरे............विद्वत्ताप्रचुर प्रवचन ऐकत एकेकाला झोप लागली
.
सकाळी जसजसे उठलो तसतसे “हलके” होऊन .........ब्रश वगैरे करून पुन्हा एक डोळा “हिरवळीवर” ठेऊन पत्ते, गप्पा चालू झाल्या. तात्यासाहेब उठले आणि बाथरूम मध्ये गेले.......... २ मित्र बाथरूम जवळच्या दारात उभे राहून हवा खात होते .............खरं तर तिथून “हिरवळ” जवळून बघता येत होती म्हणून त्यांना हवा खायची होती.
.
नेमकी तेव्हाच “हिरवळ” उठली आणि घाईघाईने........... आमचे तात्यासाहेब गेलेले त्याच बाथरूमकडे वळली ............. दरवाजातले मित्र काही बोलणार तोवर हिरवळ ........दरवाजा उघडून आत ...........तात्या खाडकन उठून उभाच राहिला ..........
.
ज्या वेगाने ती बाथरूमकडे गेलेली त्याच्या चौपट वेगाने ती जागेवर परत गेली..........तिची काय चूक? .......... रेल्वेतल्या बाथरूमला दोन कड्या असतात एक जी आतून आणि बाहेरून दोन्हीकडून लावता येते ...........आणि दुसरी फक्त आतून लावता येते ती. तात्यासाहेबांनी एकच कडी लावली ती नेमकी बाहेरून उघडणारी .............१० मिनिटांनी मान खाली घालून तात्या आला ........त्या क्षणापासून तात्याचा जो काय band वाजवला सगळ्यांनी. पुढचे ६ दिवस तोंड पण नाही उघडलं तात्याने.
.
मधे बरीच वर्ष गेली तात्या परदेशात पण जाऊन आला नोकरीच्या निमित्ताने. एकदा ट्रेन्सचा प्रॉब्लेम होता खूप. एक एक करत पुन्हा मित्र भेटत गेले. platform वर एक गाडी उभी होती पण खच्चून भरलेली. नेमका आम्हाला तात्या दिसला. काय कसं काय वगैरे गप्पा चालू असताना एका मित्राने तात्याला विचारलं “काय तात्या परदेशात जाऊन आलास ...........मग जीवाची मुंबई केलीस की नाही ............पोरी एकदम free minded असतात ना रे तिकडे ? तात्याची कळी खुलली .........”अरे मग एकदम मज्जा असते तिकडे .........आपण तर फुल्ल्ल टू मज्जा केली” तात्याने त्याचं वाक्य संपवायच्या आत ..........शक्य तेवढा भाबडा चेहेरा करून एकदम प्रेमाने दुसऱ्या मित्राने तात्याला प्रश्न केला
.
.
...........तेव्हा तरी कडी नीट लावलेलीस ना रे ?
.
पेटलेला तात्या ......... .......वेडात मराठे वीर दौडले सात सारख्या आवेशाने .....समोरच्या खच्चून भरलेल्या लोकलमध्ये जीव तोडून घुसला .........लोकल निघून गेली ...........बरीच वर्ष झाली तात्या दिसला नाही ........बहुतेक आम्हाला बघून तात्या रस्ता बदलत असणार
म्हणून म्हणतो ................
.
“ट्रेन मे बाथरूम को कडी लगाने को भूलनेवाले............जगाला अक्कल सिखाया नहीं करते”

सोमवार, ११ एप्रिल, २०१६

IPL ला विरोध कशासाठी ?

70 लाख लिटर पाण्याचा अपव्यय होतो म्हणून काही लोक आणि संस्था महाराष्ट्रात IPL च्या सामन्याना विरोध करताहेत. दबावाला बळी पडून सरकारने खरंच राज्यात IPL ला बंदी घातली तर त्यांच्यासारखे कर्मदरिद्री तेच.

महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी किमान एक कोटी लोक फ्लॅटमध्ये राहतात ? एक व्यक्ति फ़क्त तीनदा घरातला "फ्लश" वापरते असं धरलं तरी किमान 15 कोटी लिटर पाणी फ्लश मध्ये वापरलं जातं असं म्हणता येईल ? नीट नियोजन केलं आणि  दिवसाकाठी ह्यातलं फ़क्त 5% पाणी वाचवता आलं तरी वर्षभरात साधारण 250 कोटी लिटर पाणी वाचू शकेल ?

