बुधवार, २२ एप्रिल, २०१५

उचल्या - लक्ष्मण गायकवाड


लेखक - लक्ष्मण गायकवाड


१९८७ मधे प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाच्या जवळपास ६/७ आवृत्ती निघाल्या. स्वातंत्र्याचा अर्थही पुरेसा न कळलेल्या, मुख्य प्रवाहापासुन जाणुन बुजुन लांब ठेवल्या गेलेल्या एका समाजाची ही कहाणी.

लेखकाने मनोगतात सांगितल्याप्रमाणे सदर पुस्तकाचे साहित्यीक मुल्य काय आहे ? पुस्तकातुन सामान्य माणसाला काय मिळालं ? असले वांझोटे प्रश्न पुस्तक वाचल्यावर पडत नाहीत. जे आहे ते गावाबाहेरचं खरकटं वास्तव.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच पोलिस "आजीच्या थानाला धरु धरु मारत होते " असं वाक्य येतं आणि माझ्यातल्या पांढरपेशा मध्यमवर्गीय हादरतो. आमच्या पिढीजात शहरी चौकटीतुन आम्हाला असलं हिडीस कधी काही दिसलंच नाही. संपुर्ण पुस्तक वाचताना आपण त्या किळसवाण्या जगाचा भाग होवुच शकत नाही. लांब बसुन एखादया डबक्यातल्या किडयांची वळवळ पहावी तितक्या अलिप्तपणे मी हे पुस्तक वाचलं.

उंदीर भाजुन खाणं, मांजर खाणं नुसत्या कल्पनेनीही आपल्याला मळमळल्यासारखं होतं पण कुठे तरी आपल्या स्वच्छ, हायजीनीक वगैरे जीवनशैलीवर घणाचे घाव घातल्यासारखं वाटतं. चोरीचं शिक्षण देताना मार खायचं पण शिक्षण दीलं जातं. ह्या शिक्षणात "नागडं करुन गांडीत मिरचु भरलं" तरी तोंड बंद ठेवायला शिकवलं जातं. पोलिसांचा खबरी म्हणुन लेखकाच्या आजोबाला राजरोस पणे कु-हाडीचे घालुन मारलं जातं तरीही कुठेही तक्रार न करता प्रकरण दाबलं जातं. एकुणच मुख्य प्रवाहातील कायदा व न्याय व्यवस्थेवरचा अविश्वासच ह्यातुन प्रतिबींबीत होतो.

पुढे एका प्रकरणात बापानेच मुलीला बायकोप्रमाणे "वापरल्याचा" उल्लेख येतो, जातपंचायतीकडुन त्याला शिक्षाही ठोठावली जाते. अशिक्षीत, असुनही किमान नितीमत्तेचं भान ह्या समाजाला असल्याची ही खुण वाटते.

ह्या जमातीवर चोर जातीचा शिक्का ब्रिटीशांनी मारला, व्ही. टी. ( आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस ) च्या इमारतींसारखाच आपण हा शिक्काही अभिमानाने जपला.

शिक्षणाशी दुरान्वयेही संबंध नाही, चोर म्हणुन नोकरी नाही, शेतीवाडी नाही अशा परिस्थीतीत पोलिस आणि इतर उच्च्वर्णीयांकडुन केली गेलेली पिळवणुक, लेखकाचा तक्रारीचा सुर कुठेच दिसत नाही जे आहे जसं आहे तसंच्या समोर ठेवलं गेलंय.

पुस्तकाच्या शेवटच्या भागात लेखकाने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन केलेले प्रयत्न दिसतात. दलितांचा वापर आजही फ़क्त "व्होटबॅंक" म्हणुनच केला जातो हे वास्तव समोर येतं. राजकारण्यांना दलित मतं हवी असतात पण सत्तेच्या सारीपाटात बरोबरीचं स्थान देण्यात आजही कमीपणा मानला जातो.

पुस्तक वाचुन झाल्यावरही मला सावरायला बराच वेळ लागला. आपणच आपल्याला प्रश्न विचारत राहतो आणि निरुत्तर होवुन आपलीच कीव करत राहतो.


रविवार, १२ एप्रिल, २०१५

राडा - भाऊ पाध्ये



लेखक - भाऊ पाध्ये

आपल्या पिढीला भाऊ पाध्ये हे नाव माहित असणं जरा अवघड आहे. मुळात भाऊ पाध्येंची पुस्तकं विकत मिळणंच खुप अवघड आहे. साधारण १९७५ साली प्रकाशीत झालेलं हे पुस्तक १९९६ साली निखिल वागळेंनी पुनः प्रकाशीत केलं.

