बुधवार, ८ एप्रिल, २०१५

कंपनी ऑफ़ विमेन - खुशवंतसिंग



लेखक -- खुशवंतसिंग अनुवादीत

खरं तर खुशवंतसिंगांचं नाव बघुन पुस्तक घेतलं पण पुस्तक तद्दन बाजारु आहे. फ़ुटपाथवर मिळणाऱ्या "तसल्या" पिवळ्या पुस्तकांपेक्षा जरा बरं म्हणता येईल एवढी नको त्या गोष्टींची वर्णनं. पुस्तक नक्की कशावर, आणि का लिहीलंय ते शेवटपर्यंत समजलं नाही.

एक घटस्फ़ोतित उद्योजक, त्याच्या मोकाट, भरकटलेल्या आयुष्य़ाची ही कहाणी. पुस्तकाचा ८०% भाग "रसाळ" वर्णनांनी भरलेला. शेवट मात्र एखाद्या बोधकथेसारखा, संदेश वगैरे देणारा.

सोमवार, ३० मार्च, २०१५

ब्लास्फेमी - तेहमिना दुर्रानी


लेखिका - तेहमिना दुर्रानी 

खरंच मुळापासुन हादरवणारं पुस्तक. पुस्तकाची पार्श्वभुमी जरी इस्लामी असली तरी पुस्तकातल्या पुरुष व्यक्तीरेखा एकाच जागतिक मानसिकतेचं प्रतिनिधीत्व करतात. थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर एकाच वेळी स्त्रीची अनेक रुपं बघायला मिळतात.

नवऱ्याचे अनन्वित अत्याचार मुकाटयाने सहन करणारी एक "सहनशील स्त्री"
स्वतःच्याही नकळत कोणावर तरी मोहुन जाणारी हळुवार "प्रेमिका"
मुलीसाठी, मुलीला अशा अत्याचारापासुन वाचविण्यासाठी पाप पुण्याचा विचार न करता मार्ग शोढणारी "माता"
संयमी आतल्या आत धुमसत राहणारी "आणि संधी मिळताच जीव तोडुन वार करणारी  "रणरागिणी चील"


अफ़ाट पुस्तक आहे.

बुधवार, २५ मार्च, २०१५

पॅपिलॉन - हेन्री शेरीयर




मूळ लेखक हेन्री शेरीयर –

अनुवाद रविंद्र गुर्जर

एका फ्रेंच कैद्याची आत्मकथा. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचाट साहसी वृत्ती एवढ्या भांडवलावर ८ ते १० वेळा तुरुंग फोडून पलायनाचा प्रयत्न करणारा कथा नायक म्हणजेच स्वतः लेखक. वरकरणी सत्यकथा वाटत असली तरीही सुरुवातीचा काही भाग सोडला तर मला मात्र निव्वळ बाजारू "फिल्मी" कथा वाटली. सहज विश्वास ठेवता न येणाऱ्या घटना एवढ्या सातत्याने घडत राहतात की विश्वास ठेवणंच अवघड होत जातं.

कथानक ज्या काळात आणि जिथे घडले त्या काळची तिथली परिस्थिती कदाचित वेगळी असेल पण ९०% घटना मला तरी अशक्यप्राय वाटल्या.

एक साहसकथा म्हणून वाचायला ठीक आहे पण "ग्रेट" वगैरे नाही वाटलं मला पुस्तक.

बुधवार, १८ मार्च, २०१५

कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? - शेषराव मोरे


लेखक - शेषराव मोरे

पुस्तकाबद्दल अनेक परस्परविरोधी लेख निरनिराळ्या वृत्तपत्रात आणि इंटरनेटवर वाचनात आले आणि पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झालं म्हणून पुस्तक घेतलं. पुस्तकात मांडलेली मतं चूक की बरोबर त्यावर इतिहासाचे किंवा समाजशास्त्राचे अभ्यासक चर्चा करत राहतील पण एक वाचक, एक भारतीय नागरिक म्हणून काही गोष्टींची नोंद घ्यावीशी वाटली.
१. १८५७चं बंड मुळात इस्लामी राज्यकर्त्यांनी पुरस्कृतकेलेलं बंड होतं.

२. ब्रिटीश राज्यसत्तेने ह्या बंडाचा सूड एवढा भयानक पद्धतीने घेतला ज्याची तुलना हिटलरने केलेल्या ज्यू हत्याकांडाशीच होऊ शकते. दिल्लीतल्या प्रसिद्ध जामा मशिदीचा वापर अनेक महिने घोड्यांच्या तबेल्यासाठी केला गेला. चौकाचौकात हजारो मुसलमानांना फाशी दिली गेली. मिर्झा गालिबने लिहिलेलं खरं मानायचं झालं तर एकट्या लखनौ मध्ये मुस्लिमांची संख्या अडीच लाखावरून एक हजारावर आली. मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना परागंदा होण्याची वेळ भारतीय इतिहासात पहिलीच असावी.

३. मोगल खानदानातील २९ पुरुषांना संपविण्यात आलं.

४. स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातसर अहमदयांनी प्रथम मांडली. जीना त्या वेळी बहुदा जन्मालाही आले नसावेत

५. राष्ट्रवादी मुस्लीमांना अखंड भारत हवा होता पण हिंदुच्या बरोबरीने सत्तेत भागीदारी ( ५०%) हवी होती ( जेमतेम १५% असूनही )

अतिशय विचारपूर्वक आणि मुद्देसूद केलेल्या मांडणीमुळे संपूर्ण पुस्तक वाचनीय आहे. फाळणीबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार ह्या विषयावर पुरेसा बोलका आहे.
जर हिंदुस्थान अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते...
मुसलमान ही शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्‍वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंध, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मला एकच वाटतंआज पाकिस्तान आणि पाकिस्तानी मानसिकता सीमेच्या पलीकडे आहे, मधे पोलादी भारतीय लष्कर आहे तरीही आपल्याला एवढा उपद्रव आहे, हीच कीड सीमेच्या अलीकडे असती तर तुमचं आमचं आयुष्य १००% नरकच झालं असतं.