बुधवार, ३० मार्च, २०१६

टी.आर.पी. साठी काय पण, कधी पण, कुठे पण ......



ह्या मिडीयाचं म्हणजे कसं झालंय माहितेय का ? आधी स्वतःच आग लावायची ................मग “सबसे पेहले” त्या आगीची “ब्रेकिंग न्यूज” द्यायची .....................मग आग विझवायला सरकारी यंत्रणा कशी चार मिनीटांऐवजी साडेपाच मिनिटात पोहोचली ह्यावर दिवसभर काथ्याकुट करायचा.............पुन्हा संध्याकाळी स्टुडिओत दोन चार “स्वयंघोषित” विद्वान जमा करायचे आणि..................... आग विझवायला दोनशे एकोणपन्नास लिटर पाण्याची आवश्यकता असताना फक्त दोनशे चाळीस लिटर पाणीच वापरून सरकारी यंत्रणेला मूर्ख ठरवायचं किंवा.................... आग विझवताना दोनशे बावन्न लिटर पाणी वापरून सरकारी यंत्रणेने पाण्याचा कसा अपव्यय केला ह्यावर AC स्टुडीओत वांझोटी चर्चा घडवून आणायची.

अगदी अलीकडची त्या कन्हैय्याची केस असेल किंवा त्या कुठल्या तरी साधू बाबाला पडलेलं जमिनीखालच्या खजिन्याचं स्वप्न असेल, काड्या घातल्या त्या मिडीयाने..................सरकारी यंत्रणा पण ह्यांच्या नादाला लागून मुर्खासारखी पावले उचलते आणि हसं करून घेते.

एका गोष्टीचा जरा विचार करून बघा ........ राजकारणी , गुंड किंवा अगदी काही वेळेला मोठे
Businessman सुद्धा उघड उघड एकमेकांच्या विरोधात उभे राहतात ...........आव्हान देतात ....................असं कधी कुठल्या न्यूज चानेलने केलंय का ? ................कधी झी न्यूज ने ए.बी.पी. न्यूजचं स्टिंग ओपेरेशन केलंय का ? कधी जय महाराष्ट्रवाल्यांनी ..........आय.बी.एन. लोकमतचं “भांडाफोड”वगैरे केलंय का ?..........जवळपास प्रत्येक राजकीय पक्षावर ............राजकारणातल्या व्यक्तींवर....................ह्या सुपारीबाज मिडीयाने वाट्टेल ते आरोप लावले.......... पोलिस किंवा इतर सरकारी अधिकारी कसे नालायक आहेत ते आपल्याला सांगितलं, पटवून दिलं ............वाट्टेल तशा बातम्या पसरवल्या पण आजवर कोणत्या तरी प्राईम टाईमच्या चर्चेच्या गुऱ्हाळात ह्या पत्रकारांना ...........आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का ?

लोकशाहीचा चौथा स्तंभ ...........सशक्त लोकशाही साठी “स्वतंत्र” मिडीयाची कशी गरज आहे वगैरे सगळं मला मान्य आहे .................पण हा असला टी.आर.पी. साठी वाट्टेल त्या थराला जाणारा मिडीया असण्यापेक्षा ..........



उरलेल्या तीन स्तंभांवरच लोकशाही टिकलेली बरी. 

मंगळवार, २९ मार्च, २०१६

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य

रोजच्या प्रमाणे त्या दिवशीही ऑफ़िसला जाण्यासाठी म्हणुन कॉम्प्लेक्स च्या गेटमधुन बाहेर पडलो, समोर बघितलं तर रस्त्याच्या पलीकडे चक्क ४/५ शेअर रिक्षावाले रांगेत उभे होते. कहर म्हणजे टोळकं करून बिड्या ओढत एकत्र न उभे राहता आपापल्या रिक्षात बसून होते.  मी रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात माझ्यासमोर एक रिकामी रिक्षा थांबली.

रिक्षावाल्याने अदबीने विचारलं "साहेब कुठे जाणार" 
खरं तर आमच्या इथून रिक्षावाले ..........कधीच कुठेच जात नाहीत
मी चाचरत उत्तर दिलं "स्टेशन"
तो पुन्हा तेवढ्याच अदबीने म्हणाला "बसा साहेब"
"किती पैसे घेणार ?" महिनाअखेर होती ......... पुन्हा चाचरतच मी विचारलं
रिक्षावाला चक्क गोड हसला आणि म्हणाला "काय साहेब थट्टा करताय ? मिटर ने होतील तेवढेच दया "

मला चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं
, मी तसाच रिक्षात बसलो, त्याने मिटर टाकलं, मिटरचा आवाज ऐकुन दचकुन मी थोडा  भानावर आलो. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच कल्याणातल्या रिक्षाच्या मिटरचा एवढा गोड आवाज ऐकला होता आणि चालु असलेलं मिटर पण बघितलं होतं.