मुळात पाणी ही समस्या जेवढी मोठी आहे त्यापेक्षा मोठी समस्या आहे पाण्याचं Distribution. मराठवाड्यातला दुष्काळ आजचा नाही बंदी घालायाचीच तर ती तिथल्या राजकारण्यांवर आणि त्यांनी स्वार्थासाठी तिथे उभ्या केलेल्या साखर कारखान्यावर घालावी लागेल.

अनुराग ठाकुर म्हणाले ते खरं मानायचं तर 100 कोटींचा महसुल अपेक्षित आहे राज्याला IPL मधून. सामन्याना विरोध करणाऱ्या लोकांनी खरं तर हा निधी दुष्काळग्रस्त भागासाठी वापरण्यासाठी सरकारवर दबाव आणावा...... किमान 50 खेड़ी सहज कायमची दुष्काळमुक्त होतील एवढ्या पैशात.

"काही लाख लिटर पाण्यासाठी एवढ्या महासुलावर पाणी सोडण्यात काय अर्थ आहे ?"

FYI -  मी क्रिकेटप्रेमी वगैरे अजिबात नाही. गेल्या 5 वर्षात दोनदा "लगान" बघितला आहे ते धरून एकूण पावणे चार सामने बघितले आहेत मी. ढोणी आणि विराट कोहली ( तो पण अनुष्काचा BF म्हणून) एवढे दोनच खेळाडू माहीत आहेत मला आताच्या संघातले

सोमवार, ४ एप्रिल, २०१६

Team Building and Knowledge Sharing


व्यवस्थापन शास्त्रात चांगली Team बनवता येणं आणि त्या Team ची Productivity सतत वाढवत नेणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. फक्त Corporate जगातच नाही पण Team Building चं महत्त्व राजकारण, समाजकारण, खेळ, मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रात तेवढंच मानलं जातं. Team मधल्या आपल्या सहकाऱ्यांना आपण ज्या Project वर काम करतोय त्याची इत्यंभूत माहिती असणं गरजेचं असतं असंही मानलं जातं.



गावी म्हणजे कराडजवळ म्हासोलीला आमचं जुनं घर आहे, घर कसलं मस्त मोठाच्या मोठा वाडा आहे. काका तिथेच राहायचे पूर्वी पण आता नोकरीनिमित्त ते कराडला राहतात. लहानपणी सुट्टीत बऱ्याचदा आम्ही आठ दहा चुलत आणि आत्ते भावंडं, आमच्या गावच्या वाड्यात जमायचो. अख्खा दिवस वाडा डोक्यावर घ्यायचो. वाड्याच्या आतच एक विहीर म्हणजे आड होता, एका काकांचं किराणा सामानाचं दुकान होतं आणि आमचीच पिठाची गिरणी पण होती. कशासाठीच वाड्याच्या बाहेर पडायची गरज नसायची. हां पण त्यावेळी “घर घर मे शौचालय” वगैरे
concept एवढे कोणी seriously घेतलेले नव्हते त्यामुळे सकाळी सकाळी तांब्या घेऊन ...........बाहेर पडायलाच लागायचं.


मॉल्स, रेल्वे स्टेशन्स किंवा ऑफिसेस मध्ये पुरुष आणि महिला प्रसाधनगृह वेगळी असतात तशीच गावाकडे सकाळी “हलकं व्हायला जाण्याचे ठिकाणं पण स्त्रीया आणि पुरूषांसाठी वेगवेगळी असतात. तसे “बोर्ड” लावलेले नसले तरी ते तारतम्य तिथे सगळ्यांकडूनच पाळलं जातं.


आम्ही सगळे भाऊ सकाळी त्या “कार्यक्रमाला” एकत्रच निघायचो. सगळे लहानच असलो तरी त्यातही अगदीच दुसरी तिसरीतले भाऊ म्हणजे कच्चे लिंबू किंवा बच्चे कंपनी आणि आम्ही पाचवी सहावीतले म्हणजे “दादा कंपनी” असायचो. गावाकडे साप भरपूर असायचे आणि सगळ्यात जवळचं हॉस्पिटल साधारण ३० किलोमीटरवर ............रोज सकाळी आपापले तांबे घेऊन निघताना घरातली मोठी माणसं न चुकता दम द्यायची ...........”लांब जाऊ नका .........मस्ती करू नका” वगैरे वगैरे.


आम्ही सगळेच शहरात रहायचो ( कल्याण तेव्हाही म्हणजे ३० /३५ वर्षापूर्वीही शहरच मानलं जायचं )  त्यामुळे “त्या” अवस्थेत कोणी बघेल याची लाज वाटायची ...........मग आम्ही शक्य तेवढं गावापासून लांब जायचो .........मोठी झुडूपं असतील अशा जागा शोधायचो.


