लेखक - भाऊ पाध्ये
आपल्या पिढीला भाऊ पाध्ये हे नाव माहित असणं जरा अवघड आहे. मुळात भाऊ पाध्येंची
पुस्तकं विकत मिळणंच खुप अवघड आहे. साधारण १९७५ साली प्रकाशीत झालेलं हे पुस्तक
१९९६ साली निखिल वागळेंनी पुनः प्रकाशीत केलं.
एकंदर भाऊ पाध्येंचं लिखाण मला कायम परखड समाजवादाकडे झुकणारं वाटत आलय.
"राडा" घडत जातो तो शिवसेना महाराष्ट्रात रुजली तेव्हाच्या काळात.
शिवसेनेची तेव्हाची मानसिकता, आणि त्याचे
समाजावर होत असलेले परिणाम ह्यांचं सुरेख चित्रण राडामधे वाचायला मिळतं.
सधन अण्णेगिरी कुटुंब, अण्णेगिरी कुटुंबातला लाडका मुलगा
मंदार, लाडातुन आलेला हट्ट्ट्टीपणा, नैसर्गीक
निडर स्वभाव तरीही आतुन खुप हळवा मंदार अण्णेगिरी ही राडा मधली सर्वात महत्त्वाची
व्यक्तीरेखा भाऊ पाध्येंच्या लेखणीतुन समर्थपणे आपल्या समोर उभी रहाते. तुसडया,
विक्षीप्त मंदारबद्दल कुठे तरी आत नकळत सहानुभुती निर्माण होते.
शिवसेना शाखाप्रमुख नाना खारकर, त्याची
बहिण ( मंदारच्या भाषेत "रांड) शालिनी, फ़ंटा, मनवेल, खुबसुरत काकु, दारुचा
अड्डॆवाला गजु अशा सगळ्या व्यक्तीरेखांमधुन त्या वेळच्या एकंदर राजकीय, सामाजिक परिस्थितीबरोबरच मानवी मनाचे खेळही उलगडुन दाखवले आहेत.
घरच्यांशी पटलं नाही म्हणुन ऐश्वर्यावर लाथ मारणारा मंदार शराबी मधल्या अमिताभ
ची आठवण करुन देतो, विनाकारण शालिनीला छळण्यातुन
मंदार एकंदरच समाजातील शालीनतेचे बुरखे घेउन वावरणा-या वर्गालाच आव्हान देतो,
नाना खारकर आणि मंडळींना नडताना मंदार झुंडशाही विरुद्ध पाय रोवुन
उभा ठाकतो. एकंदरच मंदार "लार्जर दॅन लाईफ़ " वाटायला लागतो तितक्यात
त्याच्या हातुन अनावधानाने खुन होतो, तेव्हा मात्र मंदार
सामान्य माणसासारखा वागुन आपल्याला पुन्हा जमिनीवर आणुन ठेवतो.
संपुर्ण कादंबरीमधे "खुबसुरत काकु", रांड शालिनी " असे उल्लेख वारंवार येत रहातात आणि आपल्या मध्यमवर्गीय,
सांस्कॄतिक वगैरे विचारसरणीला लाथा हाणत राहतात. भाऊ पाध्येंचं
लिखाण आजच्या काळात एवढं झोंबतं तर १९७५ साली किती आग लागली असेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा