बुधवार, ८ ऑगस्ट, २००७

शायरी


बेभान वा-यावर जरा ढळला पदर तिचा
पाहिले आम्ही अन आम्ही बेहोष झालो
ऐसे नव्हे की आम्हा दिसलेच काही
पाहुनी तिची बेहोषी आम्ही बेहोष झालो

आरशास आम्ही तसे
कधी भुललोच नाही
दिसतो जे आम्हास आम्ही
त्याला तसे दिसलोच नाही

चढवाल जो तुम्ही तो रंग मान्य आहे
आरोप सभ्यतेचा आम्हा अमान्य आहे
गद्दार भोवती दुनिया मदिराच साथ आहे
मद्यपी म्हणती आम्हा ती बाब गौण आहे

ही व्यथा माझीच आहे अन दुःखही माझेच आहे
ओघळले गालावरती रक्त ते माझेच आहे
शब्दही माझेच अन वेदनाही माझीच आहे
पिळवटुन ह्रुदय आली शायरी ती माझीच आहे

मरणास कोण डरतो
आहेच तेही यायचे
स्वतःस मी बजावतो
तेव्हा तरी हसायचे

भावना असते खरी अन वेदना ही असते खरी
आसवांची दाद मिळते, शायरी ती असते खरी

कोण तो मृत्युच का रे आम्हास आला न्यावया
ठेवलाहे प्राण सज्ज आम्ही तयाला द्यावया
चल निघुया लोक जमतिल अश्रु कोरडे ढाळावया
बागेतील अमुच्या फ़ुले तोडतील आम्हावरी वहावया

सजविण्यास प्रेत माझे काही गुलाब आले
उचलण्यास तिरडी माझेच हात आले
पोचविण्या स्मशानी मोजके लोक आले
श्राद्धात जेवणाला अमाप आप्त आले

हासलो इष्कात नाही रडलो विरहात नाही
रमलो दुःखात आम्ही रंगलो प्रणयात नाही
का आम्ही जन्मास आलो आम्हा कधी कळलेच नाही
मुडद्यापरी जगण्यास येथे आम्हास आता हौस नाही
१०
व्याख्या नकाच सांगु आम्हास सौंदर्याची
ऐसे रसिक आम्ही करु खोटी स्तुती कुणाची ?
आम्हास तिच दिसते अप्सरा स्वर्गातली
तुम्हास फ़क्त कळते ती अमुच्या घरातली

1 टिप्पणी:

prabhavati म्हणाले...

छान. एकीकडे कधी गंभीर विषय हाताळणार कवि, तितकाच हळवा शायरही आहे !