शुक्रवार, २४ जुलै, २०१५

शांताराम - ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स




लेखक ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
अनुवादक : अपर्णा वेलणकर

एक परदेशी गुन्हेगार भारतात येतो आणि मग इथलाच होवून राहतो. आत्मचरित्राच्या नावाखाली जवळपास १००० पानांचं एक थोतांड. माझ्या मते फार तर ३०% सत्य आणि ७०% कल्पना.

मुंबईतल्या अंडरवल्ड मध्ये हिरोगिरी करून, अनेक बदले वगैरे घेऊन, एकेकट्याने हाणामाऱ्या करून, समाजकार्य करून समाधान होत नाही म्हणून अफगाणिस्तानात जाऊन लढून, जिवंत परतलेल्या एका साहसावीराची सुरुवातीला खरी वाटणारी आणि नंतर नंतर कल्पनाविलासात भरकटलेली कादंबरी. जबरदस्त "मार्केटींग" मुळे अपेक्षा उंचावणारी एक पोकळ कथा एवढंच मला म्हणता येईल.

अपर्णा वेलणकरांनी केलेला अनुवाद मात्र मानावा लागेल. संपूर्ण पुस्तक मराठीतच प्रकाशित करून मग त्यावरून इंग्रजी अनुवाद केला असावा असं वाटावं इतपत उत्कृष्ठ अनुवाद.

गुरुवार, २३ जुलै, २०१५

पर्व - डॉ. एस. भैरप्पा


मुळ कन्नड लेखक डॉ. एस. भैरप्पा

अनुवाद उमा कुलकर्णी

माझ्या अंदाजाने महाभारत हा एक असा विषय आहे ज्यावर आजवर सगळ्यात जास्त लिहीलं आणि वाचलं गेलंय. मी आजवर वाचलेल्या आणि मला कळलेल्या महाभरतापेक्षा सर्वस्वी वेगळं "महाभारत" डॉ. भैरप्पानी "पर्व" मधे मांडलंय.

आजवर महाभारत म्हणजे चमत्कार आणि अमानवीय शक्ती प्राप्त असलेल्या चांगल्या / वाईट व्यक्तींमधला संघर्ष इतकंच कळलं होतं. पर्व मधे डॉ. भैरप्पानी चमत्कार किंवा अमानवीय गोष्टींना फ़ाटा दिलाय. चमत्कार गाळल्यामुळे कोणतीही व्यक्तीरेखा छोटी होत नाही उलट त्यामुळे प्रत्येक घटनेची कारणमिमांसा करणं सोपं झालं.

पर्वमधे चमत्कार नाहीत, प्रत्येक व्यक्तीरेखेला मानवी चेहेरा मिळालाय तसंच त्यांचं वागणं बोलणं त्यांच्या भावना ह्या प्रत्येक गोष्टीला human touch मिळाल्यामुळे पुस्तक वाचताना नकळत आपण स्वतः देखील महाभरताचा एक भाग बनुन जातो. चुक की बरोबर हे जरी ठरवता नाही आलं तरी प्रत्येक घटनेची माझ्या परीने मला कारणं शोधता आली.

डॉ. भैरप्पानी मांडलेले दोन मुद्दे पटले आणि मनात कायमचं घर करुन बसले.

१. युधिष्ठीराच्या जुगारातल्या पराभवाबद्दल लिहीताना डॉ. भैरप्पा म्हणतात ध्युत खेळायला संपत्ती लागते पण जिंकण्यासाठी अजुनही बरंच काही लागतं.
२. द्रौपदी बद्दलच्या इतरांच्या लालसेबद्दल लिहीताना डॉ. भैरप्पा म्हणतात पाच पतींबरोबर संसार आणि पर्यायाने शय्या सोबत करणाऱ्या स्त्री बद्दल समाजात जरा जास्तच लालसा निर्माण होते.

महाभारत एका वेगळ्या अर्थाने समजुन घ्यायचं असेल तर अवश्य वाचावं असं पुस्तक.


मंगळवार, २१ जुलै, २०१५

एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत



लेखक - अनंत सामंत

पुस्तकाचं नाव वाचल्यावर वाटलं भाषांतर असेल पण नंतर कळलं मुळ मराठीच पुस्तक आहे.

अथांग सागर आणि हा सागर पार करायला लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती. निसर्गाशी, स्वतःच्या भावनांशी, मर्यादांशी अपुऱ्या साधनांच्या सहाय्याने टक्कर देत पुर्ण केलेली एक भयाण सफ़र.

बापाच्या विकृतीवर विकृत सुड घेणारी उज्वला, खेडवळ पत्नीला पाश्च्यात्य संस्कृतीत वावरायला तयार करायला धडपडणारा, प्रसंगी त्यासाठी तिच्या भावनांचा विचार न करता लैंगिक विकृतीकडे झुकणारा दीपक, ह्या सगळ्या छळवादातुन जवळपास वेडी झालेली उज्वला, वेश्यालय चालवणारी ॲना  प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे वेगळं अस्तित्व आहे तरी एक क्षण असा येतो की प्रत्येकाचा शेवटही एकच दिसु लागतो. त्यावेळी प्रत्येकाचं वागणं प्रत्येकाच्या मर्यादा अधोरेखित करतात.

जहाजावरचं आयुष्य, तिथली दडपणं तिथले धोके आणि ह्या सगळ्याला कसलीही भिक न घालणारा व्यवहार खुप संयमित भाषेत चित्रीत केलाय सामंतांनी.


पुस्तक वाचुन झाल्यावर मानवी विकृती, हव्यास, निसर्गाशी लढताना दिसणाऱ्या मर्यादा सगळं सगळं आपल्यावर अनेक ओरखडे उठवुन जातं.

गवत्या - मिलिंद बोकील



लेखक – मिलिंद बोकील

एका  भरकटत राहिलेल्या, अस्वस्थ पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत भटक्याची ही कहाणी. अफाट लेखनशैलीमुळे गवत्या, बाज्या, अनु, मेहेर , गुरुजी, जानकी अगदी एकूण एक पात्र उभी राहतात डोळ्यासमोर.

सगळ्या भरकटण्यात एक सुसूत्रता दिसते, आकांडतांडव न करता, तत्त्ववेत्त्याचा आव न आणता स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून जाणवत राहतो.

खूप संथ कहाणीचा शेवट मात्र मला नाही आवडला .....”Typical Happy Ending “

एकूण कादंबरी मात्र “शाळा” इतकी  नाही पण खिळवून ठेवते एवढं नक्की