गुरुवार, ९ ऑगस्ट, २००७

कशास भजता काळ्या हरीला

काय मिळाले त्या मीरेला
कशास भजता काळ्या हरीला

तुम्ही वेडे मीरा भोळी
तुम्हा फ़सविते मंजुळ मुरलि

कुणा समजली करणि त्याची
कुणा गवसली प्रीती त्याची

कशास असली स्वप्ने बघता
कशास हरिला माझा म्हणता

धराल कैसे हात तयाचे
पुजाल कैसे चरण तयाचे

नसे मानवी नसे देव तो
व्यापुन उरला अवघे विश्व तो

तो तर कर्ता ह्या विश्वाचा
जन्मदाता तो शतजन्मांचा

ही प्रीती कैसी तुमची म्हणता
उरात तुमच्या त्याची सत्ता

तो तर असतो सर्व करविता
तुम्हा मुखातुन भाव वदविता

तुमची प्रीतही त्याची करणी
तुम्हा लोचनी त्याचे पाणी

देहही तुमचा त्याचे देणे
देहात ओतीला आत्मा त्याने

असा कोरीला, असा घडविला
निव्वळ त्याचा भाव भरिला

नव्हता तुम्ही कधी स्वतःचे
तुम्ही खेळणे काळ्या हरिचे

1 टिप्पणी:

prabhavati म्हणाले...

फ़ारच छान कविता.

नसे मानवी नसे देव तो
व्यापुन उरला अवघे विश्व तो


नव्हता तुम्ही कधी स्वतःचे
तुम्ही खेळणे काळ्या हरिचे

कविने खरंच ओळखलंय्‌‌ त्या सावळ्याला, ह्यात शंकाच नाही.अप्रतीम रचना.