शनिवार, २६ मार्च, २०१६

"TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया


भ्रष्टाचार, काळा पैसा, गुन्हेगारी ह्या समस्या जेवढ्या मोठ्या आहे तेवढीच मोठी समस्या आहे "TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया. त्या कसाबला पण ह्यांच्या समोर उभं केलं असतं तर नुसत्या प्रश्नांनी जीव घेतला असता ह्या लोकांनी त्याचा.............काय असू शकले असते ह्यांचे प्रश्न ?

१. कसाबजी सेंकडों लोगोंको मार कर आपको कैसा लग रहा है ?
२. तुम्हाला तुरुंगात देतात ती बीर्याणी तुम्हाला आवडते का ? बीर्याणी नंतर स्वीटडीश पण देतात का ?
३. पाकिस्तानमधे शाहरुख खान लोकप्रिय आहे की सलमान खान ?
४. तुम्हाला शुक्रवारी फ़ाशी जायला आवडेल की कोणताही दिवस चालेल ?
५. तुरुंगात डास फ़ार आहेत का ?
६. तुरुंगात तुमच्यासाठी शौचालय भारतीय आहे की पाश्चात्य पद्धतीच ? तुम्हाला कोणतं आवडतं
७. तुम्हाला वाटतं का की तुमचा नेमबाजीचा सराव थोडा कमी पडला ?
८. तुम्हाला परत संधी मिळाली तर कमीत कमी किती लोकांना मारु शकाल असं तुम्हाला वाटतं.
९. तुमच्यात पण टारगेट वगैरे असतं का ? तुमचं २००८ चं टारगेट पुर्ण झालं का ? इंसेटीव्ह कीती मिळणार ?

हे प्रश्न ऐकता ऐकता कसाब बेशुद्ध पडला असता  त्याला हॉस्पीटल मधे नेताना त्याने विचारलं असतं "तुमच्याकडे दयामरण देतात का ? असतील तर लगेच मला फ़ाशी दया आणि देत नसतील तर मला पुन्हा तुरुंगात टाका." वाट्टेल ते करा पण पुन्हा मला ह्या लोकांसमोर पुन्हा उभा करु नका."

मंगळवार, २२ मार्च, २०१६

Don’t try temporary solutions

प्रत्येक मोठ्या कंपनीत HR Department असतं. त्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक Employee ची productivity जास्तीत जास्त राहील ( कमीत कमी पैशात ) हे बघणं ह्या Department चं मुख्य काम असतं. ह्या HR Department कडून वेळोवेळी Training पण घेतली जातात.

मी काही कधी कुठल्या मोठ्या कंपनीत काम केलं नाही ( मला घेतलं नाही कोणी ) पण अशी
Training खिशातले पैसे भरून पण Attend करता येतात. मला सवय होती, अशा ट्रेनिंगला जाऊन आलो की त्याचं एक छोटसं presentation बनवून ठेवायचं. सहज जुनी presentations बघताना एक presentation पुन्हा बघितलं. ह्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं गेलेलं की कोणत्याही प्रॉब्लेमच्या मुळाशी जा “Don’t try temporary solutions, go to the Root cause” .........अजून पण बरंच काही “तत्त्वज्ञान” शिकवलेलं.
माझं आजोळ सांगली जिल्ह्यातलं विटा. गोष्टीत असायची तशीच मामाची छान शेती, शेतातलं घर, बारमाही पाणी असलेल्या विहिरी आणि अतोनात जीव लावणारे मामा मामी. साधारण एकाच वयातल्या मावस बहिणी, मामे भाऊ, बहिणी सगळी मिळून आम्ही १२/१५ भावंडं सुट्टी लागली कि गावाला पळत सुटायचो. अख्खा दिवस नुसता धुडगूस असायचा.

पाणी मुबलक होतं त्यामुळे उन्हाळ्यात पण थोडी फार शेती व्हायची. आंबे, काकडी, बोरं, पेरू, भुईमुग अशा गोष्टींवर आमची आधाशी नजर जेवढी असायची तेवढीच पाखरांची आणि माकडांच्या टोळ्यांची पण असायची. शेतातलं घर त्यातल्या त्यात उंचावर होतं त्यामुळे शेतात माकडं शिरलेली घरातून पण दिसायचं.

