सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

बुद्धीवादी आणि बद्धकोष्ठी


बुद्धीवादी आणि बद्धकोष्ठी हे समानार्थी शब्द नसले तरी समांतर शब्द आहेत.
😊
दोन्ही प्रकारचे म्हणजे बुद्धीवादी आणि बद्धकोष्ठी लोक "काय, कसं आणि किती" करायचं ह्याचा विचार करण्यातच जास्त वेळ घालवतात ,,,,,
😊
😊
आणि पुन्हा "अपेक्षित" परिणाम घड़णं त्यांच्या हातात कधीच नसतं.
😊
दोघात फरक एकच असतो .
बुद्धीवादी माणसाला हे माहितच नसतं की हा आजार आहे 😜😜

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

बाबासाहेब पुरंदरे
























बरं झालं शिवाजी महाराज ब्राह्मण नव्हते नाही तर “साहेबांच्या” जाती पातीच्या राजकारणात महाराज पण भरडले गेले असते.
पूर्वी कधी तरी काका विधातेच्या “संताजी” कादंबरीत एक उल्लेख होता. संताजी घोरपडे लहान असताना त्यांना शिकवणाऱ्या केशव भटांना त्यांनी विचारलं “स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठा यात फरक काय “ केशव भटांनी दिलेल्या उत्तराचे नेमके शब्द मला आठवत नाहीत पण त्याचा अर्थ असा होता “स्वत:चा आणि स्वकीयांचा मान राखण्यासाठी जीवाची बाजी लावणं हा स्वाभिमान आणि स्वत:च्या स्वामीसाठी आप्त स्वकीयांच्या जीवावर उठायला तयार असणं ही स्वामीनिष्ठा”

“साहेबांच्या” श्वानपथकातल्या स्वयंघोषित इतिहासाचार्यांना ह्या पुढेही “साहेबांच्या धोरणानुसारच” नवीन नवीन शोध लागत राहतील आणि स्वामीनिष्ठेचं प्रदर्शन करण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे शिव चरित्राचे कीर्तनकार त्यात भरडले जातील.... या सगळ्यात वेगळं किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

मी इतिहासाचा अभ्यासक वगैरे नाही पण वाचक नक्की आहे. बाबासाहेब पुरंदरेनी महाराजांवर लिहायला बोलायला सुरुवात केली त्या आधी देखील महाराजांवर लिहीलं जात होतंच की, पण ती भाषा माझ्यासारख्या “मध्यमवर्गीय” अक्कल असणाऱ्याला न झेपणारी होती. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी भगवत गीता साध्या सोप्या....त्या वेळच्या सर्वसामान्यांच्या भाषेत आणली....मला तुलना नाही करायची पण माझ्यासाठी ऋषीतुल्य बाबासाहेब पुरंदरेनी तसंच काहीसं केलं.

“साहेबांच्या” श्वानपथकात स्वेच्छेने भरती झालेल्यात मुंब्र्याच्या अनधिकृत वस्तीचा पुळका असणाऱ्या गावगुंडांपासून आयुष्यभर कुसुमाग्रजांवर भूंकून निर्लज्जपणे त्यांच्याच नावाचा पुरस्कार स्वीकारणारे पण आहेत याचं वाईट वाटतं.

काल तर ऐकलं की उदयनराजे भोसले पण आता बाबासाहेबांच्या विरोधात बोलताहेत .......हा विरोध त्यांनी सकाळी नोंदवला की संध्याकाळी हेही तपासून बघावं लागेल.

नकाच देऊ बाबासाहेबांना पुरस्कार काही फरक नाही पडत ...........महाराष्ट्राच्या घराघरात बाबासाहेबांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांचं चरित्र आज भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने जपलं जातं हाच खरा पुरस्कार आहे.

शनिवार, २५ जुलै, २०१५

हत्या– श्री.ना पेंडसे



लेखक – श्री.ना पेंडसे

पुस्तकाचं नाव वाचून मला वाटलेलं “हत्या” म्हणजे खून ह्या अर्थी, एखादी रहस्य कथा असावी पण मग कळलं ते कादंबरीतल्या एका व्यक्तिरेखेचं नाव आहे.
जेमतेम कळायला लागणाऱ्या वयातल्या एका मुलाची ही कथा. ढीगभर दुःख आणि गळ्यापर्यंत अडचणी सोसत पुढे जात राहणाऱ्या एका कोवळ्या जीवाची जीवघेणी धडपड. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता साधं दिसणारं पण वळणा वळणांनी पुढे जात राहणारं खिळवून ठेवणारं कथानक.

“तुंबाडचे खोत” प्रमाणेच तत्कालीन परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहते, वाचता वाचता आपणही त्या काळाचा, हत्याच्या आयुष्याचा एक भाग होवून जातो.


खूप छान कादंबरी 

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

शांताराम - ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स




लेखक ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
अनुवादक : अपर्णा वेलणकर

एक परदेशी गुन्हेगार भारतात येतो आणि मग इथलाच होवून राहतो. आत्मचरित्राच्या नावाखाली जवळपास १००० पानांचं एक थोतांड. माझ्या मते फार तर ३०% सत्य आणि ७०% कल्पना.

मुंबईतल्या अंडरवल्ड मध्ये हिरोगिरी करून, अनेक बदले वगैरे घेऊन, एकेकट्याने हाणामाऱ्या करून, समाजकार्य करून समाधान होत नाही म्हणून अफगाणिस्तानात जाऊन लढून, जिवंत परतलेल्या एका साहसावीराची सुरुवातीला खरी वाटणारी आणि नंतर नंतर कल्पनाविलासात भरकटलेली कादंबरी. जबरदस्त "मार्केटींग" मुळे अपेक्षा उंचावणारी एक पोकळ कथा एवढंच मला म्हणता येईल.

अपर्णा वेलणकरांनी केलेला अनुवाद मात्र मानावा लागेल. संपूर्ण पुस्तक मराठीतच प्रकाशित करून मग त्यावरून इंग्रजी अनुवाद केला असावा असं वाटावं इतपत उत्कृष्ठ अनुवाद.