रिक्षा चालवता चालवता रिक्षावाले साहेब सांगायला लागले
"आता आम्ही प्रवाशांशी सौजन्याने वागायचं ठरवलंय, प्रत्येक रिक्षामधे एक रजिस्टर ठेवलंय त्यात प्रवाशांनी आमची सेवा कशी वाटली त्याबद्दल लिहायचंय, सर्वात चांगली सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचा आमच्या युनियनतर्फ़े सत्कार केला जाणार आहे, आम्ही रिक्षा चालवताना शिव्या देणार नाही, गुटखा खाउन पचापचा थुंकणार नाही, फ़ालतु कारणांसाठी प्रवाशांना झोडणार नाही, कुठलंही भाडं नाकारणार नाही, रात्रीची वेळ बघुन प्रवाशांना लुटणार नाही"

रिक्षावाल्या साहेबांचं सौजन्य पाहुन माझ्या डोळ्यासमोर पुन्हा अंधारी यायला लागली तेवढ्यात एकही हादरा बसु न देता रिक्षा स्टेशनला पोचली.

"किती झाले ?" मी पुरता सावरलो नव्हतोच खरं तर
"सतरा रुपए पन्नास पैसे" मी विसची नोट दिली
त्याने अडीच रुपए परत केले, मला पुन्हा गरगरायला लागलं, आज ऑफ़िसमधे सगळ्यांना चहा पाजायचं ठरवुन मी स्टेशनकडे वळलो.

साला...................पुन्हा तेच.......... बायकोने पुन्हा तोंडावर पाणि ओतुन झोपेतुन उठवलं आणि कळायला लागल्यापासुन ( नक्की कितव्या वर्षापासुन कळायला लागलं त्याबद्दल वाद होवु शकतो म्हणुन वर्ष लिहीली नाहीत) उराशी जीवापाड जपलेलं एक स्वप्न पुन्हा मोडलं.

माझ्या स्वप्नाचा चक्काचुर होत असताना "खळ्ळ्ळ फ़टॅटॅटॅक" असा आवाजही आला मंडळी..........


शनिवार, २६ मार्च, २०१६

"TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया


भ्रष्टाचार, काळा पैसा, गुन्हेगारी ह्या समस्या जेवढ्या मोठ्या आहे तेवढीच मोठी समस्या आहे "TRP" साठी कुठल्याही थराला जाणारा मिडीया. त्या कसाबला पण ह्यांच्या समोर उभं केलं असतं तर नुसत्या प्रश्नांनी जीव घेतला असता ह्या लोकांनी त्याचा.............काय असू शकले असते ह्यांचे प्रश्न ?

१. कसाबजी सेंकडों लोगोंको मार कर आपको कैसा लग रहा है ?
२. तुम्हाला तुरुंगात देतात ती बीर्याणी तुम्हाला आवडते का ? बीर्याणी नंतर स्वीटडीश पण देतात का ?
३. पाकिस्तानमधे शाहरुख खान लोकप्रिय आहे की सलमान खान ?
४. तुम्हाला शुक्रवारी फ़ाशी जायला आवडेल की कोणताही दिवस चालेल ?
५. तुरुंगात डास फ़ार आहेत का ?
६. तुरुंगात तुमच्यासाठी शौचालय भारतीय आहे की पाश्चात्य पद्धतीच ? तुम्हाला कोणतं आवडतं
७. तुम्हाला वाटतं का की तुमचा नेमबाजीचा सराव थोडा कमी पडला ?
८. तुम्हाला परत संधी मिळाली तर कमीत कमी किती लोकांना मारु शकाल असं तुम्हाला वाटतं.
९. तुमच्यात पण टारगेट वगैरे असतं का ? तुमचं २००८ चं टारगेट पुर्ण झालं का ? इंसेटीव्ह कीती मिळणार ?

हे प्रश्न ऐकता ऐकता कसाब बेशुद्ध पडला असता  त्याला हॉस्पीटल मधे नेताना त्याने विचारलं असतं "तुमच्याकडे दयामरण देतात का ? असतील तर लगेच मला फ़ाशी दया आणि देत नसतील तर मला पुन्हा तुरुंगात टाका." वाट्टेल ते करा पण पुन्हा मला ह्या लोकांसमोर पुन्हा उभा करु नका."

मंगळवार, २२ मार्च, २०१६

Don’t try temporary solutions

प्रत्येक मोठ्या कंपनीत HR Department असतं. त्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक Employee ची productivity जास्तीत जास्त राहील ( कमीत कमी पैशात ) हे बघणं ह्या Department चं मुख्य काम असतं. ह्या HR Department कडून वेळोवेळी Training पण घेतली जातात.