माकडांची टोळी शेतात शिरलेली दिसली की आमच्या अंगात वारं शिरायचं. मोठ्या काठ्या नाचवत मोठ मोठ्याने पत्र्याचे डबे आणि तोंडं वाजवत आम्ही माकडांच्या दिशेने पळत सुटायचो. सोबतीला मामाने पाळलेली दांडगट आक्राळ विक्राळ कुत्री पण असायची. हाताला लागतील ते दगड, मातीची ढेकळं आम्ही माकडांवर भिरकावायचो.

१२ /१५ किंचाळणारी पोरं, हातातल्या काठ्या, कर्कश्य वाजणारे डबे आणि नुसत्या भुंकण्याने मळा दणाणून सोडणारी कुत्री. माकडं धूम पळत सुटायची. मळ्याच्या हद्दीपर्यत मग हा चोरपोलिस खेळ चालायचा ........आम्ही शिकार करून आल्याच्या आवेशात परत फिरायचो.


एके दिवशी संध्याकाळच्या वेळी अशीच माकडं शेतात घुसलेली दिसली. विचार करायची सवय तेव्हाही नव्हती. मी आणि माझ्या बरोबरचे माझे दोघे मामेभाऊ असे आम्ही तिघेच आरडा ओरडा करत पळत सुटलो. हे लक्षातच नव्हतं की त्या वेळी मळ्यात फक्त आम्ही तिघेच होतो. अगदी कुत्री पण घरातल्या बाकीच्यांच्या बरोबर लांबवर हिंडायला गेलेली. नेहेमीप्रमाणे आरडाओरडा करत दगड भिरकावायला सुरुवात केली. माकडं पटकन दाद देईनात. आम्ही खूपच आरडाओरडा करतोय हे बघून त्यांनी काढता पाय घेतला. आम्हाला अजून अवसान चढलं आणि आम्ही त्या नादात कोरड्या ओढ्यातून दगड मारत त्या टोळीच्या मागे पळत सुटलो. मळ्यापासून लांब आल्याचं आमच्या आधी माकडांना कळलं आणि त्यांच्या पाठोपाठ मला कळलं.

काही क्षणात बाजी पलटली ...........काही क्षणांपूर्वी माकडं पुढे आणि आम्ही मागे धावत होतो ........आता आम्ही पुढे आणि दात विचकत किंचाळणारी माकडं आमच्या मागे लागलेली. अर्थातच  बाकीच्या दोघांचं काय झालं ते बघायला सुचलंच नाही.

जीव खाऊन मळ्याकडे पळत सुटलो. प्रत्येकाला ठेचा लागल्या, गुढगे फुटले, कोपरं सोलपटली, माकडांनी “कुठे कुठे” बोचकारलं.........मळ्यात शिरून घराजवळ पोचलो तेव्हा कुठे माकडं परत फिरली. लागल्याचं दुःख होतं पण “जान बची तो लाखो पाये” हे तेव्हाही कळत होतं.

त्या AC हॉल मध्ये पैसे घेऊन Training द्यायला, “
Don’t try temporary solutions, go to the Root cause always” हे घोकून घ्यायला तुमचं काय जातंय राव “ज्याचं सोलापटतं त्याला कळतं”

माकडांसारख्या उपद्रवी प्रॉब्लेम्सच्या मागे जरूर लागा पण त्या आधी उपलब्ध साधनसामुग्री नीट तपासून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची “हद्द” सोडू नका कारण तुम्हीच खाजवून ओढवून घेतलेला “प्रॉब्लेम” जर का तुमच्या मागे लागला तर ...........
.
.
कायम मळ्यात परतायला वेळ मिळेलच असं नाही. 

बुधवार, १६ मार्च, २०१६

लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील



मुळात मी विश्वास पाटलांच्या लिहीण्याचा कट्टर भक्त, सर्वात पहिली कादंबरी वाचली ती झाडाझडती. मग व्यसनच लागलं पाटलांच्या लिहीण्याचं. चंद्रमुखी, पानिपत, पांगिरा, महानायक , संभाजी, नाना पाटलांवरचं क्रांतीसुर्य, रणांगण अशी जवळपास सगळीच पुस्तकं आधाशासारखी वाचून काढली.
बरेच दिवस येणार येणार ऐकलेलं लस्ट फॉर लालबाग हातात पडेपर्यंत जीव वरखाली होत होता. पुस्तक वाचायला घेतलं...... जसजसं पुस्तक वाचून होत गेलं तसतसा मी मात्र पुस्तकापासून Disconnect होत गेलो. काही तरी चुकतंय असं वाटत राहिलं. इच्छा होत नव्हती तरीही शेवटपर्यंत वाचून काढलं.