एकंदर भाऊ पाध्येंचं लिखाण मला कायम परखड समाजवादाकडे झुकणारं वाटत आलय. "राडा" घडत जातो तो शिवसेना महाराष्ट्रात रुजली तेव्हाच्या काळात. शिवसेनेची तेव्हाची मानसिकता, आणि त्याचे समाजावर होत असलेले परिणाम ह्यांचं सुरेख चित्रण राडामधे वाचायला मिळतं.

सधन अण्णेगिरी कुटुंब, अण्णेगिरी कुटुंबातला लाडका मुलगा मंदार, लाडातुन आलेला हट्ट्ट्टीपणा, नैसर्गीक निडर स्वभाव तरीही आतुन खुप हळवा मंदार अण्णेगिरी ही राडा मधली सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा भाऊ पाध्येंच्या लेखणीतुन समर्थपणे आपल्या समोर उभी रहाते. तुसडया, विक्षीप्त मंदारबद्दल कुठे तरी आत नकळत सहानुभुती निर्माण होते.

शिवसेना शाखाप्रमुख नाना खारकर, त्याची बहिण ( मंदारच्या भाषेत "रांड) शालिनी, फ़ंटा, मनवेल, खुबसुरत काकु, दारुचा अड्डॆवाला गजु अशा सगळ्या व्यक्तीरेखांमधुन त्या वेळच्या एकंदर राजकीय, सामाजिक परिस्थितीबरोबरच मानवी मनाचे खेळही उलगडुन दाखवले आहेत.

घरच्यांशी पटलं नाही म्हणुन ऐश्वर्यावर लाथ मारणारा मंदार शराबी मधल्या अमिताभ ची आठवण करुन देतो, विनाकारण शालिनीला छळण्यातुन मंदार एकंदरच समाजातील शालीनतेचे बुरखे घेउन वावरणा-या वर्गालाच आव्हान देतो, नाना खारकर आणि मंडळींना नडताना मंदार झुंडशाही विरुद्ध पाय रोवुन उभा ठाकतो. एकंदरच मंदार "लार्जर दॅन लाईफ़ " वाटायला लागतो तितक्यात त्याच्या हातुन अनावधानाने खुन होतो, तेव्हा मात्र मंदार सामान्य माणसासारखा वागुन आपल्याला पुन्हा जमिनीवर आणुन ठेवतो.

संपुर्ण कादंबरीमधे "खुबसुरत काकु", रांड शालिनी " असे उल्लेख वारंवार येत रहातात आणि आपल्या मध्यमवर्गीय, सांस्कॄतिक वगैरे विचारसरणीला लाथा हाणत राहतात. भाऊ पाध्येंचं लिखाण आजच्या काळात एवढं झोंबतं तर १९७५ साली किती आग लागली असेल.


शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

एका दिशेचा शोध - संदीप वासलेकर


लेखक - संदीप वासलेकर

संदीप वासलेकरांनी मांडलेले मुद्दे, दीलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. भारत एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असं एक चित्र सातत्याने आपल्यासमोर उभं केलं जातं. ऐकायला कितीही गोड वाटलं तरी अर्थिक महासत्त्ता वगैरे बनणं  म्हणजे हे पोकळ स्वप्नच आहे ही वस्तुस्थिती वासलेकरांच्या ह्या पुस्तकातुन समोर येते.

सरकार किंवा वित्तीय संस्थांकडुन जी आकडेवारे दिली जाते त्या पेक्षा न दीलेली आकडेवारी बरीच मोठी असते.  अर्थिक ताकदीत जरी भारत पहिल्या पाच दहा देशांमधे असला तरी एकुण नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा इतर मह्त्त्वाचे निष्कर्ष लावले तर मात्र आपण पहिल्या शंभरात पण नसु.

नुसती आकडेवारी मांडुन, निष्कर्ष काढुन वासलेकर थांबत नाहीत तर त्यांनी मार्गही सुचवलेत.


अभ्यासण्यासारखं पुस्तक.

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

कंपनी ऑफ़ विमेन - खुशवंतसिंग



लेखक -- खुशवंतसिंग अनुवादीत

खरं तर खुशवंतसिंगांचं नाव बघुन पुस्तक घेतलं पण पुस्तक तद्दन बाजारु आहे. फ़ुटपाथवर मिळणाऱ्या "तसल्या" पिवळ्या पुस्तकांपेक्षा जरा बरं म्हणता येईल एवढी नको त्या गोष्टींची वर्णनं. पुस्तक नक्की कशावर, आणि का लिहीलंय ते शेवटपर्यंत समजलं नाही.

एक घटस्फ़ोतित उद्योजक, त्याच्या मोकाट, भरकटलेल्या आयुष्य़ाची ही कहाणी. पुस्तकाचा ८०% भाग "रसाळ" वर्णनांनी भरलेला. शेवट मात्र एखाद्या बोधकथेसारखा, संदेश वगैरे देणारा.