त्या दिवशी पण तसंच झालं........खूपच लांबवर गेलेलो आम्ही ........एकमेकांकडे पाठ करून कार्यक्रम उरकतच आला होता तेवढ्यात आमच्यापैकी एकाला साप दिसला ........त्याने “साप साप” म्हणून बोंबलायला सुरुवात केली ............चांगला ४/५ फुट लांबीचा काळाकुट्ट साप आमच्या जवळूनच सळसळत निघून गेला .........भीतीने काहींचा उरलेला “कार्यक्रम” पटकन उरकला .........तर काहींनी आवरता घेतला .........आणि घराकडे पळत सुटलो सगळे. घरी येऊन आम्ही साप बघितला हे सांगण्याची सोय नव्हती कारण मग कुठे बघितला हा प्रश्न आला असता.



इतक्या लांब का गेलात ह्याची विचारणा मोठ्यांकडून, तोडापेक्षा जास्त हाताने किंवा हातात लागेल त्या काठीने अगदीच वेळप्रसंगी पायाने पण झाली असती आणि उत्तरं देता देता पाठ आणि आणि बरंच “काय काय” सोलापटून निघालं असतं. आम्ही सगळ्यांनी घरी तोंडं बंद ठेवायचं ठरवलं........जे कच्चे लिंबू होते त्यांच्याकडून पण “आपण साप बघितला नाही, आपण लांब गेलो नव्हतो” असं दहा दहा वेळा वदवून घेतलं आणि चोरासारखे वाड्यात परतलो.


आम्ही सगळेच जरा गप्पगप्प आहोत हे घरातल्या मोठ्यांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला .......आम्ही मोठे जेवढे होतो तेवढे बऱ्यापैकी बनेल होतो .........विचारलं गेलं तर मस्त गोल गोल फिरवलं सगळ्या मोठ्यांना ...............पण जसं जरा दमात घेऊन बच्चे कंपनीला विचारायला सुरुवात झाली तसं आमचं धाबं दणाणलं. पहिल्या एक दोन प्रश्नानंतरच त्यांनी बोंबलायला सुरुवात केली “आम्ही साप नाही बघितला ..........आम्ही लांब नव्हतो गेलो.......... “आम्ही साप नाही बघितला ..........आम्ही लांब नव्हतो गेलो” काय समजायचं ते सगळ्या घरात समजलं.


मग जे काय वरात निघाली आम्हा दादा कंपनीची .....................तासभर धुलाई चालू होती ..........सगळे आम्हाला बदडून दमले तेव्हा थांबलं सगळं ............. सालटी निघणं काय असतं ते तेव्हा नीट कळलं.

Team Building पण असंच असतं ना राव ............तुमचे सहकारी नीSSSSSSट विचार करून निवडावे लागतात ..........”कच्चे लिंबू” घ्यावेच लागणार असतील तर चालू Project मध्ये किती “साप” उरलेत ह्या बद्दलचं किती Knowledge Share करायचं हेही विचार करून ठरवावं लागतं नाही तर .........सालटी निघणार हे १००% निश्चित.


रविवार, ३ एप्रिल, २०१६

“देऊळ बंद”



मगाशी झी सिनेमावर “देऊळ बंद” सिनेमा बघत होतो .......छान आहे सिनेमा म्हणून ........मोहन जोशीचं काम तर अप्रतिमच आहे. बाकी काही फारसं मला पटलं नाही पण “सध्या” त्यावर बोलून लगेच ज्वलंत, धर्माभिमानी, धर्मरक्षक लोकांच्या भावना वगैरे खाजवायच्या नाहीयेत.

ह्या सिनेमातलं मला एक कळलं नाही .......स्वामी आधी म्हणतात की “देव जन्म आणि मृत्यूत ढवळाढवळ करू शकत नाही” आणि सिनेमाच्या शेवटी राघववर झाडलेली गोळी स्वतःवर घेतात ......रक्त सांडत सांडत जातात ....... राघवचा जीव वाचवतात .........असं कसं ?

Cinematic Liberty वगैरे थोडंफार मला मान्य आहे पण ही केवळ निर्मात्याच्या किंवा लेखकाच्या Logic मधली चूक आहे की देवाचं महात्म्य ज्यांना कळतं (असं त्यांचं म्हणणं आहे) त्यांच्याही डोक्यात असं काहे confusion आहे?

जाऊ दे मला काय ह्यातलं फारसं कळत नाही तसंही  मी “छोटा भीम” बघणंच जास्त चांगलं..............