Normally चांगल्या कादंबरीवरून चित्रपट काढला जातो पण पुस्तक वाचताना सतत कुठे तरी असं वाटत राहिलं की कुठल्या तरी “मसाला” चित्रपटावरून ही कादंबरी लिहीली आहे. गिरणी कामगार .......बंद पडत चाललेल्या गिरण्या .......दत्ता सामंतांनी कामागारांसाठी दिलेली झुंज .......त्याच वेळी गुन्हेगारी विश्वाचा मुंबापुरीवर वाढत चाललेला प्रभाव ............आणि चोरावर मोर असलेले राजकारणी........त्यातच नायकाची प्रेमकथा ........तत्त्वासाठी झगडणारा त्याचा बाप .............आणि मग कलाटणी देणारा ........अनपेक्षित शेवट.... हे सगळं सगळं आहे कादंबरीत

वास्तव चित्रपटातला संजय दत्त सापडला कादंबरीत, जागोजागी दिवार मधला अमिताभ सापडला,“अपहरण” चित्रपटातला अजय देवगणचा बाप सापडला कादंबरीत, वास्तव मधलीच रिमा लागू पण सापडली .........फक्त माझ्यासाठी “ग्रेट” असलेले विश्वास पाटील मात्र शेवटपर्यंत नाही सापडले मला कादंबरीत.

त्यांच्या आधीच्या लिखाणामुळे माझ्याच अपेक्षा मी खूप वाढवून ठेवलेल्या असतील किंवा असंही असेल की मला कादंबरी कळलीच नाहीये. 

मंगळवार, १५ मार्च, २०१६

जाट - पटेल - मराठा आरक्षण


अलिकडे जाट समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी उग्र आंदोलन केलं. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रचंड परिणाम तर झालाच पण जाळपोळ आणि लुटमारीसारख्या प्रकारांबरोबरच बलात्कारासारखे हीन प्रकार पण झाले. मुळात जाट समाज असेल, गुजराथ मधला पटेल समाज असेल किंवा महाराष्ट्रातला मराठा समाज असेल, यांना आरक्षण देताना “राजकीय अपरिहार्यता” हा एकच निकष लागू होतो. रस्त्यावर उतरून, जाळपोळ करून आरक्षण मागणारे पण तेच आणि मंत्रालयातल्या गुबगुबीत खुर्चीत बसून “देणारे” पण तेच.फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाबद्दल बोलायचं झालं तर ही आकडेवारी खूप बोलकी आहे
  1. महाराष्ट्रातल्या ५०% पेक्षा जास्त जमिनीची मालकी मराठा समाजाकडे आहे.
  2. महत्त्वाच्या १०५ पैकी ८६ साखर कारखाने मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. साखर कारखाने ताब्यात असणं म्हणजे किती ताकद असते हे शेतकरीच जास्त चांगलं सांगू शकतील. 
  3. महाराष्ट्रातल्या ५४% शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. 
  4. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे साधारण १९६२ पासून आजवर सातत्याने ५५% आमदार विधानसभेत बसले आहेत.
  5. आजवर १७ पैकी १२ मुख्यमंत्री मराठा समाजातले होते.
कोणाच्या दबावाला किती बळी पडायचं हे जरी सरकारच्या हातात असलं तरी शेवटी त्यात नुकसान खुर्च्या उबवत बसलेल्या राजकारण्यांचं नाही. ज्या गोष्टीची ह्या राजकारण्यांच्या पुढच्या १५/२० पिढ्यांना गरज पडायची गरज नाही ते देऊन टाकायला ह्यांचं काय जातंय.दुःख म्हातारी मेल्याचं पण आहे आणि काळ सोकावातोय त्याचं पण आहे.

http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/3415/12/12_chapter%207.pdf