मी काही कधी कुठल्या मोठ्या कंपनीत काम केलं नाही ( मला घेतलं नाही कोणी ) पण अशी
Training खिशातले पैसे भरून पण Attend करता येतात. मला सवय होती, अशा ट्रेनिंगला जाऊन आलो की त्याचं एक छोटसं presentation बनवून ठेवायचं. सहज जुनी presentations बघताना एक presentation पुन्हा बघितलं. ह्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं गेलेलं की कोणत्याही प्रॉब्लेमच्या मुळाशी जा “Don’t try temporary solutions, go to the Root cause” .........अजून पण बरंच काही “तत्त्वज्ञान” शिकवलेलं.
माझं आजोळ सांगली जिल्ह्यातलं विटा. गोष्टीत असायची तशीच मामाची छान शेती, शेतातलं घर, बारमाही पाणी असलेल्या विहिरी आणि अतोनात जीव लावणारे मामा मामी. साधारण एकाच वयातल्या मावस बहिणी, मामे भाऊ, बहिणी सगळी मिळून आम्ही १२/१५ भावंडं सुट्टी लागली कि गावाला पळत सुटायचो. अख्खा दिवस नुसता धुडगूस असायचा.

पाणी मुबलक होतं त्यामुळे उन्हाळ्यात पण थोडी फार शेती व्हायची. आंबे, काकडी, बोरं, पेरू, भुईमुग अशा गोष्टींवर आमची आधाशी नजर जेवढी असायची तेवढीच पाखरांची आणि माकडांच्या टोळ्यांची पण असायची. शेतातलं घर त्यातल्या त्यात उंचावर होतं त्यामुळे शेतात माकडं शिरलेली घरातून पण दिसायचं.

माकडांची टोळी शेतात शिरलेली दिसली की आमच्या अंगात वारं शिरायचं. मोठ्या काठ्या नाचवत मोठ मोठ्याने पत्र्याचे डबे आणि तोंडं वाजवत आम्ही माकडांच्या दिशेने पळत सुटायचो. सोबतीला मामाने पाळलेली दांडगट आक्राळ विक्राळ कुत्री पण असायची. हाताला लागतील ते दगड, मातीची ढेकळं आम्ही माकडांवर भिरकावायचो.

१२ /१५ किंचाळणारी पोरं, हातातल्या काठ्या, कर्कश्य वाजणारे डबे आणि नुसत्या भुंकण्याने मळा दणाणून सोडणारी कुत्री. माकडं धूम पळत सुटायची. मळ्याच्या हद्दीपर्यत मग हा चोरपोलिस खेळ चालायचा ........आम्ही शिकार करून आल्याच्या आवेशात परत फिरायचो.


एके दिवशी संध्याकाळच्या वेळी अशीच माकडं शेतात घुसलेली दिसली. विचार करायची सवय तेव्हाही नव्हती. मी आणि माझ्या बरोबरचे माझे दोघे मामेभाऊ असे आम्ही तिघेच आरडा ओरडा करत पळत सुटलो. हे लक्षातच नव्हतं की त्या वेळी मळ्यात फक्त आम्ही तिघेच होतो. अगदी कुत्री पण घरातल्या बाकीच्यांच्या बरोबर लांबवर हिंडायला गेलेली. नेहेमीप्रमाणे आरडाओरडा करत दगड भिरकावायला सुरुवात केली. माकडं पटकन दाद देईनात. आम्ही खूपच आरडाओरडा करतोय हे बघून त्यांनी काढता पाय घेतला. आम्हाला अजून अवसान चढलं आणि आम्ही त्या नादात कोरड्या ओढ्यातून दगड मारत त्या टोळीच्या मागे पळत सुटलो. मळ्यापासून लांब आल्याचं आमच्या आधी माकडांना कळलं आणि त्यांच्या पाठोपाठ मला कळलं.

काही क्षणात बाजी पलटली ...........काही क्षणांपूर्वी माकडं पुढे आणि आम्ही मागे धावत होतो ........आता आम्ही पुढे आणि दात विचकत किंचाळणारी माकडं आमच्या मागे लागलेली. अर्थातच  बाकीच्या दोघांचं काय झालं ते बघायला सुचलंच नाही.

जीव खाऊन मळ्याकडे पळत सुटलो. प्रत्येकाला ठेचा लागल्या, गुढगे फुटले, कोपरं सोलपटली, माकडांनी “कुठे कुठे” बोचकारलं.........मळ्यात शिरून घराजवळ पोचलो तेव्हा कुठे माकडं परत फिरली. लागल्याचं दुःख होतं पण “जान बची तो लाखो पाये” हे तेव्हाही कळत होतं.

त्या AC हॉल मध्ये पैसे घेऊन Training द्यायला, “
Don’t try temporary solutions, go to the Root cause always” हे घोकून घ्यायला तुमचं काय जातंय राव “ज्याचं सोलापटतं त्याला कळतं”

माकडांसारख्या उपद्रवी प्रॉब्लेम्सच्या मागे जरूर लागा पण त्या आधी उपलब्ध साधनसामुग्री नीट तपासून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची “हद्द” सोडू नका कारण तुम्हीच खाजवून ओढवून घेतलेला “प्रॉब्लेम” जर का तुमच्या मागे लागला तर ...........
.
.
कायम मळ्यात परतायला वेळ मिळेलच असं नाही.