बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

उत्तरे सांगुन गेलो


मी मुक्याने मुक प्रश्न हाती तुझ्या ठेवुन गेलो
मी तुझ्या मौनात माझी उत्तरे सांगुन गेलो

श्वास माझे कोरडे अन कोरडे डोळे तरीही
मी स्वतःला नयनी तुझ्या का पुन्हा बुडवुन गेलो?

वाटले ती रात्र सरली, उगवेल आता पुन्हा नवे
मी धुक्यावर स्वप्न माझे तेव्हा पुन्हा खरडुन गेलो

विसरलो मी आठवांना, बुजवल्या मी साऱ्या खुणा
मी पुन्हा तो उकिरडा का उगा चिवडुन गेलो ?

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

एकदा आम्ही ठरवलं.....


एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं

मी रुसायचं गाल फ़ुगवुन
आणि तिने समजवायचं
ती गुदगुल्या करणार
मी खुदकन हसायचं

हसता हसता पाणि येइल डोळ्यात
तिने ओठांनी टिपायचं
मी मात्र तेव्हा लाजुन
तिलाच घट्ट बिलगायचं

मी हात फ़िरवायचा
तिच्या लांबसडक केसांतुन
गाणं सुद्धा गुणगुणायचं
तिने शांत पडुन रहायचं

कुशीत शिरेल तीच अचानक
मग तिनेच वादळ व्हायचं
मी मात्र तेव्हा
तिला अर्पण व्हायचं

बेभान होवुन मीही
देहात तिचं वादळ भिनवायचं
वादळ शमल्यावर दमलेल्या तिला
मी अलगद थोपटुन झोपवायचं

एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं


मंगळवार, ७ एप्रिल, २००९

पाखरु

एकदा अचानक एक पाखरू
माझ्या पुढ्यात पडलं
जखमी होतं बिचारं
जीवाच्या आकांताने तडफ़डलं

मी पटकन उचलुन घेतलं
थोडं गोंजारलं, थोडं पाणी पाजलं
क्षणापुर्वी घाबरुन थरथरणारं पाखरु
माझ्या हातात थोडं विसावलं

मी त्या जखमी पाखराला
माझ्याजवळ ठेवायचं ठरवलं
निदान त्याच्या जखमा भरेपर्यंत
सांभाळायचं ठरवलं

थोडयाच दिवसात पाखरु
माझ्या घरात रुळलं
काडी काडी जमवुन त्यानं
घरटं बांधायला घेतलं

मलाही नाद लागला
त्याचं घरटं बांधायचा
त्याच्या भोवती काडया टाकुन
त्याला मदत करायचा

आम्ही दोघांनी मिळुन
घरटं छान सजवलं
माझ्या घरातलं त्याचं घरटं
मलाही खुप आवडलं

पण एके दिवशी न सांगता
पाखरु उडुन गेलं
त्याचं घरटं, माझं घर
सगळं सोडुन गेलं

मला दुःख नाहीये कशाचंच
हे एके दिवशी होणारच होतं
त्याच्या पंखातलं बळ
कधी ना कधीत्याला
त्याचं आकाश देणारंच होतं

त्याचं घरटं मी अजुन जपुन ठेवलं
यत्याला पुन्हा गरज पडेल म्हणुन नाही
कधी तरी माझ्या जखमा विसरुन उडुन जायला
हे घरटं मला शिकवेल म्हणून

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २००९

ती पिचत चाललीय


नर आणि मादीच्या
वेगवेगळ्या अस्तित्वापासुन
चाचपडणारा मी
चाचपडणारी ती
तिचं जग निळं आभाळ
माझं जग जमिनीवरचं
ती लोभस, चंचल
मी निश्चल निर्विकार
तिच्या भावना तिचा व्यवहार
माझ्या भावना नुसता व्यवहार
तिच्या नशिबी निर्मीतीच्या वेदना
मी हेतुपुरस्सर मुका साक्षीदार
ती मला भावनेत बांधु पहाणारी
विश्वासाच्या रेशमी मिठीत धरु पहाणारी
मी कसलेला नट, अडकल्याचं दाखवणारा
तिच्या मुर्खपणावर स्वतःशीच हसणारा
स्वतःच्याच भावनांच्या ओझ्याखाली
ती पिचत चाललीय
तिच्यातलं स्त्रीपण शोषुन
मी मात्र फ़ुगत चाललोय