लेखक - श्री.ना. पेंडसे
पेशवाईच्या अस्तानंतर कोकणातील बऱ्यापैकी सधन "खोत" घराण्याची साधारण चार पिढ्यांची कथा. कादंबरी काल्पनिक
असली तरी त्या त्या काळात चपखल बसणाऱ्या व्यक्तीरेखांमुळे कादंबरी वाचताना
आपल्याला त्यातील व्यक्ती, घटना खऱ्या वाटु लागतात.
ब्राह्मण समाजाचं त्या काळातील समाजावरील वर्चस्व, दादा खोताच्या करारी, कठोर मुखवटयामागे
लपलेली लिंगपिसाट वृत्ती, त्याच्या अघोरी शिक्षा ह्या
सगळ्यातुन त्या काळातल्या सरंजामशाही मानसिकतेचं किळसवाणं दर्शन होतं. शेवटी अघोरी
विद्या प्राप्त करण्यासाठी नरबळी देउन ह्या सगळ्याचा कळस होतो आणि त्या
हव्यासापोटी तुंबाडकरांची एक पिढीच गारद होते.
पुढची पिढी म्हणजे गणेशशास्त्रींची पिढी, सभ्य
सात्विक स्वभाव आणि आयुर्वेदाचा प्रचंड अभ्यास ह्या जोरावर पुन्हा घराण्याला
प्रतिष्ठा प्राप्त होते पण शास्त्रीबुवांनंतर पुन्हा घराणं रक्तातल्या
सरंजामशाहीकडे वळतं.
कादंबरीत वेगवेगळ्या व्यक्तीरेखांमधुन तत्कालीन सामाजिक परिस्थीतीवरही प्रकाश
टाकला गेला आहे, टिळक श्रेष्ठ की गांधी ह्या
वादाची पाळंमुळं त्या काळातील समाजव्यवस्थेत होती असंही जाणवतं.
स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणारा विश्राम, वाघावर झेप घेणारा
बजापा, त्या काळच्या रुढींना आव्हान देत शाळेत शिकवणारी ताई,
शाळेसाठी जीवाचं रान करणारा नरसु, प्रेमासाठी
आयुष्याची होळी करणारी जुलाली अशा व्यक्तीरेखा नकळत आपल्या काळजात घर करुन जातात.
अन्नात केस आला म्हणुन रखेलीसारख्या ठेवलेल्या मोलकरणीचे केस भादरणारा दादा
खोत,
रोग्यांकडुन एका पैशाचीही
अपेक्षा न ठेवता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झटणारा गणेशशास्त्री,
खुले आम रखेल्या ठेउनही सख्ख्या भावांच्या बायकांशी संबंध ठेवणारे,
प्रसंगी बलात्कार करणारे जुळे,
निडर साहसी पण
जुलालीच्या प्रेमात तिला शेवटपर्यंत साथ देणारा बजापा,
गुरासारखा
मार खाउनही अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहाणारा आणि नंतर स्वातंत्र्यसंग्रामात
उडी घेणारा विश्राम,
दिराकडून झालेल्या बलात्कारातून दिवस गेल्याचे कळल्यावर जीव
देणारी गंगा
असा हा वळणावळणांचा, चढउतारांचा तुंबाडच्या खोतांचा इतिहास अस्वस्थ
करणारा आहे.